Headlines

जरंडी परिसरामध्ये ढगफुटीसदृश पाऊस‎:सकाळी 7 ते 9 वाजेपर्यंत सोयगाव-बनोटी-चाळीसगाव राज्य मार्गावरील वाहतुकीवर परिणाम‎




तालुक्यातील जरंडीसह परिसरात बुधवारी सकाळी ७ ते ९ या वेळेत झालेल्या ढगफुटीसदृश पावसाने हाहाकार उडवला. दोन तासांत कोसळलेल्या पावसामुळे गावालगत असलेल्या खडकी नदीला सकाळी अकरा वाजेच्या सुमारास पहिलाच मोठा पूर आला. पुराच्या पाण्याचा वेग अधिक असल्याने सोयगाव-चाळीसगाव राज्य मार्गावरील पूल वाहून गेला. परिणामी, या मार्गावरील वाहतूक ५ तास ठप्प झाली होती. सोयगाव-चाळीसगावचा संपर्क पूर्णपणे तुटला आहे. सध्या जरंडी परिसरात रस्त्याचे दुतर्फा सिमेंटीकरण युद्धपातळीवर सुरू आहे. मात्र, संबंधित ठेकेदाराने रस्त्यावरील नाल्यांचे पाणी वाहून जाण्यासाठी योग्य व्यवस्था केली नाही. तात्पुरते वळण रस्तेही पक्के केले नव्हते. त्यामुळे पाऊस सुरू होताच जरंडी ते सोयगावदरम्यानचे बहुतांश वळण रस्ते पाण्यात वाहून गेले. ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत असल्याचा संताप व्यक्त होत आहे. जरंडी शिवारात झालेल्या या ढगफुटीसदृश पावसाने संपूर्ण शेतजमीन जलमय झाली आहे. सिल्लोड : भराडी-घाटनांद्रा रस्त्यावरील वाहतूक जोरदार पावसामुळे २ तास ठप्प सिल्लोड तालुक्यातील भराडी मंडळात मंगळवारी पावसाने कहर केला. कासोद आणि तळणी येथील नाल्यांना मोठा पूर आल्यामुळे भराडी-घाटनांद्रा रस्त्यावरील वाहतूक तब्बल दोन तास ठप्प झाली होती. या मंडळात कासोद, तळणी, वडोदचा था, वांगी, भराडी, सीसारखेडा, धामणी या गावांमध्ये धुवांधार पाऊस झाल्याने शेतकऱ्यांची मोठी तारांबळ उडाली. भराडी नदीच्या पुराचे पाणी अनेक शेतकऱ्यांच्या शेतात शिरल्याने मोठे नुकसान झाले आहे. अनेक जणांच्या शेतात अंथरलेले ठिबक सिंचनाचे पाईप व संच पुराच्या पाण्यात वाहून गेले आहेत. फुलंब्री : पावसाअभावी खरीप पेरण्या खोळंबल्या फुलंब्री तालुक्याला वरुणराजाने हुलकावणी दिली आहे. गेले काही दिवस केवळ ढगाळ वातावरण निर्माण होत असल्याने शेतकऱ्यांची निराशा होत आहे. खरिपाच्या पेरण्या पूर्णपणे खोळंबल्या आहेत. काही शेतकऱ्यांनी मान्सूनच्या आशेवर धूळपेरणी केली. काहींनी विहिरीच्या पाण्यावर ठिबक सिंचनाद्वारे कपाशीची लागवड केली. मात्र, पावसाने ओढ दिल्यामुळे विहिरींची पाणीपातळी खालावली आहे. कपाशीसह इतर पिके आता करपू लागली आहेत. शेतकरी चातकासारखा मोठ्या पावसाची प्रतीक्षा करत आहे. कन्नड : रिमझिम पाऊस; १९ मिलिमीटरची नोंद एक महिन्याच्या खंडानंतर कन्नड शहर व तालुक्यात मंगळवार आणि बुधवारी रिमझिम पावसाने हजेरी लावली. तालुक्यात १९ मिमी. पावसाची नोंद झाली आहे. यामुळे वातावरणात गारवा पसरला. शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. तालुक्यात १ लाख हेक्टरवर खरिपाची तयारी पूर्ण आहे. पावसाचा जोर कमी असला तरी तो सर्वदूर आहे. मात्र, किमान ६५ मिमी. पाऊस झाल्याशिवाय शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी संदीप शिरसाट यांनी केले आहे. एक महिन्यानंतर पावसाने हजेरी लावली आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *