Headlines

बोजवारा:शहरात दीड तास पाऊस, रस्त्यावर पाणी; नालेसफाईचा दावा पाण्यात, गल्लीत नाल्या तुंबून रस्त्यावर पाणी



लातूर शहर आणि जिल्ह्यात रविवारी (दि. २८) दुपारी आणि सायंकाळी झालेल्या मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले. या पावसामुळे उकाड्यापासून दिलासा मिळाला असला तरी, पहिल्याच मोठ्या पावसात शहरातील ड्रेनेज व्यवस्थेचा बोजवारा उडाल्याचे समोर आले आहे.

.

दुपारी साडेतीनच्या सुमारास आलेल्या दीड तासाच्या पावसामुळे जिल्हा परिषद महिला व बालकल्याण कार्यालय आणि सर्व शिक्षा अभियान कार्यालयाच्या आवारात गुडघाभर पाणी साचले. यामुळे शासकीय कामासाठी आलेल्या नागरिकांची मोठी गैरसोय झाली. तसेच, मुख्य बाजारपेठेत पाणी शिरण्याची भीती निर्माण झाल्याने व्यापाऱ्यांची धांदल उडाली. रस्त्यांवरील खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने अनेक दुचाकीस्वार घसरून पडण्याचे प्रकारही घडले.

सायंकाळी साडेसहाच्या सुमारास पुन्हा पावसाचा जोर वाढल्याने औसा रोड, कपिल नगर, वैभव चौक आणि खोरे गल्लीत नाल्या तुंबून रस्त्यावर पाणी आले. महापालिकेने १३६ मोठ्या नाल्यांची मान्सूनपूर्व सफाई केल्याचा दावा केला असला तरी, नागरिकांनी फेकलेल्या प्लास्टिकमुळे नाल्या चोक-अप झाल्याचे मनपाच्या प्राथमिक पाहणीत आढळले. मनपाच्या पथकाने तातडीने अडथळे दूर केले.

^मान्सूनपूर्व कामामध्ये नाल्यांची सफाई करण्यात आलेली आहे. नालीमध्ये कचरा, प्लास्टिक बॉटल-पिशव्या टाकू नये. जेणेकरून पाणी तुंबणार नाही . – रमाकांत पिडगे, विभागप्रमुख

पावसाळ्यासाठी स्वच्छता निरीक्षक आणि मुकादमांच्या नेतृत्वाखाली १५ कर्मचाऱ्यांचे विशेष आपत्कालीन पथक सज्ज ठेवले. संध्याकाळी उद्भवणाऱ्या पाणी साचण्याच्या तक्रारींचे निवारण टीम मार्फत केले जाणार आहे.

सायंकाळच्या पावसानंतर औसा रोड, कपिल नगर परिसरातील नाल्या तुंबल्याच्या तक्रारी आल्या. स्वच्छता विभागाने पाहणी केली असता, नागरिकांनी नाल्यांमध्ये टाकलेल्या प्लास्टिक बाटल्या आणि पिशव्यांमुळे पाण्याचा प्रवाह बंद झाल्याचे समोर आले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *