Headlines

केंद्रीय सहकार मंत्रालयाच्या स्थापनेला 5 वर्षे पूर्ण:29 जूनपासून महाराष्ट्रात 'सहकार सप्ताह', पुणे, मुंबई अन् सांगलीत विविध कार्यक्रमांचे आयोजन




भारत सरकारने 6 जुलै 2021 रोजी केंद्रीय सहकार मंत्रालयाची स्थापना केली होती. या मंत्रालयाच्या स्थापनेला 2026 मध्ये पाच वर्षे पूर्ण होत आहेत. या निमित्ताने, सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य यांच्यातर्फे 29 जून 2026 ते 6 जुलै 2026 या कालावधीत सहकार सप्ताह साजरा करण्यात येणार आहे. पुणे, मुंबई आणि सांगली येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार असल्याची माहिती राज्याचे सहकार आयुक्त दीपक तावरे आणि महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर यांनी दिली. सहकार सप्ताहाची सुरुवात 27 जून रोजी सकाळी 9 वाजता यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, कोथरूड येथे सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या मेळाव्याने होईल. यात सहकाराची धोरणे आणि योजनांविषयी जागृती केली जाईल. 28 जून रोजी याच ठिकाणी सकाळी 9 वाजता होणाऱ्या मेळाव्यात सहकारी संस्थांची अखंडता जपण्याबाबत मार्गदर्शन केले जाईल. त्याच दिवशी सकाळी 10.30 वाजता औंध येथील पं. भीमसेन जोशी नाट्यगृहात विद्यार्थी मेळावा आयोजित करण्यात आला आहे. 29 जून रोजी सकाळी 9 वाजता सक्सेस क्लब, क्लब हाऊस, डॉ. होमी भाभा रोड, एनसीएल को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी, पंचवटी, पाषाण, पुणे येथे सहकार ध्वज फडकवून सहकार वृद्धीसाठी शपथ घेतली जाईल. त्यानंतर पंचवटी, पाषाण रस्त्यावर वृक्षारोपण करण्यात येईल. याच ठिकाणाहून इंटरनॅशनल सेंटरपर्यंत सहकार दिंडी काढण्यात येणार आहे. सकाळी 11 वाजता इंटरनॅशनल सेंटर येथे ‘सहकारातील एकता आणि कृती’ या विषयावर परिसंवाद होणार आहे. 30 जून 2026 रोजी सकाळी 10.30 वाजता स्कूल ऑफ लॉ, एमआयटी, कोथरूड येथे सहकार कायदे व धोरण याविषयी मार्गदर्शन केले जाईल. 1 जुलै 2026 रोजी सकाळी वैकुंठ मेहता संस्था, औंध येथे होणाऱ्या मेळाव्यात शैक्षणिक आणि संस्थात्मक दृष्टिकोनातून मांडणी केली जाईल. 2 जुलै रोजी सकाळी 9 वाजता निसर्ग कृषी संस्थेत हरित व विषमुक्त शेती उपक्रम राबविला जाणार आहे. 2 जुलै रोजी संध्याकाळी 5.30 वाजता इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअर्स येथे ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग आणि सौरऊर्जा’ या विषयासंदर्भात कर्नल शशिकांत दळवी मार्गदर्शन करतील. 3 जुलै रोजी सकाळी 10.30 वाजता कॉसमॉस बँकेच्या मुख्यालयात मेळावा आयोजित करण्यात येणार आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *