Headlines

तरुणीवर वळूच्या हल्ल्यानंतर मोकाट जनावरांविरोधात पालिकेचा दंडुका:मनमाडचे नगराध्यक्ष पाटील यांच्या सूचना; हलगर्जी केल्यास कारवाईचा इशारा‎




शहरातील मोकाट जनावरांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, दत्त मंदिर रस्त्यावर भरदिवसा एका मोकाट वळूने दुचाकीस्वार तरुणीवर हल्ला करून तिला गंभीर जखमी केल्याची घटना घडली आहे. या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आल्यानंतर शहरभर संतापाची लाट उसळली असून, नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील मोकाट जनावरे तातडीने पकडून कोंडवाड्यात पाठविण्याचे आदेश देण्यात आले असून, या कामात हलगर्जीपणा करणाऱ्या संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा नगराध्यक्ष योगेश पाटील यांनी दिला आहे. बुधवारी सायंकाळी तेजस्विनी देवगिर या दुचाकीवरून घरी जात असताना धावणाऱ्या एका मोकाट वळूने अचानक त्यांच्यावर हल्ला केला. या धडकेत त्या गंभीर जखमी झाल्या. घटनेचा थरारक सीसीटीव्ही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. शहरातील प्रमुख रस्त्यांवर, चौकांमध्ये आणि बाजारपेठांमध्ये मोकाट जनावरांचा वावर वाढत असताना प्रशासनाने यापूर्वी प्रभावी उपाययोजना का केल्या नाहीत, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे. घटनेची माहिती मिळताच नगराध्यक्ष योगेश पाटील, नगरसेवक आणि पालिका पदाधिकाऱ्यांनी जखमी तेजस्विनी देवगिर यांची भेट घेऊन प्रकृतीची विचारपूस केली. त्यानंतर तातडीची बैठक घेऊन संबंधित यंत्रणांना कठोर सूचना देण्यात आल्या. मनमाड नगरपरिषदेकडून मोकाट जनावरे पकडण्यासाठी जनवर्धिनी विकास संस्थेला ठेका देण्यात आला आहे. याशिवाय आरोग्य विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनाही विविध भागांत पाहणी करून तातडीने कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. शहरातील मुख्य बाजारपेठ, दत्त मंदिररोड, एकात्मता चौक, महालक्ष्मी चौक, सराफ बाजार, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसर, राष्ट्रीय महामार्ग तसेच नववस्ती भागांमध्ये विशेष मोहीम राबविण्यात येणार असल्याची माहिती पाटील यांनी दिली. जनावरे मोकाट सोडणाऱ्या मालकांवरही कारवाई मोकाट जनावरे रस्त्यावर सोडणाऱ्या मालकांवरही प्रशासन आता कारवाईचा बडगा उगारण्याच्या तयारीत आहे. यासाठी संबंधित जनावरांच्या मालकांची बैठक घेऊन त्यांना सक्त सूचना देण्यात येणार आहेत. जनावरे रस्त्यावर सोडल्यामुळे नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण होत असल्याने यापुढे अशा प्रकारांकडे दुर्लक्ष केले जाणार नसल्याचेही नगराध्यक्षांनी स्पष्ट केले. नागरिकांनीही जबाबदारीची भूमिका घेत शहरात कुठेही मोकाट जनावरे दिसल्यास तातडीने नगरपरिषद किंवा आरोग्य विभागाला माहिती द्यावी, असे आवाहन त्यांनी केले. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरात स्वच्छता अभियानासोबतच मोकाट जनावरे आणि भटक्या कुत्र्यांच्या नियंत्रणासाठी व्यापक उपाययोजना राबविण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *