Headlines

भाजप नेते विजय चौधरी यांची पक्षातून हकालपट्टी:व्हायरल ऑडिओ क्लिप्स भोवल्या, पक्षाने सर्व जबाबदाऱ्यांतून केले मुक्त




भाजपचे माजी महामंत्री आणि नंदुरबारचे नेते विजय चौधरी यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या सातत्याने काही कथित ऑडिओ कलिप्स व्हायरल होत होत्या. याच कारणावरून त्यांच्यावर पक्षाने कारवाई केली असून पक्षाकडून अधिकृत पत्रक जारी करण्यात आले आहे. पत्रकात विजय चौधरी यांना पक्षाच्या सर्व जबाबदाऱ्यांमधून मुक्त करण्यात येत असल्याचा स्पष्ट उल्लेख करण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून विजय चौधरी यांच्या कथित ऑडिओ क्लिप्स सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असल्याने नंदुरबारमधील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या ऑडिओ क्लिप्समध्ये शासकीय अधिकारी, पक्षाचे पदाधिकारी आणि थेट मंत्र्यांसोबतचे चौधरी यांचे कथित संभाषण समोर आले असून, यामुळे जिल्ह्यात विविध राजकीय चर्चांना उधाण आले आहे. कथित ऑडिओ कलिप्स एआय असल्याचा चौधरींचा दावा यातील एका विशेष ऑडिओ क्लिपमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे आणि त्यांच्या स्नुषा तथा केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्याविषयी अत्यंत आक्षेपार्ह भाषेचा वापर करण्यात आला होता. या वाढत्या वादानंतर विजय चौधरी यांनी यावर स्पष्टीकरण दिले असून, या सर्व ऑडिओ क्लिप्स खोट्या असल्याचा आणि त्यामध्ये ‘एआय’ तंत्रज्ञानाचा वापर करून जाणीवपूर्वक छेडछाड करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला आहे. भाजपमधील गटबाजी चव्हाट्यावर ऑडिओ क्लिप्स व्हायरल झाल्यानंतर विजय चौधरी यांच्या मुलाने पोलिसांत तक्रार दाखल केली होती. मात्र, राज्याचे मंत्री जयकुमार रावल आणि मंत्री गिरीश महाजन यांच्यासोबतचे चौधरी यांचे कथित संभाषणही समोर आल्याने भाजपतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला. याशिवाय, एका ऑडिओ क्लिपमध्ये भाजप नेते विजयकुमार गावित यांच्या कुटुंबीयांना लक्ष्य करत माजी खासदार डॉ. हिना गावित यांच्याबद्दल अत्यंत आक्षेपार्ह विधाने करण्यात आल्याचा गंभीर प्रकार समोर आला, ज्यामुळे हा वाद अधिकच चिघळला. विजय चौधरी यांची हकालपट्टी या ऑडिओ क्लिप प्रकरणावरून डॉ. हिना गावित यांचे चुलत भाऊ रोहन गावित यांच्याविरोधात पोलिसांत जातिवाचक शिवीगाळ आणि अ‍ॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. या संपूर्ण प्रकारामुळे संतप्त झालेल्या गावित समर्थकांनी आणि कार्यकर्त्यांनी विविध पोलिस ठाणी तसेच तहसील कार्यालयांमध्ये धाव घेत दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली. तसेच, पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडे विजय चौधरी यांना पक्षातून तातडीने काढण्याचा आक्रमक आग्रह धरला. या वाढत्या दबावानंतर आणि राजकीय वादानंतर अखेर भाजपने कठोर पाऊल उचलत विजय चौधरी यांची पक्षातून अधिकृतपणे हकालपट्टी केली आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *