![]()
आम्ही केतनच्या मृत्यूबद्दल सियाला प्रश्न विचारत होतो आणि हे लग्न जुळवणारी तिची आत्या तिला ओढत घेऊन गेली… आमचा संशय बळावला- विशाल अग्रवाल पोलिस मृतदेह घेऊन आले तेव्हा महिला पोलिस गर्दी कमी करण्यासाठी म्हणाल्या, ‘अरे, आहे जीव. जाऊ द्या लवकर हॉस्पिटलला’ हे ऐकून सियाच्या चेहऱ्यावरील हावभाव बदलले होते. १८ जूनला सियाच्या आईने आम्हाला फोन केला की केतन गडावरून पडला. मग आम्ही तिथे पोहोचलो. पोहोचल्यानंतर मृतदेह काढायला वेळ लागला. आम्हाला तिथे पोलिसांनी सांगितले की तो गेलाय. जेव्हा मृतदेह घेऊन आले तेव्हा पोलिसांना जमलेल्या लोकांची गर्दी कमी करायची होती. तेव्हा महिला पोलिस म्हणाल्या, ‘अरे आहे जीव, जाऊ द्या लवकर हॉस्पिटलला, वाचू शकतो पोरगा.’ हे ऐकून सियाच्या चेहऱ्यावरील हावभाव बदलले होते. नंतर बघितलं की केतनचं तोंड बांधलेलं होतं. मी म्हटले, ‘साहेब, अरे उघडून तर दाखवा, माझाच मुलगा आहे का?’ चेहरा बघून रडारड सुरू झाली. या वेळी सियाचे रडणे कृत्रिम वाटत होते. याच वेळी सियावर पहिला संशय आला. त्यानंतर माझ्या मुलीने सियाला ‘तुम्ही कुठे बसले होते, तो कसा पडला, असं नाही होऊ शकत की तो गडाच्या एवढ्या कॉर्नरला जाईल, हे पॉसिबल नाही,’ असे प्रश्न विचारले तर तिने त्या प्रश्नांची उत्तरं दिली नाहीत. दुसऱ्या दिवशी सिया आमच्या घरी आली होती. ती आल्यानंतर सगळ्या पाहुण्यांनी, मुलींनी तिला केतन गडावरून कसा पडला, कोणता पाय घसरला, उजवा की डावा, असे प्रश्न विचारले, तर ती फक्त रडत होती. तिने काहीही उत्तरं दिली नाहीत. आणि त्या रडण्यामध्ये पण नॅचरल वाटत नव्हतं. ज्या वेळी पाहुणे तिला प्रश्न विचारत होते त्या वेळी हे लग्न जुळवणारी तिची आत्या तिला ‘तू चल चल’ म्हणून अक्षरश: ओढत घेऊन गेली. सिया काही तरी बोलेल असं त्यांना वाटत होतं. आम्ही तर आमचा मुलगा गेला, कसा गेला म्हणून प्रश्न विचारतोय आणि हिचे तर रिॲक्शन वेगळेच आहेत म्हणून आमचा संशय आणखी बळावला. मग आम्ही संध्याकाळी कुटुंबीयांसोबत जरा बसून विचार केला. माझी मुलगी म्हणाली, ‘पप्पा, ये कुछ ठीक नहीं लग रहा है, मेरा भाई गया है लेकिन वो जवाब भी नहीं दे रहे हैं, ऐसा कैसा?’ मी जरा शांतपणे विचार केला. काल काय झालं ते सर्व आठवत होतो व घटनाक्रम जुळवण्याचा प्रयत्न करत होतो. नंतर आम्ही आमच्या सोसायटीचे सीसीटीव्ही बघितले. घरी येताना सिया कशी येतेय, कशी जातेय. ती रस्त्याने येताना रडतही नव्हती. वारंवार शंका येत असल्याने अखेर आम्ही पोलिसांना फोन केला. चौकशीची विनंती केली अन् त्यांनी ती सुरू केली. पुढे खूपच धक्कादायक गोष्टी समोर आल्या. असं सियाने आमच्यासोबत अन् केतनसोबत करायला नको होतं. केतन तर निसर्गप्रेमी होता आणि तो आधी पण लोहगडावर गेलेलाच होता ना? की पहिल्यांदाच ही घेऊन गेली असं काही नाही. १४ जूनला जेव्हा ते दोघे गडावर गेले तेव्हा ‘साप आला’असे म्हणत तिने त्याला ढकलण्याचा प्रयत्न केला. त्या वेळी तो बचावला. तिने त्याला मिठी मारली. त्या वेळीही त्यालाही अन् आम्हालाही काही शंका आली नाही. ती रोज भेटायची, फोनवर बोलायची. कधी रेस्टॉरंटला जेवायला जायचे. फिरायला जायचे. आता दिल्लीला जाणार होते खरेदीसाठी. माझ्या मुलीसोबत केतनच्या फोनवरुन बोलायची. माझ्या बायकोसोबत संध्याकाळी बोलायची. तिने अजिबात संशय येऊ दिला नाही. पूर्ण नियोजन करून केतनला मारल. की कुणाला संशय यायलाच नको. केतनला तिच्या अफेअरबाबत काहीही माहिती नव्हतं. पण त्याने एकदा शंका घेतली होती. सियाला जेव्हा तो फोन करायचा त्यावेळी बऱ्याचदा तिचा फोन व्यस्त असायचा. मुलाला असं वाटायचं की एवढं कोणाशी बोलते ही. त्यामुळे त्याने आम्हाला विचारलं एक-दोनदा की तुम्ही तिची माहिती घेतलीये का पूर्ण? तर आम्ही सांगितलं की आपल्या चुलत मामा-मामी आहेत, त्यांनी पूर्ण माहिती घेतलेली आहे. त्यानंतर पुन्हा कधी त्याने शंका घेतली नाही. अफेअरबाबतही नाही. कुठलाही पुरुष आपल्या होणाऱ्या बायकोच्या आयुष्यात दुसरा पुरुष कसा बघू शकतो? अफेअर असत तर त्याने लग्नच केले नसते. आणि असं काही नव्हतं ना की ती एकच मुलगी होती लग्नाला. मुली तर भरपूर आहेत ना… सियामुळे आम्ही आमचा मुलगा गमावला.
Source link
पुणे खून प्रकरण:केतनचे वडील विशाल अग्रवाल यांच्याकडून दिव्य मराठीच्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत प्रथमच पर्दाफाश