Headlines

शिंदे सेनेत जाऊनही भालकेंची राजकीय कोंडी कायम:सात नगरसेवकांनी सोडली साथ, भाजपकडून अडवणूक सुरूच, पंढरपुरात नाट्यमय घडामोडी‎



पंढरपूर नगरपालिका निवडणुकीत बुस्टर डोस मिळालेल्या भालके गटाच्या अडचणी कमी होताना दिसेनात. एका बाजूला नगरपालिकेच्या विकास कामांसाठी सत्ताधारी पक्षात प्रवेश केलेला असताना दुसऱ्या बाजूला सहकारी नगरसेवक फोडण्याचे काम पडद्याआडून भाजप करीत आहे. त्याचबरोबर

.

पंढरपूर तालुक्याच्या राजकीय पटलावर माजी आमदार प्रशांत परिचारक यांचा पांडुरंग परिवार आणि दिवंगत आमदार भारत भालके यांचा भालके गट सर्वात प्रभावशाली गट आहेत. दिवंगत कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक आणि दिवंगत भारत भालके यांच्या पश्चात या दोन्ही गटांमधील राजकीय संघर्ष कायम आहे. विधानसभा निवडणुकीत समाधान अवताडे यांच्या कमानीतून बाण सोडून परिचारकांनी भालके यांना दोन्ही वेळा पराभूत केले. तर भालके यांनी परिचारकांचा प्राण असलेल्या पंढरपूर नगरपालिकेत वर्मी वार केला आहे. प्रतिष्ठेचे नगराध्यक्ष पद जिंकून परिचारक यांच्या शिरपेचातील कोहिनूर काढून घेतला. मात्र त्याचवेळी भालके यांनी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनाही अंगावर घेतले. याचा परिणाम म्हणून नगराध्यक्ष पद, ११ नगरसेवक जिंकल्यानंतर ही भालके यांना नगरपालिकेत सुखाने कारभार करता येत नाही. भगीरथ भालके, प्रणिता भालके यांनी त्यांच्या नगरसेवकांसह एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. सत्तेच्या वळचणीला गेल्यानंतर तरी राजकीय उन्हाचे चटके शीतल होतील, अशी त्यांना अपेक्षा होती. परंतु भाजपने पडद्या आडून भालके यांच्या नगरसेवकात फूट पडण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे. भालके गटाच्या ७ नगरसेवकांनी मागील दीड महिन्यापासून वेगळी भूमिका घेत प्रणिता भालके यांची कोंडी केली आहे. एका बाजूला परिचारक गट, दुसऱ्या बाजूला आपलेच सहकारी नगरसेवक विरोधात.

भालकेंचे सात नगरसेवक भाजपकडे गेल्याने कोंडी

या सगळ्या अडचणीवर मार्ग काढण्यासाठी दोन दिवसांपूर्वी भालके पती पत्नींनी मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे. काही प्रलंबित कामांना गती देण्याचा प्रयत्न केलेला आहे. रखडलेला यात्रा अनुदान निधी पदरात पाडून घेतले आहे. नगरपालिकेकडील १७ कोटींची कामे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून परत नगरपालिकेकडे वळवण्याचा प्रयत्न सुरू केलेला आहे. एकंदरीत भालके यांच्या समोरील राजकीय वाट सत्ताधारी पक्षात जाऊन ही सोपी झालेली नाही.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *