Headlines

गृहिणीने दाखवले धाडस, चोराला ठणकावले – चालता हो…:‘आईसह मलाही मारलं असतं म्हणून धीर एकवटला, अन् कोयता घेऊन चोराला घरातून पिटाळून लावलं’




बीड बायपास रोडवर शिवकृपा कॉलनीत शुक्रवारी पहाटे चोरटा एका घरात शिरला. घरात स्वाती कुलकर्णी व त्यांच्या आई होत्या. चोरट्याला पाहून त्या घाबरल्या नाहीत. उलट प्रसंगावधान दाखवत फांद्या कापायचा कोयता घेऊन त्यांनी चोरट्याला घरातून पिटाळून लावले. पहाटेचा हा थरार त्यांच्याच शब्दांत… पहाटेची वेळ होती. मी आणि माझी वृद्ध आई दोघीच घरात गाढ झोपलो होतो. पती गावाकडे गेले होते. अचानक खालच्या लोखंडी गेटचा खाडकन आवाज झाला आणि माझी झोप चाळवली. ‘काहीतरी गडबड आहे,’ अशी शंका मनात आली. मी उठले आणि बाहेर येऊन पाहिलं तर गेट उघडं होतं. वाऱ्यामुळं उघडलं असं वाटलं. मी गेट बंद केलं आणि पुन्हा घरात आले, परंतु मन मानायला तयार नव्हतं. वरच्या मजल्यावरून काहीतरी हलल्याचा अस्पष्ट आवाज येत होता. मी धीर एकवटला आणि पावलाचा आवाजही न होऊ देता वर गेले. समोरचं दृश्य पाहून माझ्या काळजाचा ठोकाच चुकला. एक साधारण तिशीचा तरुण कपाटात हात घालून चोरी करत होता… क्षणभर भीती वाटली, पण मी स्वतःला सावरलं. आरडाओरडा केला तर त्यानं आईवर किंवा माझ्यावर हल्ला केला असता. असे अनेक विचार मनात येत होते. पण धीर करून मी शांतपणे पुन्हा खाली आले. घरात झाडांच्या फांद्या छाटण्यासाठी ठेवलेला धारदार कोयता हातात घेतला. माझ्या मनगटात एक अजब ताकद संचारली होती. मी पुन्हा वर गेले आणि निर्भीडपणे त्याच्या समोर उभी राहिले. एक वेगळीच ऊर्जा आत संचारल्यासारखी वाटत होती. “हात बाजूला कर अन् चालता हो इथून…’
तो चोरटा मला घाबरवण्यासाठी दोन पावलं पुढं आला. त्याच सेकंदाला कसलाही विचार न करता मी थेट त्याच्या मानेलाच कोयता लावला. धारदार लोखंडाचा स्पर्श होताच त्याची बोलती बंद झाली. “खाली चाल…,’ मी सुनावलं. कोयता मानेवर तसाच ठेवून मी त्याला पायऱ्यांवरून खाली उतरवलं आणि थेट गेटच्या बाहेर हुसकावून लावलं. बाहेर पडताच संतापलेल्या चोरानं खाली पडलेली वीट उचलून माझ्या दिशेनं भिरकावली, पण मी सतर्क होते, मी चकवा देत ती वीट लीलया टोलवली. त्याच वेळी तो अंधारात पळून गेला नंतर लक्षात आले की त्याने घरातून एक फोन लांबवला आहे. आम्ही तातडीनं सातारा पोलिस ठाण्यात घडलेल्या घटनेची तक्रार नोंदवली. परंतु आज विचार करते तेव्हा वाटतं, मी त्या क्षणी डगमगले असते, तर काहीही घडू शकलं असतं, पण माझ्या धाडसानं आम्हा दोघींना वाचवल्यानं सुटकेचा नि:श्वास सोडला. दिव्य मराठी फर्स्ट पर्सन: स्वाती कुलकर्णी, गृहिणी (शब्दांकन : कमलेश राजकडे)



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *