![]()
चिकलठाणा एमआयडीसी परिसरातील मे. रॉयल बेकर्स अँड कन्फेक्शनर्स या बेकरीच्या कप केकमध्ये रबर व प्लास्टिकचे तुकडे आढळल्याची तक्रार प्राप्त झाली होती. यानंतर एफडीएच्या पथकाने मारलेल्या छाप्यात अस्वच्छतेसह नियमांचे उल्लंघन उघडकीस आल्याने या बेकरीचा परवाना निलंबित करण्यात आल्याची माहिती सहआयुक्त श्रीकांत करकळे यांनी दिली. अन्न सुरक्षा अधिकारी पी. एस. अजिंठेकर यांनी ७ ऑक्टोबर रोजी या बेकरीला भेट देऊन पाहणी केली. या तपासणीत अस्वच्छता तर आढळलीच, शिवाय उत्पादित अन्नपदार्थ आणि पाण्याच्या गुणवत्तेचे कोणतेही प्रयोगशाळा चाचणी अहवाल येथे उपलब्ध नव्हते. रि-पॅकिंगसाठी वापरल्या जाणाऱ्या साहित्याचे एनएबीएल प्रयोगशाळेचे फूड-ग्रेड प्रमाणपत्र नसल्याने अन्नात विषारी रसायने मिसळण्याचा धोका निर्माण झाला होता, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. तपासणीत उघडकीस आलेल्या मुख्य त्रुटी पुढील आदेशापर्यंत व्यवसाय करण्यास मनाई सार्वजनिक आरोग्याला असलेला तातडीचा धोका लक्षात घेऊन, परवाना प्राधिकारी तथा सहायक आयुक्त (अन्न) दयानंद विठ्ठल पाटील यांनी अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ च्या कलमांनुसार रॉयल बेकर्सचा परवाना (क्र. ११५२१०४४०००५९५) ८ ऑक्टोबरपासून पुढील आदेशापर्यंत निलंबित केला आहे. निलंबन कालावधीत बेकरीला कोणताही व्यवसाय करण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. दरम्यान, या पेढीवर कडक पाळत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. बेकरी चालकाने सर्व त्रुटींची पूर्तता करून त्याचा अहवाल आवश्यक पुराव्यांसह सादर केल्यानंतरच पुढील निर्णय घेतला जाणार आहे.
Source link
‘कप केक’मध्ये प्लास्टिक, रबर; रॉयल बेकर्सचा परवाना निलंबित:तक्रारीनंतर ‘एफडीए’ची कारवाई, अन्न नमुने प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी