Headlines

शिवाजीराव शिंदे यांच्या शोकसभेत आठवणींना उजाळा:तत्त्वनिष्ठ नेतृत्वाला अखेरचा निरोप; सभेत 40 पेक्षा जास्त मान्यवरांकडून भावना प्रकट‎




महाराष्ट्रातील ज्येष्ठ समाजवादी नेते शिवाजीराव शिंदे यांचे २१ जून २०२६ रोजी कर्करोगाच्या प्रदीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या जाण्याने एक अभ्यासू, तत्त्वनिष्ठ आणि पुरोगामी विचारांचा दीपस्तंभ हरपल्याची भावना व्यक्त करत लातूरकरांच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. लातूरमधील विविध सामाजिक संस्था आणि संघटनांच्या वतीने आयोजित या शोकसभेला नागरिक, राजकीय व सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त गर्दी केली होती. शिवाजीराव शिंदे हे भारताचे माजी पंतप्रधान चंद्रशेखर यांचे निकटवर्तीय सहकारी आणि जनता दलाचे माजी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष होते. त्यांनी आपल्या राजकीय प्रवासात तत्त्वांशी कधीही तडजोड केली नाही. लातूरच्या जडणघडणीत त्यांचे मोठे योगदान होते. त्यांच्या अंतिम इच्छेनुसार झालेल्या अंत्यविधीत कमालीचा सामाजिक सलोखा पाहायला मिळाला. एक मुस्लिम, एक दलित, एक ओबीसी आणि एका नातेवाइकाने त्यांना खांदा देत अखेरचा निरोप दिला. श्रद्धांजली सभेत ४० हून अधिक मान्यवरांनी आठवणींना उजाळा दिला. ज्येष्ठ विचारवंत प्राचार्य डॉ. नागोराव कुंभार, माजी आमदार माणिकराव जाधव, गोविंद केंद्रे, अतुल देऊळगावकर, प्रा. सुभाष भिंगे, एड. उदय गवारे, डॉ. बी. आर. पाटील, प्रा. अर्जुन जाधव, प्रा. सुदर्शन मोरे, प्राचार्य रघुनाथ कांबळे आदी उपस्थित होते. कन्या अस्मिता ठाकूर व नातू अरस्तू शिंदे यांनी कृतज्ञता व्यक्त केली. प्रा. डॉ. दशरथ भिसे यांनी सूत्रसंचालन केले. सामाजिक सलोख्याचा संदेश शिवाजीराव शिंदे यांनी केवळ आयुष्यातच नव्हे, तर मृत्यूनंतरही पुरोगामी आणि समानतेचा विचार कृतीतून रुजवला. त्यांच्या मृत्यूपूर्वीच्या इच्छेनुसार, त्यांच्या अंत्यविधीवेळी अभूतपूर्व सामाजिक सलोख्याचे दर्शन घडले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *