![]()
मराठवाड्याच्या संतपरंपरेचा मानबिंदू असलेल्या संत एकनाथ महाराजांच्या पालखी मार्गाचे काम तब्बल नऊ वर्षांपासून रखडले आहे. काही ठिकाणी भूसंपादन न झाल्याने आणि शेतकऱ्यांना मोबदला न मिळाल्याने प्रकल्प संथगतीने सुरू असला तरीही या रस्त्याची रुंदी आता २४ मीटरवरून १८ मीटर करण्यात आली आहे. त्यातदेखील रस्ता सोलापूर जिल्हा वगळता सर्व ठिकाणी रखडला असल्याचे नाथवंशज पालखीप्रमुख रघुनाथ महाराज पालखीवाले यांनी सांगितले. यामुळे यंदाही वारकऱ्यांना खडतर आणि धोकादायक मार्गाने पंढरपूरची वाटचाल करावी लागणार आहे. राज्यातील प्रमुख दिंड्यांपैकी एक असलेल्या संत एकनाथ महाराजांच्या पालखीचे महत्त्व लक्षात घेऊन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी २०१७-१८ मध्ये पैठण ते पंढरपूर पालखी मार्गासाठी ७०५ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता. पहिल्या टप्प्यात पैठण ते नगर जिल्ह्यातील खेडा परिसरापर्यंतच्या मार्गाच्या विकासाचे नियोजन करण्यात आले होते. त्यानंतर काही भागात कामे सुरू झाली, काही ठिकाणी रस्तेही तयार झाले; मात्र अनेक ठिकाणी कामे अर्धवट राहिली. काही भागातील रस्ते निकृष्ट दर्जाचे असल्याच्या तक्रारीही समोर आल्या आहेत. आता या रस्त्याची रुंदी कमी करून टाकण्यात आली असल्याने वारकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. दरवर्षी संत एकनाथ महाराजांची पालखी हजारो वारकऱ्यांसह पैठणहून पंढरपूरकडे प्रस्थान करते. याच मार्गावरून बीड, अहिल्यानगर आणि इतर जिल्ह्यांतील शंभरहून अधिक पालख्याही पंढरपूरकडे जातात. मात्र पालखी मार्गाची अवस्था दिवसेंदिवस खालावत चालल्याने वारकऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. ७०५ कोटी खर्चूनही वारकऱ्यांना खडतर प्रवास संत एकनाथ महाराज पालखीचे प्रमुख रघुनाथबुवा पालखीवाले यांनी प्रशासनाविषयी तीव्र नाराजी व्यक्त केली. ‘पालखी मार्गासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर झाला, तरी आजही वारकऱ्यांना खडतर रस्त्यांवरून चालावे लागत आहे. अनेक ठिकाणी पूल अपूर्ण आहेत, तर काही रस्त्यांची अवस्था अत्यंत खराब झाली आहे,’ असे त्यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, ‘पालखी मार्गाच्या प्रश्नावर अनेक वेळा प्रशासनाला निवेदने दिली. गतवर्षी रास्ता रोको आंदोलनही केले. मात्र अद्याप ठोस कार्यवाही झालेली नाही.’ काम सुरू असल्याचा दावा ‘पालखी मार्गाची काही कामे सुरू आहेत. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या माध्यमातून हा प्रकल्प राबवला जात आहे. पैठण तालुक्यातून पालखी जाणारा रस्ता सध्या चांगल्या स्थितीत आहे. उर्वरित कामेही टप्प्याटप्प्याने पूर्ण केली जातील अशी माहिती अभियंत्यांनी दिली. मार्गावरील अनेक कामे अद्याप अपूर्ण, पूल खचले पालखी मार्गावरील धोगस, पारगाव, मिडसांगवी, उंकडा, चकवा, दहीवंडी, शिरूर, राक्षसभुवन, खुलेवाडी, कारेगाव, डोंगरकिन्ही, पाटोदा आदी गावांच्या परिसरातील रस्ते व लहान-मोठ्या पुलांची कामे अद्याप पूर्ण झालेली नाहीत. काही ठिकाणी पूल खचले असून, पावसाळ्यात हा प्रवास अधिक धोकादायक ठरण्याची शक्यता आहे.
Source link
9 वर्षांपासून रखडला पालखी मार्ग; 24 मीटरवरून आला 18 मीटरवर:पैठण ते पंढरपूर मार्गाची दयनीय अवस्था; वारकऱ्यांना खडतर प्रवासाची शिक्षा