Headlines

मनोज जरांगेंनी शिंदेंनाच विचारला 500 कोटींचा हिशोब!:रामदास कदम म्हणाले- आमच्यात भांडणे लावण्याचा काही लोकांचा प्रयत्न




मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यभरात रान उठवणारे मनोज जरांगे पाटील यांनी बीडमधील सभेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना उद्देशून एक अत्यंत स्फोटक सवाल केला आहे. ५०० कोटी रुपयांच्या कथित आरोपावरून त्यांनी थेट शिंदेंकडे जाहीर स्पष्टीकरण मागितले आहे. तर दुसरीकडे, या आरोपावर शिवसेनेचे (शिंदे गट) नेते रामदास कदम यांनी प्रतिक्रिया देत युतीमध्ये कोणतेही मतभेद नसून, काही लोक भांडणे लावण्याचा प्रयत्न करत असल्याचे स्पष्ट केले आहे. मनोज जरांगेंचा ५०० कोटींचा गौप्यस्फोट बीड येथे झालेल्या सभेत बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी एकनाथ शिंदे आणि त्यांच्या मुलावर (खासदार श्रीकांत शिंदे) होत असलेल्या एका गंभीर चर्चेकडे लक्ष वेधले. जरांगे म्हणाले, एकनाथ शिंदेंनी भाजपच्या केंद्रातील आणि राज्यातील काही बड्या नेत्यांना असे सांगितले आहे का, की ‘मनोज जरांगेंना ५०० कोटी रुपये द्यायचे आहेत’ आणि श्रीकांत शिंदेंनी ते मला आणून दिले आहेत? शिंदे साहेब, आजच्या दसरा मेळाव्यात किंवा उद्या संध्याकाळपर्यंत या प्रश्नाचे जाहीर उत्तर द्या.” या आरोपामागे आपल्याला बदनाम करण्याचे मोठे षड्यंत्र असल्याचा दावा जरांगे यांनी केला. “जर पैसे दिले असतील तर ‘हो’ म्हणा आणि नसतील दिले तर तेही जाहीरपणे सांगा. मला बदनाम करण्याचे हे किती मोठे षड्यंत्र आहे?” असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला. रामदास कदम यांचे स्पष्टीकरण: आमच्यात भांडण लावण्याचा प्रयत्न मनोज जरांगे यांच्या या दाव्यावर आणि ‘भाजप शिंदेंना संपवत आहे’ या त्यांच्या वक्तव्यावर शिवसेना नेते रामदास कदम यांनी प्रतिक्रिया दिली आहे. कदम म्हणाले, “भाजप आणि शिवसेना एकमेकांना संपवत आहेत किंवा त्यांच्यात मतभेद आहेत, असे काहीही नाही. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे दोघेही समाजाला आणि मनोज जरांगे पाटील यांना मदत करत आहेत. मराठा समाजाने कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन करत कदम यांनी स्पष्ट केले की, “शिवसेना आणि भाजपची युती भक्कम असून, काही लोक या दोन्ही पक्षांमध्ये आणि नेत्यांमध्ये भांडणे लावण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करत आहेत, पण तसे कधीही होणार नाही.” ‘जरांगेंचे आभार, आता शिंदेंनाही कळेल कट कोण रचतंय’ पत्रकारांनी जेव्हा कदम यांना जरांगे यांच्या ‘भाजप तुम्हाला संपवत आहे’ या आरोपाबद्दल विचारले, तेव्हा कदम म्हणाले, मनोज जरांगे यांना कुठूनतरी अशी माहिती मिळाली असेल. पण त्यांनी हे मनात न ठेवता उघडपणे बोलून दाखवले, यासाठी मी त्यांचे आभार मानतो. यामुळे आता अधिक स्पष्टता येईल आणि शिंदे साहेबांनाही समजेल की कोणती माणसे असे कट रचत आहेत. कोणीही कोणाला संपवण्याचा प्रयत्न करत नाही आणि तसे कोणी केले तर ते खपवून घेतले जाणार नाही,” असा इशाराही रामदास कदम यांनी दिला. मनोज जरांगे यांच्या या ५०० कोटींच्या आरोपाने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, आता एकनाथ शिंदे यावर स्वतः काय उत्तर देतात, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले आहे. ————————— हेही वाचा.. 500 कोटींचा आरोप सिद्ध करा, नाहीतर षड्यंत्र उघडे पाडा:मनोज जरांगेचं उपमुख्यमंत्री शिंदेंना आव्हान; हेक्टरी 1 लाख, संपूर्ण कर्जमुक्ती घेतल्याशिवाय शांत बसणार नाही!
“मराठा समाजाने आता डोळे उघडून स्वतःच्या मुलाबाळांच्या भविष्यासाठी एकत्र आले पाहिजे. राजकारण्यांचे पक्ष आणि त्यांचे आमदार-खासदार वाढवण्यासाठी स्वतःचा बळी देणे आधी बंद करा. दुष्काळात शेतकरी हतबल झाला आहे, पिके जळून खाक झाली आहेत आणि सरकार अवघे 5,000 रुपये देऊन बळीराजाची क्रूर चेष्टा करत आहे. या 5,000 रुपयांसाठी शेतकऱ्याचे बँकेच्या फेऱ्या मारण्यात आणि प्रवासातच सर्व पैसे खर्च होणार; मग शेतकऱ्याच्या हातात काय उरणार? राज्य सरकारने दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी 1 लाख रुपये मदत आणि संपूर्ण कर्जमुक्ती दिलीच पाहिजे. यासाठी सर्व शेतकरी संघटनांना एकत्र करून मोठा लढा उभारणार,” असा सज्जड इशारा मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. सविस्तर वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *