![]()
बंगालच्या उपसागरात व अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण होऊन तो दाब पुढे सरकण्यासाठी आणि पाऊस बरसण्यासाठी चक्राकार वारे एक जुलै नंतर सर्वदूर झपाट्याने वाहतील आणि आभाळात काळ्या ढगांची गर्दी होऊन २ ते ८ जुलै या कालावधीत महाराष्ट्रासह विदर्भात सर्वदूर समाधानकारक पाऊस बरसेल, बुलडाणा जिल्ह्यात मात्र जुलै महिन्यात १० तारखेनंतर पाऊस विश्रांती घेईल, असा अंदाज येथील हवामान अभ्यासक प्रकाश पारेख यांनी वर्तवला आहे हवामानतज्ज्ञ प्रकाश पारेख म्हणाले, यंदा अल निनो च्या प्रभावामुळे अरबी समुद्र व पश्चिम बंगालच्या उपसागरात ज्या प्रमाणात कमी दाबाचा पट्टा जूनच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात निर्माण व्हायला पाहिजे तो निर्माण झाला नाही. त्यामुळे यंदा पाऊस जून महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात कुठे कमी तर कुठे पाऊस बरसला नाही. असे सांगून प्रकाश पारेख म्हणाले की, आता ती परिस्थिती जून नंतर जुलै च्या प्रारंभापासून बदलेल. ही परिस्थिती बदलल्यानंतर महाराष्ट्रात सर्वत्र आठवडाभर समाधानकारक पाऊस पडेल. हा अंदाज शेतकरी व नागरिकांसाठी खऱ्या अर्थाने आनंददायी येणार आहे. समुद्रातील पाण्याचे बाष्पीभवन होऊन भारतात काळे ढग आणण्यासाठी मेडल ज्युलियन व इंडियन ओशन डायपोल ही पाऊस बरसणारी सिस्टिम पण एक जुलै नंतर तयार होणार आहे याचाही फायदा सर्वत्र पाऊस बरसण्यावर होणार आहे. दुसरीकडे, येत्या काही दिवसांत पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने (IMD) वर्तवला आहे. राज्यातील चंद्रपूर आणि गडचिरोली या दोन जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट, तर कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील 20 जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. अनेक ठिकाणी मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. रविवारी रात्री मुंबई, उपनगर आणि ठाणे परिसरात जोरदार पावसाने हजेरी लावली. ठाण्यात रात्री 11 नंतर अवघ्या एका तासात 29 मिमी पावसाची नोंद झाली. चार दिवसांच्या विश्रांतीनंतर भिवंडी शहर आणि ग्रामीण भागातही मुसळधार पावसाने पुनरागमन केले. त्यामुळे उकाड्यापासून नागरिकांना दिलासा मिळाला असला तरी सखल भागात पाणी साचण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. ग्रामीण भागात खबरदारी म्हणून काही ठिकाणी वीजपुरवठाही तात्पुरता खंडित करण्यात आला. हंगामी कमी दाबाचा पट्टा सक्रिय; मान्सून आणखी पुढे सरकणार हवामान विभागाच्या माहितीनुसार, सध्या देशभरात पावसासाठी पोषक हवामान प्रणाली सक्रिय झाली आहे. हंगामी कमी दाबाचा पट्टा आणि इतर वातावरणीय प्रणालींमुळे मान्सून गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, झारखंड, बिहार, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडच्या आणखी काही भागांत पुढे सरकण्याची शक्यता आहे. याचाच परिणाम म्हणून महाराष्ट्रातही पावसाचा जोर वाढण्याची चिन्हे आहेत. 28 जून ते 4 जुलै या कालावधीत कोकण-गोव्यात बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज असून मध्य महाराष्ट्रातही अनेक भागांत जोरदार सरी कोसळू शकतात. काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. सांगोल्यात दमदार पाऊस; शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या सांगोला तालुक्यात अखेर दमदार पावसाने हजेरी लावली. अनेक दिवसांपासून पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी कमलापूर परिसरातील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्याशी संवाद साधला. नागपुरात वीज कोसळून बैलजोडीचा मृत्यू; शेतकऱ्याने स्वतः खांद्यावर औत घेत केली पेरणी दरम्यान, नागपूर जिल्ह्यातील भिवापूर तालुक्यातील सेलोटी गावात हृदयद्रावक घटना घडली आहे. 25 जून रोजी वीज कोसळून शेतकरी तानबा मरघडे यांच्या बैलजोडीचा मृत्यू झाला. खरीप हंगामाच्या तोंडावर मोठे नुकसान झाल्याने नवीन बैलजोडी घेणे शक्य नसल्याने त्यांनी मित्राकडून एक बैल आणला आणि दुसऱ्या बाजूला स्वतः खांद्यावर औत घेऊन चार एकर शेतात सोयाबीनची पेरणी पूर्ण केली. मरघडे यांनी सांगितले की, विजेच्या धडकेत सुमारे एक लाख रुपयांचे नुकसान झाले असून सरकारी मदत मिळण्याची प्रतीक्षा करण्यापेक्षा वेळेत पेरणी पूर्ण करणे आवश्यक असल्याने त्यांनी हा निर्णय घेतला. धरणक्षेत्रात अजूनही समाधानकारक पाऊस नाही भिवंडी परिसरात पावसाचे पुनरागमन झाले असले तरी धरण क्षेत्रात अद्याप समाधानकारक पाऊस झालेला नाही. त्यामुळे शहरात सुरू असलेली पाणीकपात कायम आहे. धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ व्हावी आणि पाणीटंचाई दूर व्हावी, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.
Source link
राज्यात पुन्हा मान्सून सक्रिय:कोकण, विदर्भासह 22 जिल्ह्यांना पावसाचा इशारा; चंद्रपूर- गडचिरोली या दोन जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट