Headlines

मित्रांसोबत राजगड किल्ला चढताना 35 वर्षीय तरुणाचा दुर्दैवी अंत:पर्यटकांनी सीपीआर देण्याचा प्रयत्न केला, मात्र जीव वाचवण्यात अपयश




पुणे जिल्ह्यातील ऐतिहासिक राजगड किल्ल्यावर पर्यटनासाठी आलेल्या 35 वर्षीय पर्यटकाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शनिवारी (10 ऑक्टोबर) दुपारी दोनच्या सुमारास ही घटना घडली. जिज्ञेश सदाशिव खंडाळकर असे मृत पर्यटकाचे नाव असून, ते मूळचे छत्रपती संभाजीनगर येथील रहिवासी होते. सध्या ते पुण्यातील हडपसर परिसरातील भेकराईनगर येथे वास्तव्यास होते. मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील तीन मित्र राजगड किल्ला पाहण्यासाठी आले होते. पाल बुद्रुक मार्गाने किल्ला चढत असताना पद्मावती माची परिसरात जिज्ञेश यांना थकवा जाणवू लागला. त्यामुळे त्यांना तेथेच बसवून त्यांचे दोन मित्र बालेकिल्ल्याकडे गेले. काही वेळानंतर जिज्ञेश यांना अस्वस्थ वाटू लागले आणि अचानक चक्कर येऊन ते बेशुद्ध पडले. त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. पर्यटकांनी सीपीआर देण्याचा प्रयत्न केला जिज्ञेश बेशुद्ध पडल्याचे लक्षात येताच गडावरील इतर पर्यटकांनी त्यांना मदत करण्यासाठी धाव घेतली. त्यांना वाचवण्यासाठी सीपीआर देण्याचाही प्रयत्न करण्यात आला. मात्र, प्रयत्न करूनही त्यांना वाचवता आले नाही. या घटनेमुळे किल्ल्यावर आलेल्या पर्यटकांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. पुरातत्त्व विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून बचावकार्य घटनेची माहिती मिळताच राजगड किल्ल्यावर कार्यरत असलेले पुरातत्त्व विभागाचे कर्मचारी विशाल पिलावरे आणि दीपक पिलावरे, तसेच स्थानिक नागरिक शंकर रसाळ, आकाश जाधव आणि लहू खरात मदतीसाठी धावून आले. महावितरण विभागाच्या कर्मचाऱ्यांनीही मदतीसाठी पुढाकार घेतला. संबंधितांनी स्ट्रेचरच्या साहाय्याने जिज्ञेश यांना किल्ल्याच्या पायथ्याशी आणले. मात्र, तोपर्यंत उशीर झाला होता. वेल्हे पोलिसांकडून तपास सुरू घटनेची माहिती मिळताच वेल्हे पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. या प्रकरणी वेल्हे पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे. वेल्हे पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी किशोर शेवते यांनी या घटनेची माहिती दिली.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *