![]()
टाळ-मृदंगाच्या गजरात अकोला येथून सद्गुरू श्री संत वासुदेव महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे राजेश्वरनगरीत आगमन झाले. आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरकडे निघालेल्या या पालखी सोहळ्याचे भाविकांनी स्वागत केले. दर्शन घेतले.
.
जठार पेठ परिसरात भक्ती, श्रद्धा आणि आध्यात्मिक वातावरणाचा सुंदर संगम अनुभवायला मिळाला. श्री वासुदेव महाराज पालखीचे जठार पेठ येथे आगमन होताच भक्तांनी उत्साहात स्वागत केले. विधिवत पूजन केले. अॅड. धनश्री देव स्मृती सेवा प्रकल्प कार्यालयासमोर हा स्वागत व पूजन सोहळा पार पडला. यावेळी वंचित बहुजन आघाडी गटनेते नगरसेवक नीलेश देव यांच्या वतीने नीलेश देव मित्र मंडळ व अॅड. धनश्री देव स्मृती सेवा प्रकल्प यांच्या संयुक्त विद्यमाने पालखीचे पारंपरिक पद्धतीने स्वागत करण्यात आले. पालखी आगमनावेळी परिसरात मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते. उपस्थित भाविकांनी समाजातील सुख, समृद्धी, शांतता आणि सर्वांच्या कल्याणासाठी श्री वासुदेव महाराजांच्या चरणी प्रार्थना केली. संपूर्ण सोहळा भक्तिभावात संपन्न झाला. उत्साहपूर्ण वातावरण होते. या कार्यक्रमामुळे जठार पेठ परिसरात भक्तीचा उत्सव अनुभवायला मिळाला. उपस्थितांच्या मनात श्रद्धा आणि अध्यात्माचा संदेश रुजला.
वारकऱ्यांच्या भक्तीचा गौरव : भाजपातर्फे वारकरी परंपरेला वंदन करण्यात आले. पालखी सोहळ्याचे पूजन करण्यात आले. दर्शनाचा लाभ घेण्यात आला. खा. अनुप धोत्रे, आ. रणधीर सावरकर यांच्या हस्ते वासुदेव महाराज महाले यांचे पूजन व स्वागत करण्यात आले. संत ज्ञानेश्वर माऊली, संत तुकाराम महाराज, संत एकनाथ महाराज, मुक्ताबाई, सोपानदेव यांच्या संत परंपरेचा गौरव करण्यात आला. वारकरी परंपरेचाही गौरव करण्यात आला. संत वासुदेव महाराज यांचा वारसा वासुदेव महाराज महाले समर्थपणे पुढे नेत आहेत. कार्यक्रमात वक्त्यांनी सांगितले की पंढरपूरची ६०० कि.मी.ची पायदळ वारी म्हणजे केवळ यात्रा नाही. तो श्रद्धा आणि विश्वासाचा महोत्सव आहे. पाऊस-थंडीची चिंता न करता वारकरी सतत विठ्ठल नामाचा गजर करतात. पंढरीची महिमा वाढवतात. सर्व स्तरातील वारकरी जात-पात, धर्म विसरून “ज्ञानोबा-तुकाराम”च्या गजरात एकत्र येतात. हेच आपल्या संस्कृतीचे वैशिष्ट्य आहे. खासदार म्हणाले की, “संत ज्ञानेश्वर आणि तुकाराम महाराजांनी दिलेला समतेचा संदेश आजही तितकाच प्रासंगिक आहे. वारी ही महाराष्ट्राची ओळख आहे.” आमदार सावरकर यांनीही मनोगत व्यक्त केले. “वारकऱ्यांची पायी वारी म्हणजे तपश्चर्या आहे. भाजपा नेहमीच संत परंपरा आणि वारकरी संप्रदायाच्या पाठीशी उभी आहे,” असेही ते म्हणाले. याप्रसंगी भाजपचे मनपातील गटनेते पवन महल्ले, माधव मानकर, गिरीश जोशी, ॲड. यशवंत दादळे, प्रशांत अवचार, निकिता देशमुख, पंकज जायले, किशोर कुचके, डॉ. अमित कावरे, विवेक भरणे, अनिल यादव, सागर तिवारी, नगरसेवक हर्षद भाबरे, सागर शेगोकार, प्रशांत जोशी, मिलिंद राऊत, संदीप गावंडे, अनिता चौधरी, आरती धोगलीया, राजेंद्र गिरी, अजय शर्मा, ॲड. देव आशिष काकड आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
“जय वासुदेव’ च्या जयघोषात आणि भक्तिमय वातावरणात पालखीचे स्वागत करण्यात आले. उपस्थितांनी फुलांची उधळण करत श्री वासुदेव महाराजांच्या चरणी नतमस्तक होत पूजन केले. यावेळी सामूहिक आरती, दीपप्रज्वलन आणि प्रार्थना करण्यात आली. पालखीचे दर्शन घेण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. महिला, युवक तसेच ज्येष्ठ नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत कार्यक्रम अधिक मंगलमय केला. परिसरात भक्तिगीते आणि हरिनामाच्या गजरामुळे धार्मिक वातावरण निर्माण झाले होते. या प्रसंगी देव यांनी सांगितले कि, धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरा या समाजाला एकत्र आणण्याचे कार्य करतात. अशा कार्यक्रमांमधून श्रद्धा, संस्कार आणि सामाजिक ऐक्य अधिक दृढ होत असून सामाजिक कार्यासोबत सांस्कृतिक आणि आध्यात्मिक जतन करणे देखील आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.