Headlines

पिंपरी-चिंचवडमध्ये धावत्या रुग्णवाहिकेतून रुग्ण स्ट्रेचरसह रस्त्यावर पडला:निगडीतील घटनेचा व्हिडिओ व्हायरल; नागरिकांनी पाठलाग करून वाहनाला रोखले




पिंपरी-चिंचवडमध्ये रुग्णवाहिकेतून रुग्ण थेट रस्त्यावर पडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. रुग्णाला रुग्णालयात घेऊन जाणारी रुग्णवाहिका रस्त्यावरून जात असताना अचानक मागील दरवाजा उघडला आणि रुग्ण स्ट्रेचरसह खाली पडला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, ही घटना निगडी परिसरात घडल्याचे सांगितले जात आहे. समोर आलेल्या व्हिडिओनुसार, रुग्णवाहिका भररस्त्यातून जात असताना तिचा मागील दरवाजा अचानक उघडला. त्यामुळे रुग्णाला झोपवलेले स्ट्रेचर थेट रस्त्यावर पडले. या घटनेमुळे रस्त्यावरील नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली. रुग्णवाहिका चालकाला हा प्रकार लक्षात आला नसल्याचे सांगितले जात आहे. नागरिकांनी तातडीने मदतीसाठी धाव घेतली रुग्ण रस्त्यावर पडल्याचे दिसताच स्थानिक नागरिक आणि वाहनचालकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. काही नागरिकांनी दुचाकीवरून रुग्णवाहिकेचा पाठलाग केला. त्यानंतर रुग्णवाहिकेला पुढे जाऊन थांबवत चालकाला मागे घडलेल्या गंभीर प्रकाराची माहिती दिली. चालक घटनास्थळी परतला घटनेची माहिती मिळाल्यानंतर रुग्णवाहिका चालक पुन्हा घटनास्थळी परतला. त्यानंतर रस्त्यावर पडलेल्या रुग्णाला स्ट्रेचरसह पुन्हा रुग्णवाहिकेत घेण्यात आले. मात्र, रुग्णवाहिकेचा दरवाजा उघडून रुग्ण रस्त्यावर पडण्याच्या या प्रकारामुळे रुग्णांच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. निष्काळजीपणामुळे संताप; कारवाईची मागणी रुग्णांना सुरक्षितपणे आणि तातडीने रुग्णालयात पोहोचवण्याची जबाबदारी असलेल्या रुग्णवाहिकेतच असा प्रकार घडल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे. रुग्णवाहिकेचा दरवाजा व्यवस्थित बंद होता का, तसेच सुरक्षेच्या नियमांचे पालन करण्यात आले होते का, असे प्रश्न उपस्थित होत आहेत. या प्रकरणाची चौकशी करून संबंधित चालकावर आणि जबाबदार यंत्रणेवर कारवाई होणार का, याकडे आता लक्ष लागले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *