Headlines

'संजय राऊतांच्या जिभेला हाड नाही':नाशिकमधील आरोपांवरून गिरीश महाजनांचा जोरदार पलटवार, काय म्हणाले महाजन?




शिवसेना ठाकरे गटाने आज नाशिकमधील रस्त्यांवर असलेले खड्डे आणि त्यामुळे होणारे अपघात व त्यातून होणारे मृत्यू, याच्या निषेधार्थ आज जन आक्रोश मोर्चा काढला होता. या मोर्चाचे नेतृत्व खासदार संजय राऊत यांनी केले. तसेच यावेळी बोलताना संजय राऊत यांनी महापलिका प्रशासनाला रस्त्यांवरील खड्डे लवकरात लवकर बुजवण्याची मागणी केली आहे, तसेच मनमानी केली तर गेट तोडून आत घुसू, असा इशाराही दिला. तसेच मंत्री गिरीश महाजन यांच्यावर देखील त्यांनी जोरदार टीका केली होती. यावर आता महाजन यांनी प्रत्युत्तर देत पलटवार केला आहे. गिरीश महाजन माध्यमांशी बोलताना म्हणाले, संजय राऊत यांच्या जिभेला हाड नाही. पंतप्रधान, न्यायालय, निवडणूक आयोग सगळ्यांचा विरोधात राऊत काय काय बोलतात. त्यांच्या जिभेला काही हाड नाही. त्यांना काय बडबड करायची ते करू देत. त्यांच्या बडबडीने काही फरक पडत नाही. आम्ही आमचे काम करत राहू, असे महाजन यांनी म्हटले आहे. उगाच बाष्फळ बडबड करू नये संजय राऊत यांनी मोर्चात बोलताना गिरीश महाजन यांच्यावर थेट भ्रष्टाचाराचे आरोप केले. नाशिकमध्ये भ्रष्टाचाराचा जामनेर पॅटर्न सुरू असल्याचे त्यांनी म्हटले. यावर गिरीश महाजन यांनी प्रत्युत्तर देत म्हटले की, राऊतांच्या जिभेला हाड नाही. त्यांच्याकडे दोन खासदार राहिले नाही. ते कोणा विरुद्ध काहीही बोलत असतात. हे महाराष्ट्राला माहिती आहे. तसेच येणाऱ्या काळात जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका आहेत. या निवडणुकीत राऊत यांनी ठाकरेंचा एक झेडपी किंवा झेडपी अध्यक्ष करून दाखवावा. उगाच बाष्फळ बडबड करू नये, असे आव्हान देखील महाजन यांनी दिले आहे. पालकमंत्रीपद मिळताच काय म्हणाले महाजन? दरम्यान, नाशिकच्या पालकमंत्री पदावर अखेर गिरीश महाजन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यावर प्रतिक्रिया देताना महाजन म्हणाले, खरे तर पांडुरंग पावला आहे. मी दर्शन घेत असताना बायकोने हळूच कानात मी पालकमंत्री झाल्याची बातमी सांगितली. आज पत्नी आणि मतदारसंघातील पंधरा ते सोळा हजार मतदारांसह पंढरपूरच्या दर्शनासाठी आलो होतो. दर्शन घेतानाच ही बातमी कळली आणि खूप आनंद झाला. आता यंदाचा महाकुंभ ‘न भूतो न भविष्य’ असा होईल. शिवाय नाशिकचा चेहरा मोहरा बदलून जाईल. गिरीश महाजनांनी मागितली नागरिकांची माफी पुढे बोलताना गिरीश महाजन यांनी नागरिकांची माफी देखील मागितली. ते म्हणाले, नाशिकमध्ये खूप जोरात कामे सुरू असून खरे तर 80 टक्के खड्डे बुजविण्यात आले आहेत. उरलेले 20 टक्के खड्डेही लवकरच बुजतील. लोक मोर्चे काढत आहेत, मात्र मी नागरिकांकडे माफी मागत थोडे दिवस सहन करा, असे आवाहन करतो. मात्र, आता मुख्यमंत्र्यांनी जवळपास एक हजार कोटी रुपये रस्त्यांसाठी दिल्याने नाशिकमध्ये सर्वच रस्ते आता सिमेंटचे होतील आणि नाशिक कायमचे खड्डे मुक्त होईल, असेही महाजन यांनी सांगितले. शहराचा चेहरा मोहरा बदलण्यात येत असून आता तुम्ही आला तर नवीन नाशिक ओळखू येणार नाही, इतके बदललेले दिसेल, असे आश्वासन देखील त्यांनी दिले आहे. यंदाचा कुंभ खऱ्या अर्थाने ‘महाकुंभ’ ठरेल आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरात तब्बल चार हजार सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार असून, त्यामुळे यंदाचा कुंभ खऱ्या अर्थाने ‘महाकुंभ’ ठरेल, असा विश्वास मंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केला आहे. तसेच, यापुढे नाशिक हे महाराष्ट्रातील सर्वात सुंदर, स्वच्छ आणि सुरक्षित शहर बनवण्यासाठी आमचे सर्वोच्च प्राधान्य आणि प्रयत्न राहतील, अशी ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *