![]()
मराठा समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक उन्नतीसाठी राज्य शासन पूर्णपणे कटिबद्ध आहे. ‘सारथी’ (छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था) संस्थेचे कार्य अत्यंत उल्लेखनीय आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. पुणे येथील गणेश कला क्रीडा मंच येथे संघ लोकसेवा आयोग, महाराष्ट्र लोकसेवा आयोग व इतर स्पर्धा परीक्षांमधील यशस्वी विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांच्या सन्मान सोहळ्यात ते बोलत होते. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, अण्णासाहेब पाटील महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, ‘सारथी’चे अध्यक्ष अजित निंबाळकर आणि इतर मान्यवर उपस्थित होते. मुख्यमंत्री फडणवीस यांनी ‘सारथी’च्या कार्याचा आढावा घेतला. सारथीच्या माध्यमातून आतापर्यंत १४० विद्यार्थी यूपीएससीमध्ये, १,१२४ विद्यार्थी एमपीएससीमध्ये आणि ५०० हून अधिक तरुण बँकिंग क्षेत्रात यशस्वी झाले आहेत. तसेच, १३ हजारांपेक्षा जास्त युवक विविध कौशल्य विकासातून रोजगारक्षम बनले आहेत. मराठा समाजातील आर्थिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी अनेक योजना राबवल्या जात आहेत. व्यावसायिक शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्कात ५० टक्के सवलत दिली जात आहे. मोठ्या शहरांत शिक्षणासाठी ‘भाऊसाहेब पंजाबराव देशमुख निर्वाह भत्ता योजना’ सुरू असून, विद्यार्थ्यांना ६० हजार रुपयांपर्यंत आर्थिक मदत दिली जात आहे. उद्योजकता विकासासाठी अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या माध्यमातून महत्त्वपूर्ण कार्य झाले आहे. या महामंडळाने पाऊणे दोन लाखांपेक्षा अधिक उद्योजक तयार केले असून, ७,५०० कोटी रुपयांपेक्षा जास्त कर्ज उपलब्ध करून दिले आहे. स्पर्धा परीक्षांमध्ये गुणवत्तेने पात्र ठरूनही जागांच्या कमतरतेमुळे शासकीय नोकरी न मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी सरकार ‘निपुण सेतू’ उपक्रम सुरू करणार आहे. या उपक्रमाद्वारे अशा विद्यार्थ्यांना खाजगी क्षेत्रात रोजगाराच्या संधी मिळवून दिल्या जातील आणि त्यांच्या प्रशिक्षणाचा पूर्ण खर्च शासन उचलणार आहे. मुख्यमंत्र्यांनी युवकांना कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि ड्रोन तंत्रज्ञानासारख्या आधुनिक कौशल्यांकडे वळण्याचे आवाहन केले. ‘सारथी’ची नाशिक, नागपूर, कोल्हापूरसह ६ विभागीय केंद्रे व वसतिगृहांची कामे पुढील वर्षभरात पूर्ण होणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी ‘सारथी’ला केवळ शासकीय योजना राबवणारी संस्था नसून, सामाजिक परिवर्तन आणि युवा सक्षमीकरणाची प्रभावी चळवळ असल्याचे म्हटले. संस्थेच्या बळकटीकरणासाठी राबविण्यात आलेल्या १ हजार ३६० कोटी रुपयांच्या वसतिगृह व कार्यालयीन प्रकल्पांचा त्यांनी उल्लेख केला. यशस्वी विद्यार्थ्यांना प्रशासकीय सेवेत काम करताना नेहमी सामान्य नागरिकाला केंद्रबिंदू ठेवून सेवा करण्याचे आवाहन त्यांनी केले.
Source link
'सारथी'चे कार्य उल्लेखनीय: मुख्यमंत्री फडणवीस:मराठा समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध, यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार