Headlines

डोळे आभाळाकडे:विदर्भात जूनमध्ये पावसाची मोठी ओढ, सरासरीच्या तुलनेत 39 % घट, गोंदिया-गडचिरोलीत सर्वाधिक चिंताजनक स्थिती




विदर्भात चालू मान्सून हंगामाच्या पहिल्याच महिन्यात पावसाने निराशा केली आहे. १ ते ३० जून २०२६ या कालावधीत संपूर्ण विभागात सरासरीपेक्षा अत्यंत कमी पाऊस नोंदवला गेला. हवामान विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, सरासरी १७५.४ मिमी पावसाची गरज असताना प्रत्यक्षात केवळ १०७.६ मिमी पाऊस पडला, ज्यामुळे एकूण ३९ टक्के घट झाली आहे. विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये पावसाची परिस्थिती चिंताजनक असून, विशेषतः पूर्व विदर्भातील जिल्ह्यांना याचा मोठा फटका बसला आहे. या आकडेवारीनुसार, गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यांमध्ये परिस्थिती सर्वात बिकट आहे. गोंदिया जिल्ह्यात जूनमध्ये सामान्यतः १९६.५ मिमी पाऊस होतो, परंतु यंदा तिथे अवघा ५१.२ मिमी पाऊस झाला, म्हणजेच सर्वाधिक ७४ टक्के घट नोंदवण्यात आली. त्याखालोखाल गडचिरोली जिल्ह्यात २२०.१ मिमीच्या तुलनेत फक्त ६४.८ मिमी पाऊस झाल्याने ७१ टक्के तूट निर्माण झाली आहे. तसेच, भंडारा जिल्ह्यातही सरासरी १८७.४ मिमीच्या तुलनेत केवळ ७३.१ मिमी पाऊस पडल्याने ६१ टक्के पावसाची तूट दिसून आली. पश्चिम विदर्भातील अमरावती आणि बुलढाणा जिल्ह्यांमध्ये तुलनेने कमी म्हणजेच अनुक्रमे १३ टक्के आणि १७ टक्के घट झाली असून, तिथे १३०.५ मिमी आणि ११२.४ मिमी पाऊस झाला आहे. अकोला जिल्ह्यात १९ टक्के घटीसह ११६.७ मिमी, तर वर्धा जिल्ह्यात १८ टक्के घटीसह १३९.५ मिमी पावसाची नोंद झाली. नागपूर विभागात ३१ टक्के घटीसह ११९.५ मिमी, चंद्रपूरमध्ये ३७ टक्के घटीसह ११९.१ मिमी, वाशिममध्ये ३५ टक्के घटीसह ११३.८ मिमी आणि यवतमाळ जिल्ह्यात ३० टक्के तुटीसह १२१.९ मिमी पाऊस झाला. जून महिना संपला तरी विदर्भातील कोणत्याही जिल्ह्यात पावसाने आपली सरासरी ओलांडलेली नाही. यामुळे शेतकऱ्यांसमोरील चिंता वाढली असून, आता सर्वांचे डोळे जुलै महिन्यातील पावसाकडे लागले आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *