Headlines

दुष्काळात फी वसूल करणाऱ्या शाळांनी खोडसाळपणा करू नये:मंत्री शिवेंद्रराजे भोसलेंचा इशारा; दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क माफ




दुष्काळात सरकारने फीस माफीचा जीआर काढला आहे, त्यामुळे फी वसूल करून शाळांनी खोडसाळपणा करू नये, असा इशारा सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी दिला आहे. राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय पथकाकडूनही पाहणी करण्यात आली आहे. आता लवकरात लवकर मदत जाहीर केली जाईल. आज केंद्रीय दुष्काळ पाहणी पथक मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार आहे. नुकसान मोठे असल्याने पंचनामे व्यवस्थित करून शेतकऱ्यांना योग्य मदत देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे, अशी माहितीही मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी दिली. ते धाराशिव येथे बोलत होते. राज्यातील दुष्काळी परिस्थिती घोषित केलेल्या भागातील कोणत्याही विद्यार्थ्याचे शिक्षण आर्थिक अडचणींमुळे थांबू नये, यासाठी उच्च व तंत्र शिक्षण विभागाने पुढाकार घेत दुष्काळी भागातील विद्यार्थ्यांकडून शालेय शुल्क माफ करण्यात आले असल्याचे शिवेंद्रराजे भोसले यांनी सांगितले आहे. असे असताना देखील काही शाळांकडून सक्तीने फी वसूल केली जात असल्याचे समोर आले. यावर फी वसूल करून शाळांनी खोडसाळपणा करू नयेत, असा इशारा भोसले यांनी दिला आहे. शाळांनी फी वसूल करू नये शालेय फीबाबत सरकारने जीआर काढला आहे. मात्र, शाळा फी घेत असतील तर ती वसूल करू नये, अशा कडक सूचना शाळांना देण्यात येतील. शासन निर्णय असताना त्याचे पालन व्हायलाच हवे. मात्र, काही शाळांकडून हा खोडसाळपणा केला जात असेल, तर त्यांच्याबद्दल माहिती घेऊ, असे मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी स्पष्ट केले. नवरात्रोत्सवाच्या पहिल्याच दिवशी आई तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी आले असताना ते बोलत होते. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी देवीकडे साकडे दुष्काळात शेतकऱ्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहता यावे आणि राज्यातील परिस्थिती सुधारावी, यासाठी आई तुळजाभवानीकडे साकडे घातल्याचे शिवेंद्रराजे भोसले यांनी सांगितले. यावेळी त्यांच्यासोबत भाजपचे आमदार राणाजगजितसिंह पाटील उपस्थित होते. शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत मिळवून देण्याचा आमचा प्रयत्न असल्याची माहिती राणाजगजितसिंह पाटील यांनी यावेळी दिली.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *