![]()
पुण्यातील एस. एम. जोशी पुलावर सुरू असलेल्या एमपीएससी आंदोलनाचा आज अकरावा दिवस आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू आहे. आज माध्यमांशी बोलताना रोहित पवार यांनी एमपीएससीचे अध्यक्ष भीमनवार यांच्यावर टीका केली. भीमनवार जे आहेत, एमपीएससीचे अध्यक्ष, ते मुख्यमंत्री साहेबांचे जीवलग मित्र आहेत. ते विद्यार्थ्यांऐवजी मित्राची जास्त काळजी घेत आहेत, असा आरोप रोहित पवार यांनी केला. पुढे बोलताना रोहित पवार यांनी सरकारला अल्टिमेटम दिला. आज संध्याकाळपर्यंत काहीतरी निरोप द्या, विद्यार्थ्यांना भेटा, नाहीतर उद्या मात्र विद्यार्थी वेगळा निर्णय घेऊ शकतात. मग अध्यक्षांचा सोडा, सरकारचा देखील राजीनामा घ्यावा लागेल, असा इशारा त्यांनी दिला. आज संध्याकाळपर्यंत निर्णय घेऊन विद्यार्थ्यांशी चर्चा करावी आणि सरकारने काहीतरी ठोस निर्णय घ्यावा, अशी मागणीही रोहित पवार यांनी केली. अन्यथा उद्या विद्यार्थी वेगळा विचार करतील, असेही त्यांनी स्पष्ट केले. कोट्यावधी रुपयांची उधळपट्टी सुरू राज्य सरकारवर टीका करताना रोहित पवार म्हणाले, राज्य सरकारकडून शेतकरी वाऱ्यावर सोडण्यात आलेले आहेत, विद्यार्थी वाऱ्यावर सोडण्यात आले आहे. लोकांनी निवडून दिलेले सरकार असताना त्यांचे लोकांशी नाते तुटले आहे. दुष्काळात शेतकरी शेतमजूर विद्यार्थी यांना कुठलीही मदत जाहीर झालेली नाही. आता कोटी रुपयांचे लँड क्रूजर खरेदीसाठी घाट घातला जात आहे. लंडनमध्ये एका खाजगी कंपन्यांच्या कार्यक्रमाला सरकारी अधिकारी सरकारी खर्चातून जात आहेत. पाच कोटी रुपये फक्त आयोजनासाठी दिले आहेत. त्यामुळे या अशा पद्धतीने कोट्यावधी रुपयांची उधळपट्टी सुरू असल्याचा आरोप पवारांनी केला आहे. मुख्यमंत्री साहेबांना टार्गेट करावे लागेल पुढे बोलताना रोहित पवार म्हणाले, मुख्यमंत्री साहेबांना टार्गेट करावे लागेल ना? भीमनवार जे आहेत एमपीएससीचे अध्यक्ष ते जे मुख्यमंत्री साहेबांचे जीवलग मित्र असतील, कॉलेजमध्ये त्यांनी एकत्रीत अभ्यास केला असेल. त्याच्याच बरोबर आयएस अधिकारी कोणी बनवले? तर मुख्यमंत्र्यांनी बनवले आहे. त्याचबरोबर 6 वर्षे आरटीओ कमिशनर त्यांना कोणी केले असेल? तर ते मुख्यमंत्री साहेबांनी केलेले आहे. त्याच्याबरोबर आयोगाचे अध्यक्ष सुद्धा देवेंद्र फडणवीस साहेबांनी बनवलं. मग आता मित्राबद्दल निर्णय घेताना जर विद्यार्थ्यांकडून मागणी होत असेल, मित्राला हटवा तर दोन-तीन दिवसात हा विषय व्हायला पाहिजे होता. पण एवढा काळ जर हा विषय खेचला जात असेल तर मुख्यमंत्रीसाहेब मित्राचा विचार जास्त करत आहेत. सामान्य परिवारातील विद्यार्थ्यांचा करत नाही हे कुठे तरी सिद्ध होतंय. कारण भीमनवारांना टार्गेट करत असताना ज्या व्यक्तीच्या हातामध्ये हा निर्णय आहे म्हणजे मुख्यमंत्री साहेबांनासुद्धा टार्गेट करावे लागेल, असेही रोहित पवार यांनी म्हटले आहे.
Source link
'आज संध्याकाळपर्यंत निर्णय घ्या, अन्यथा..':रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम; MPSC आंदोलनाचा 11 वा दिवस