Headlines

फायर ऑडिटकडे पीडब्ल्यूडीच्या 37 दिवस दुर्लक्षाने तीन बाळांचा बळी:अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयात व्हेंटिलेटरच्या स्फोटाने आग




येथील जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या तिसऱ्या मजल्यावरील नवजात बालकांच्या अतिदक्षता विभागात (एसएनसीयू) सोमवारी पहाटे ३.३० वाजता व्हेंटिलेटरमध्ये स्फोट होऊन आग भडकली. या घटनेत तीन नवजात बालकांचा होरपळून मृत्यू झाला. ३६ बालकांना तेथून बाहेर काढण्यात आले. त्यातील ५ जणांना दुखापत झाल्याने अन्य रुग्णालयांत दाखल करण्यात आले. या रुग्णालयाच्या फायर ऑडिटची मुदत २१ ऑगस्टला संपली. तत्पूर्वीच रुग्णालय प्रशासनाने हालचाली सुरू केल्या. सरकारी यंत्रणेत बऱ्याच वेळा महत्त्वाच्या कामांकडे दुर्लक्ष होते. ही बाब लक्षात घेऊन रुग्णालयाचे प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ. विनोद पवार यांनी पीडब्ल्यूडीला फायर ऑडिट करण्यासाठी २५ जून रोजी पत्र दिले होते. त्यावर कार्यवाही झाली नाही. म्हणून त्यांनी १७ जुलैला स्मरणपत्रही पाठवले. मात्र त्याकडे ३७ दिवस दुर्लक्ष केल्याने ३ नवजात बाळांचा बळी गेला. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता सागर शेंडे म्हणाले की, आम्ही फायर ऑडिटची प्रक्रिया सुरू केली होती. आग विझविण्याच्या यंत्रांच्या रिफिलिंगचे काम पूर्ण झाले आहे. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी या घटनेच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले असून मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ५ लाख रुपये आर्थिक मदतीची घोषणा केली आहे. मृतांत अंजनगाव सुर्जी येथील गायत्री चोपडे यांच्या पाच दिवसांच्या मुलाचा, पुलगाव येथील पूजा बोरगे यांच्या दोन दिवसांच्या मुलाचा आणि मेळघाटातील गोराळा येथील किरण बेठेकर यांच्या दहा दिवसांच्या मुलीचा समावेश आहे. प्राथमिकदृष्ट्या शॉर्टसर्किटमुळे ही दुर्घटना घडली असावी, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. विशेष म्हणजे, जिल्हा स्त्री रुग्णालय वर्षभरापूर्वी जुन्या इमारतीतून नव्या इमारतीत स्थलांतरित झाले होते. त्यामुळे नव्या इमारतीतील अग्निसुरक्षा आणि विद्युत यंत्रणांच्या कार्यक्षमतेबाबतही प्रश्न उपस्थित झाले आहेत. सात सदस्यीय समितीकडून चौकशी- मंत्री आबिटकर आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर म्हणाले की, व्हेंटिलेटरचा स्फोट कशामुळे झाला, अग्निसुरक्षा यंत्रणा का कार्यरत नव्हती, तसेच प्रशासकीय पातळीवर कोणत्या त्रुटी राहिल्या, याच्या चौकशीसाठी आरोग्य विभागाच्या आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली सात सदस्यीय चौकशी समिती स्थापन करणार आहे. त्यात विद्युत विभागाचे मुख्य अभियंता, आयएमएचे डॉक्टर, अन्य तज्ज्ञांचा समावेश असेल. या तीन चुकांमुळे गेले निष्पाप बालकांचे प्राण
1. रुग्णालयाने स्मरणपत्र पाठवूनही पीडब्ल्यूडी विद्युत विभागाने फायर ऑडिट केले नाही १७ जुलैला प्रभारी वैद्यकीय अधीक्षकांनी पीडब्ल्यूडीच्या विद्युत विभाग कार्यकारी अभियंत्यांना पाठवलेल्या स्मरणपत्रात म्हटले होते की, सेफ्टी ऑडिट अग्निशमनच्या नाहरकत प्रमाणपत्राची वैधता संपल्यास आपत्कालीन परिस्थितीत कायदेशीर अडचण निर्माण होऊ शकते. त्यामुळे फायर सेफ्टी ऑडिट तत्काळ करून फॉर्म बी सादर करावा. 2. महिनाभरापूर्वी वॉशिंग मशीन जळाल्याचे वरिष्ठांपासून दडवले ज्या अतिदक्षता विभागात सोमवारी ही घटना घडली त्या दुर्घटनाग्रस्त विभागाज‌वळील दुसऱ्या युनिटमध्ये महिनाभरापूर्वी वॉशिंग मशीन जळाले होते. मात्र तेथील कर्मचाऱ्यांनी हा प्रकार वरिष्ठांना सांगितला नाही. अन्यथा तेव्हाच विद्युत यंत्रणेतील बिघाड समोर आला असता आणि ही दुर्घटना टळली असती. 3. आग लागली तरी रुग्णालयातील फायर अलार्म यंत्रणा वाजलीच नाही एवढी मोठी आग लागूनही फायर अलार्म वाजला नाही. तसेच फायर फॉगरही कार्यान्वित झाले नाही. विशेष म्हणजे या दोन्ही यंत्रणा तुलनेने नव्याच आहेत. तरीही हे घडले. ही यंत्रणा कुणी बसवली होती, हे तूर्तास कळू शकले नाही. फायर अलार्म यंत्रणा वाजलीच नसल्याने या यंत्रणेच्या गुणवत्तेवर शंका उपस्थित होत आहे. आई-बाप बनल्याचा आनंद काही तासांतच हिरावला आगीत जळून कोळसा झालेले चिमुकल्यांचे मृतदेह बघून स्वप्निल किरण बोरगे, पुलगाव आणि प्रफुल्ल नागोराव चोपडे, अंजनगाव सुर्जी, किरण बेठेकरची (रा.बोराळा, ता. चिखलदरा) आई बसंती जयराम काळे यांनी हंबरडा फोडला. बोरगे म्हणाले, रुग्णालयाच्या निष्काळजीपणामुळे आमचा आई-बाप बनण्याचा आनंद काही तासांतच हिरावला गेला. या घटनेस रुग्णालयाची संपूर्ण यंत्रणा जबाबदार आहे. त्यांनीच आमच्या बाळाचा जीव घेतला. यात जबाबदारांना शिक्षा व्हायला हवी, असे इतर नातेवाईक म्हणाले. स्वत:च्या जिवाची पर्वा न करता ३६ बाळांना वाचवणाऱ्यांना सलाम परिचारिका ललिता बेठेकर यांच्यासह इतर परिचारिका, कर्मचाऱ्यांनी जिवाची पर्वा न करता आग लागलेल्या अतिदक्षता विभागात प्रवेश केला. तेथून ९ नवजात बाळांना बाहेर काढले. ही आग फैलावली तर दुसऱ्या युनिटमधील अतिदक्षता विभागालाही धोका होऊ शकतो, असे लक्षात आल्यावर त्यांनी प्रसंगावधान राखत तिकडे धाव घेतली आणि तेथून ३० नवजातांना बाहेर काढले. या परिचारिका, कर्मचाऱ्यांनी एकूण ३९ बालके बाहेर काढली. त्यातील ३६ बाळे सध्या सुखरूप आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *