Headlines

पुण्याच्या समस्यांवर सुप्रिया सुळे आक्रमक:खड्डे, पाणी, वाहतूक कोंडीसह अनेक मुद्द्यांवर सरकारला घेरले




खासदार सुप्रिया सुळे यांनी पुणे शहरातील विविध समस्यांवरून सरकारवर जोरदार टीका केली आहे. शहरातील खड्डे, कचरा डेपो, पाणीपुरवठा, वाढते प्रदूषण, वाहतूक कोंडी आणि महापालिका शाळांच्या प्रश्नांवर त्यांनी आक्रमक भूमिका घेतली. त्यांनी महापालिका आयुक्तांची भेट घेऊन या सर्व समस्यांचा आढावा घेतला, अशी माहिती पत्रकार परिषदेत दिली. सुळे यांनी सांगितले की, पुणे हा बारामती लोकसभा मतदारसंघाचा भाग आहे. त्यामुळे दर महिन्याला महापालिकेत शिवसेना आणि काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांसह एकत्रितपणे पुण्याच्या समस्या सोडवण्यासाठी आढावा घेतला जातो. त्यांनी शहरातील खड्डे, फुरसुंगी कचरा डेपो, नव्याने समाविष्ट गावांचा मालमत्ता कर, उंड्रीतील प्रदूषण आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न यावर सविस्तर चर्चा केली. “दादांनी कराबाबत जो निर्णय घेतला होता, तो कायम ठेवावा,” अशी मागणीही त्यांनी यावेळी केली. बावधनमधील केतकी ओढ्यावर रस्ता बांधल्याने पूरस्थिती निर्माण होत असल्याचा आरोप करत, या कामाला कोणी परवानगी दिली, असा सवाल सुळे यांनी उपस्थित केला. एकतानगरमध्ये यंदाही पूर आल्याचे आणि धायरीच्या अनेक भागांत वीजपुरवठ्याची समस्या असल्याचे त्यांनी निदर्शनास आणले. “सरकार टेकड्या फोडण्याचे पाप करत आहे. विकास आणि पर्यावरणाचा समतोल राखणे आवश्यक आहे,” असे मत त्यांनी व्यक्त केले. पुण्यातील वाढत्या वाहतूक कोंडीवरूनही त्यांनी सरकारला लक्ष्य करत, “डबल इंजिन सरकार असतानाही वाहतूक कोंडी का होते?” असा प्रश्न विचारला. मराठी शाळांच्या प्रश्नावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिल्याचे सांगत, “सरकार शिक्षणाबाबत उदासीन आहे,” अशी टीका त्यांनी केली. संसदेत विविध मुद्द्यांवर चर्चा करण्याची विरोधकांची तयारी असतानाही सरकार चर्चेला तयार नसल्याचा आरोपही त्यांनी केला. अमित शहा यांच्याबाबतच्या एका प्रश्नावर सुळे यांनी व्हिडिओची सत्यता तपासण्याची गरज व्यक्त केली. “कोणता व्हिडिओ खरा आणि कोणता खोटा, हे तपासले पाहिजे. बावनकुळे मंत्री आहेत; त्यांनी आमच्यावर गुन्हा दाखल करावा,” असे आव्हान त्यांनी दिले. आदिवासी आश्रमशाळेतील दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर आश्रमशाळांचा आढावा घेण्याची मागणी करणारे पत्र त्यांनी लिहिल्याचे सांगितले. चाकणच्या औद्योगिक परिसरातील समस्यांवरूनही त्यांनी सरकारला धारेवर धरत, “मुख्यमंत्र्यांनी याची जबाबदारी घ्यावी,” अशी मागणी केली. रिक्षाचालकांच्या भाषेच्या प्रश्नावर, “आपण ज्या राज्यात राहतो, त्या राज्याची भाषा शिकण्यात कमीपणा कसला?” असा सवाल त्यांनी केला. तर ‘बौद्धिक नक्षल’ या शब्दप्रयोगाबाबत, “याचा अर्थ मला माहिती नाही. पंतप्रधान कार्यालयाने याबाबत स्पष्ट करावे,” अशी मागणी सुळे यांनी केली.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *