![]()
प्रसिद्ध चित्रपट अभिनेते झीशान अय्युब यांना नुकताच ‘लोकनेते भाई वैद्य युवा नेता पुरस्कार २०२६’ प्रदान करण्यात आला. यावेळी पुरस्कार स्वीकारताना त्यांनी सध्याच्या जागतिक परिस्थितीवर चिंता व्यक्त केली. ते म्हणाले की, सध्या संपूर्ण जगात द्वेष आणि हिंसेचे वातावरण आहे, जिथे द्वेष पसरवणारे तग धरतात, तर प्रेम करणाऱ्या व्यक्तींना समाजाबाहेर फेकले जाते. हा प्रतिष्ठेचा राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार थोर समाजवादी लोकनेते भाई वैद्य यांच्या ९८व्या जयंतीनिमित्त भाई वैद्य फौंडेशन आणि आरोग्य सेना यांच्या वतीने दिला जातो. भाई वैद्य फौंडेशन व आरोग्य सेनेचे संस्थापक अध्यक्ष, समाजवादी विचारवंत, लेखक आणि संपादक डॉ. अभिजित वैद्य यांच्या हस्ते झीशान अय्युब यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा कार्यक्रम एस. एम. जोशी फौंडेशनच्या सभागृहात पार पडला. पुरस्कार मिळाल्याने आपल्या निर्भय भूमिकेला बळ मिळाल्याचे झीशान अय्युब यांनी सांगितले. त्यांनी हा पुरस्कार समाजातील वंचित आणि दुर्बळ घटकांना, मणिपूरमधील लिंचिंगचे बळी ठरलेल्यांना, तसेच खोट्या आरोपांखाली तुरुंगात असलेल्या पत्रकारांना समर्पित केला. ज्यांच्या मनात राग आणि संताप आहे, पण ते बोलू शकत नाहीत, अशा सर्वांनाही त्यांनी हा पुरस्कार अर्पण केला. अय्युब पुढे म्हणाले की, “समाज म्हणून तुम्ही प्रश्न विचारू नका, विचार करू नका, केवळ खाली मान घालून जगत राहा अशी मानसिकता व्यवस्थेने करून ठेवली आहे. मात्र, लढाई अजून संपलेली नाही हेच खरे आहे.” यावेळी बोलताना डॉ. अभिजित वैद्य यांनी देशातील सद्यस्थितीवर भाष्य केले. ते म्हणाले की, गेल्या एक दशकापासून एक राजकीय पक्ष आणि त्यामागील एक विषारी संघटना राज्य करत असून, ते आपली पकड अधिकाधिक घट्ट करत आहेत. ही शक्ती भारताची भव्य, उदात्त आणि सर्वसमावेशक कल्पना उद्ध्वस्त करत असून, त्याजागी द्वेषाने पेटलेली, संकुचित संस्कृती प्रस्थापित करू इच्छित आहे. ‘एक राष्ट्र, एक धर्म, एक भाषा आणि एक रंग’ हे त्यांचे लक्ष्य भारताची विविधता आणि एकता संपवून देशाला तोडणारे असल्याचे त्यांनी नमूद केले.
Source link
झीशान अय्युब यांना 'भाई वैद्य युवा नेता पुरस्कार':म्हणाले – "सध्या जगात द्वेष आणि हिंसेचे वातावरण"