Headlines

सध्याचे लोकप्रतिनिधी जनतेचे शत्रू:माजी मंत्री डॉ. सुनील देशमुख यांचा गंभीर आरोप, प्रशासनावरही ताशेरे ओढले




अमरावती जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉ. सुनील देशमुख यांनी शनिवारी माध्यमांसमोर शहरातील विविध प्रलंबित योजना आणि सध्याच्या समस्यांवर तीव्र चिंता व्यक्त केली. ज्या लोकप्रतिनिधींनी या समस्या सोडवायला हव्यात, ते सरकारकडून ठोस कृती करून घेण्याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप त्यांनी केला. यामुळे तेच जनतेचे शत्रू (एनिमी ऑफ द पीपल) असल्याचा गंभीर ठपका त्यांनी ठेवला. यावेळी त्यांनी प्रशासनावरही कठोर शब्दांत ताशेरे ओढले. डॉ. देशमुख यांनी स्वतः १५ वर्षे राज्य सरकारमध्ये काम केले आहे, ज्यात त्यांनी वित्त व नियोजन राज्यमंत्रीपदही सांभाळले होते. त्यांच्या कार्यकाळातील कामांची तुलना सध्याच्या स्थितीशी करत त्यांनी अनेक बाबींकडे जनतेचे लक्ष वेधले. लोकप्रतिनिधी हे लोकांचे हक्क आणि सोयी-सुविधांसाठी काम करणारी यंत्रणा आहे, परंतु सध्याची परिस्थिती पाहता ते तसे वागताना दिसत नाहीत, असे ते म्हणाले. त्यांनी कोणार्क कंपनीला दिलेल्या स्वच्छता कंत्राटातील अनागोंदी, भ्रष्टाचार आणि हतबल झालेले नागरिक या मुद्द्यापासून सुरुवात केली. भविष्यात लादला जाणारा मालमत्ता कर, कायदा व सुव्यवस्था, विस्कळीत झालेली वाहतूक व्यवस्था, अतिक्रमणाने गिळंकृत झालेले रस्ते, व्यापारी संकुलाच्या भाडेवाढीवर मनपाने साधलेले मौन, वर्षानुवर्षांपासून रखडलेली भुयारी गटार योजना यावरही त्यांनी भाष्य केले. याशिवाय, वर्षभरापासून बंद पडलेला राजकमल चौकातील रेल्वे उड्डाणपूल, सीएसटीऐवजी दादरपर्यंतच धावणारी अंबा एक्सप्रेस, सायन्स कोर मैदान व परकोटाची दूरवस्था, फिशरीज हब, काँक्रीट रस्त्याची ढासळलेली गुणवत्ता आणि जीएमसीच्या जागेचा वाद अशा अनेक मुद्द्यांवर त्यांनी सविस्तरपणे चर्चा केली. या सर्व समस्यांसाठी स्थानिक लोकप्रतिनिधी आणि वचकहीन झालेले प्रशासन दोषी असल्याचा ठपका त्यांनी ठेवला. यावेळी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते ॲड. दिलीप एडतकर, माजी महापौर विलास इंगोले व मिलींद चिमोटे, महानगर अध्यक्ष बबलू शेखावत, किशोर बोरकर आदी मान्यवर उपस्थित होते. महापालिका आयुक्तांकडे लक्ष वेधत डॉ. देशमुख म्हणाले की, गेल्या काही वर्षांपासून शहराच्या विविध भागांची पाहणी करणे, अधिकाऱ्यांना निर्देश देणे, जनतेच्या पैशातून फोटोसेशन करून वृत्त प्रसारित करणे आणि काही दिवसांतच तीच स्थिती पुन्हा उद्भवणे असे चक्र सुरू आहे. अधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांसारखे वागावे, असे आवाहन त्यांनी केले. बेलोरा विमानतळाचा प्रारंभ असो की प्रचंड वर्दळ असलेला इतवारा बाजारातील उड्डाणपूल, या मुद्द्यांवर डॉ. सुनील देशमुख यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात धाव घेतली होती. त्यानंतर शासनाला ते प्रकल्प ठराविक वेळेत पूर्ण करण्यासाठी धावपळ करावी लागली. मात्र, अशाप्रकारे मी किती वेळा कोर्टात जावे, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *