Headlines

राज्यात जलसंकट!:धरणांमधील पाणीसाठ्यात तब्बल 20 टक्क्यांची घट, जलसंपदा विभागाचा अहवाल; पाहा आकडेवारी




राज्याच्या जलसंपदा विभागाने रविवारी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, महाराष्ट्रातील धरणांमधील उपयुक्त पाणीसाठ्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत मोठी घट झाली आहे. राज्यातील मोठे, मध्यम आणि लघु अशा एकूण तीन हजार 33 धरण प्रकल्पांमध्ये सध्या केवळ 70.53 टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. गेल्या वर्षी याच दिवशी हाच साठा 90.74 टक्के होता, याचाच अर्थ यंदा पाणीसाठ्यात तब्बल 20.21 टक्क्यांची चिंताजनक घट नोंदवली गेली आहे. जलसंपदा विभागाच्या अहवालानुसार, राज्यातील सर्व धरणांची एकूण उपयुक्त साठवण क्षमता 40 हजार 826.07 दशलक्ष घनमीटर इतकी आहे. यापैकी सध्या 28 हजार 792.90 दशलक्ष घनमीटर उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. धरणांतील मृत साठा लक्षात घेता, राज्यातील एकूण पाणीसाठा 36 हजार 371.38 दशलक्ष घनमीटर इतका नोंदवला गेला आहे. छत्रपती संभाजीनगर आणि विदर्भातील स्थिती विभागनिहाय विचार केल्यास, छत्रपती संभाजीनगर विभागातील धरणांमध्ये सर्वांत कमी म्हणजे केवळ 41.84 टक्के उपयुक्त पाणीसाठा उरला आहे. गेल्या वर्षी याच दिवशी या विभागात तब्बल 88.12 टक्के साठा होता. यासोबतच अमरावती विभागात यंदा 59.47 टक्के, तर नागपूर विभागात 65.43 टक्के उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. कोकण, पुणे आणि नाशिकची आकडेवारी राज्यात सर्वाधिक पाणीसाठा कोकण विभागात असून तो 87.84 टक्के इतका आहे, जो गेल्या वर्षी 92.30 टक्के होता. याशिवाय पुणे विभागात 81.29 टक्के साठा नोंदवला गेला आहे, जो गतवर्षी 93.48 टक्के होता. नाशिक विभागात सध्या 78.88 टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक असल्याचे अहवालातून स्पष्ट झाले आहे. धरण प्रकल्पांनुसार पाणीसाठ्याची स्थिती राज्यातील 138 मोठ्या प्रकल्पांमध्ये सध्या 78.50 टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे, जो गतवर्षी याच दिवशी 97.62 टक्के होता. 264 मध्यम प्रकल्पांमध्ये 61.71 टक्के पाणीसाठा (गतवर्षी 83.58 टक्के) शिल्लक आहे. राज्यामध्ये संख्येने सर्वाधिक असलेल्या दोन हजार 631 लघु प्रकल्पांची स्थिती अधिकच बिकट असून तिथे केवळ 40.85 टक्के उपयुक्त पाणीसाठा उरला आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *