![]()
राज्य विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आज सहावा दिवस आहे. काल पाचव्या दिवशी टीईटी (TET) पेपरफुटीच्या मुद्द्यावरून विरोधकांनी केलेल्या जोरदार गदारोळानंतर शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी सभागृहात याप्रकरणी अत्यंत महत्त्वाची माहिती दिली. “टीईटी पेपरफुटीचा गुन्हा अत्यंत संवेदनशील असून, या प्रकरणाची व्याप्ती पाहता थेट ‘SIT’ (विशेष तपास पथक) स्थापन करण्यात आली आहे. या घोटाळ्यात जे कोणी दोषी आढळून येतील, त्यांच्यावर थेट ‘मकोका’ (MCOCA) अंतर्गत कठोर कारवाई करण्यात येईल,” अशी मोठी घोषणा मंत्री दादा भुसे यांनी विधानसभेत केली. असा उघडकीस आला ‘टीईटी’ परीक्षा घोटाळा! ठाणे शहर पोलिस आयुक्तालयात दाखल गुन्ह्याचा दाखला देत शिक्षणमंत्र्यांनी सभागृहात अधिकृत निवेदन सादर केले. ते म्हणाले, “२८ जून २०२६ रोजी होणाऱ्या महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षेची (TET) प्रश्नपत्रिका काही लोक विक्री करणार असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीची खातरजमा करून पोलिसांनी तातडीने सापळा रचला आणि आरोपींना रंगेहात ताब्यात घेतले. त्यांच्याकडे सापडलेल्या प्रश्नपत्रिकांची शिक्षण विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून पडताळणी केली असता, त्या २८ तारखेच्या परीक्षेच्याच हुबेहूब प्रश्नपत्रिका असल्याचे समोर आले.” मुख्य आरोपींसह ३ जणांना अटक; देशात पोलिस पथके रवाना या प्रकरणात दोन संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, ३ आरोपींना पोलिसांनी आधीच बेड्या ठोकल्या आहेत. या आंतरराज्यीय रॅकेटची पाळेमुळे खणून काढण्यासाठी पोलिसांची विशेष पथके देशभरात रवाना झाली आहेत. सध्या बिहारमध्ये दोन पथके, हरियाणामध्ये एक पथक आणि दिल्लीत एक पथक आरोपींचा आणि त्यांच्या सूत्रधारांचा शोध घेत असल्याची माहिती भुसे यांनी दिली. पेपरफुटी रोखण्यासाठी ‘मकोका’चा बडगा “राज्यातील लाखो तरुण उमेदवारांच्या भवितव्याशी खेळणाऱ्या कोणत्याही टोळीला किंवा व्यक्तीला सोडले जाणार नाही. या गुन्ह्याची व्याप्ती मोठी असून, दोषींवर मकोका लावून त्यांना जन्माची अद्दल घडवली जाईल,” असा कडक इशारा शिक्षणमंत्र्यांनी सभागृहात दिला. काल विरोधकांनी भुसे यांच्या राजीनाम्यासाठी आणि ताफा अडवण्यासाठी तीव्र आंदोलन केले होते, त्याला आज सरकारने या मोठ्या घोषणेने उत्तर दिले आहे.
Source link
पावसाळी अधिवेशनाचा आज सहावा दिवस:TET पेपरफुटीवरून पुन्हा गदारोळाची शक्यता