Headlines

टाकेद-वासळी रस्त्याचे काम ठप्प; विद्यार्थ्यांची गुडघाभर पाण्यातून वाट:तीन महिन्यांपासून खोदकाम जैसेथेच; आमदारांच्या सूचनांना केराची टोपली‎




टाकेद-वासळी रस्त्याचे सिमेंट काँक्रिटीकरण सुरू असले तरी तीन महिन्यांपूर्वी खोदकाम करून ठेवलेल्या रस्त्याचे काम अद्याप सुरू झालेले नाही. पहिल्याच पावसात रस्त्यावर गुडघाभर पाणी साचल्याने ग्रामस्थ, शेतकरी, विद्यार्थी आणि वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असून, प्रशासनाच्या नियोजनशून्य कारभाराविरोधात संताप व्यक्त होत आहे. महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ (एमएसआयडीसी) मार्फत कोट्यवधी रुपये खर्च करून उभारण्यात येत असलेल्या टाकेद-वासळी रस्त्याच्या कामातील नियोजनशून्य कारभारामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. तब्बल तीन महिन्यांपूर्वी रस्ता खोदून ठेवून ‘लवकरच काम सुरू करण्यात येईल’ असे आश्वासन वासळी ग्रामपंचायतीला देण्यात आले होते. मात्र, आजतागायत प्रत्यक्ष कामाला सुरुवात झालेली नाही. गतवर्षी आंबेवाडी-इंदोरे रस्त्याचीही अशीच अवस्था करून जवळपास वर्षभर वाहतूक ठप्प ठेवण्यात आली होती. आता टाकेद-वासळी-सोनोशी मार्गालाही त्याच दुर्दशेला सामोरे जावे लागणार, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. या रस्त्याच्या कामाबाबत आमदार हिरामण खोसकर आणि आमदार माणिकराव कोकाटे यांनी संबंधित विभागाला सूचना देऊनही अधिकारी व ठेकेदारांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप होत आहे. टाकेद गटातील सर्व रस्ते विकासकामांची चौकशी करून जबाबदार अधिकारी व ठेकेदारांवर कारवाई करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे तालुकाध्यक्ष तथा वासळीचे सरपंच काशिनाथ कोरडे यांनी केली आहे. या निष्काळजी कारभाराविरोधात सरपंच कोरडे यांनी संबंधित विभागाकडे लेखी तक्रार दाखल केली आहे. या मार्गावरून दररोज विद्यार्थी ये-जा करतात. चिखल, पाणी आणि खड्ड्यांमुळे विद्यार्थ्यांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. प्रलंबित रस्त्याच्या कामासंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला; मात्र त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही टाकेद-वासळी रस्ता हा वासळी, कचरवाडी, बारशिंगवे, राहुलनगर, भोईरवाडी आणि सोनोशी या गावांना मुख्य बाजारपेठेशी जोडणारा महत्त्वाचा मार्ग आहे. मात्र, सध्या रस्ता जागोजागी खोदून ठेवण्यात आला असून, दोन्ही बाजूंना मातीचे ढिगारे टाकण्यात आले आहेत. पहिल्याच पावसात या मातीचा चिखल होऊन रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. त्यामुळे वाहनचालकांना रस्त्याचा अंदाज येत नसून अपघाताचा धोका वाढला आहे. वृक्षतोड आणि गटारे बंद रस्ता रुंदीकरणाच्या कामादरम्यान मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड करण्यात आल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. तसेच पाण्याचा निचरा होण्यासाठी असलेली जुनी बंदिस्त गटारे माती टाकून बुजविण्यात आली आहेत. रस्त्यावरील खोदलेली माती शेतात टाकण्यात आल्याने पिकांचे नुकसान होत असून, पावसाचे पाणी शेतात साचण्याची समस्या निर्माण झाली आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *