Headlines

संभाजीनगरात पोषण आहार काळाबाजार:कलीम कुरेशी गँगवर मकोका कारवाई, किराडपुऱ्यातील रहेमानिया कॉलनीत मारला होता पोलिसांनी छापा




सार्वजनिक वितरण प्रणालीचे रेशन धान्य आणि अंगणवाडीतील बालके तसेच गरोदर मातांसाठी असलेल्या पोषण आहाराची बेकायदेशीर साठवणूक करणाऱ्या कलीम छोटू कुरेशीसह त्याच्या गुन्हेगारी टोळीवर पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी मकोका अंतर्गत कारवाई केली आहे. १२ जून रोजी गुन्हे शाखेने किराडपुऱ्यातील रहेमानिया कॉलनी येथील एम. आर. फंक्शन हॉलच्या तळमजल्यावरील गाळ्यावर छापा टाकला होता. या कारवाईत शासनामार्फत मिळणारा गहू, तांदूळ, मका, ज्वारी, साखरेसह महिला व बालविकास विभागाचा पोषण आहार असा एकूण १७ लाख ६ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता. याप्रकरणी जिन्सी पोलिस ठाण्यात दोन गुन्हे दाखल आहेत. स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी संघटित टोळी बनवून कलीम याने हा गुन्हा केल्याने पोलिस आयुक्तांनी ही कारवाई केली आहे. या टोळीचा मुख्य सूत्रधार माजी नगरसेविकेचा पती कलीम कुरेशी आणि शेख अजहर हे फरार असून समीर कुरेशी, फहाद शुत्तारी, फरदीन पठाण आणि आवेज कुरेशी यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास सहायक पोलिस आयुक्त सागर देशमुख करत आहेत. संघटित गुन्हेगारीला थारा नाही शहरात सुरू असलेली संघटित गुन्हेगारी कुठल्याही गुन्ह्याच्या बाबतीत खपवून घेतली जाणार नाही. या गुन्हेगारांचा समूळ नायनाट करण्यासाठी पोलिस दल कार्यरत आहे. सोनसाखळी चोरी करणाऱ्या गँगवरही मकोका लावला आहे. आता पोषण आहार परराज्यात विकणाऱ्या टोळीवर देखील कारवाई केली आहे. -प्रवीण पवार, पोलिस आयुक्त, छत्रपती संभाजीनगर परराज्यात विक्रीचे धागेदोरे मिळाल्याने कडक कारवाई शहर व ग्रामीण भागातून गोळा केलेला रेशनचा तांदूळ वाळूजमधील एका राइस प्रोसेसिंग युनिटमध्ये नेला जायचा. तो रेशनचा वाटू नये म्हणून गरम पाण्याने धुवून, आकर्षक पॅकिंगमध्ये भरून गुजरातेत पाठवला जात होता. महाराष्ट्रातील बालकांच्या हक्काचा तांदूळ परराज्यात जात असल्याने आयुक्तांनी कठोर भूमिका घेत मकोका कारवाई केली आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *