Headlines

मनमाडमध्ये टर्फसाठी भाडेकरारास वंचित बहुजन आघाडीकडून विरोध:नगरपालिकेसमोर धरणे आंदोलन करत ठराव रद्द करण्याची मागणी‎




मनमाड नगरपालिकेने आययूडीपी विभागातील जागा टर्फसाठी भाडेकराराने देण्याचा घेतलेला निर्णय जनहितविरोधी असल्याचा आरोप करत वंचित बहुजन आघाडी शहर शाखेतर्फे बुधवारी सकाळी नगरपालिकेच्या प्रवेशद्वारासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. याबाबत पालिका प्रशासनाला निवेदन देण्यात आले. नगरपरिषद हद्दीतील आययूडीपी साईट क्रमांक १८ मधील जागा गोरगरीब व बहुजन समाजातील मुलांच्या मनोरंजनासाठी तसेच सार्वजनिक उद्यानासाठी राखीव ठेवण्याऐवजी ती खासगी वापरासाठी भाडेकराराने देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीने केला आहे. बुधवारी सकाळी शहराध्यक्ष विलास अहिरे यांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या कार्यकर्त्यांनी धरणे आंदोलन केले. नगरपालिकेने १० एप्रिल रोजी झालेल्या सभेत ठराव क्रमांक १० नुसार सदर जागा भाडेकराराने देण्याचा निर्णय घेतला असून, त्या ठिकाणी टर्फचे काम सुरू झाल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले. सदर जागा सार्वजनिक वापरासाठी राखून ठेवावी, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीने केली होती. मात्र, प्रशासनाने कोणतीही ठोस कारवाई न केल्याने आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले. हे आंदोलन सध्या स्थगित करण्यात आले असून, ठराव रद्द न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला. आंदोलनात शहराध्यक्ष विलास अहिरे, जिल्हा उपाध्यक्ष आनंद शिनगारे, जिल्हा सचिव खलील शेख, जिल्हा नेते दीपक साळवे, संदीप पवार आदींसह संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *