Headlines

घंटागाडी खरेदी, बोअरवेल दुरुस्तीला मंजुरी:आपत्तीसाठी नोडल अधिकारी, नगरसेवक पतीच्या सभागृहातील प्रवेशाने सभापती संतप्त‎




मनपाच्या सोमवारी झालेल्या स्थायी समितीच्या सभेत शहरातील विविध विकासकामांना व प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली. मात्र, ही सभा प्रशासनाचा ढिसाळ कारभार, कंत्राटदारांची मनमानी, बाजार फी वसुलीतील उदासीनता व महापालिकेच्या आर्थिक नुकसानीच्या मुद्द्यांवरून वादळी ठरली. सदस्यांनी विविध विभागांच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरत तीव्र संताप व्यक्त केला. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील स्वच्छतेचा प्रश्न गंभीर होऊ नये म्हणून कचरा संकलनासाठी नव्या टायरयुक्त घंटागाड्या खरेदी करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. यासाठी ‘ओम केमिकल्स’ या कंपनीची सर्वात कमी दराची निविदा मंजूर करण्यात आली. या अंतर्गत प्रत्येक नगरसेवकाला ४ गाड्या आणि मुख्य रस्त्यांसाठी ५० गाड्या दिल्या जाणार आहेत. तसेच जुन्या गाड्यांच्या दुरुस्तीसाठी मनपाचा वेल्डिंग कारखाना पुन्हा सुरू करण्यात येणार आहे. दुसरीकडे, शहरातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी चारही झोनमधील बंद पडलेल्या आणि क्षतिग्रस्त सार्वजनिक बोअरवेलच्या दुरुस्तीला (रिबोअर) मान्यता देण्यात आली. कामाला गती मिळावी म्हणून संतोष शर्मा, शेख फिरोज, संतोष ढगे व सुरेंद्र नारखेडे या चार कंत्राटदारांना कामे विभागून देण्याचा निर्णय घेण्यात आला. उर्वरित पान ४ एका रस्त्याच्या खडीकरणाचे काम योग्य दर्जाचे नसल्याने कनिष्ठ अभियंता मनीष खत्री यांनी ते थांबवले होते. मात्र, कंत्राटदाराने अधिकाऱ्यांना न जुमानता रविवारी सुटीच्या दिवशी परस्पर सिमेंट काँक्रीटीकरण केले. कंत्राटदाराच्या या मनमानीवर स्थायी समिती सदस्यांनी तीव्र संताप व्यक्त केला. या रस्त्याचे मोजमाप (एमबी रेकॉर्ड) घेऊ नये आणि संबंधित कंत्राटदाराचे बिल कोणत्याही परिस्थितीत अदा करू नये, असे सक्त आदेश देण्यात आले. नगरसेविकेच्या पतीच्या ‘एन्ट्री’ने सभागृहात वादंग स्थायी समितीची सभा सुरू असताना रिपाइंचे (आठवले) जिल्हाध्यक्ष तथा नगरसेविका स्मिता कांबळे यांचे पती गजानन कांबळे यांनी थेट सभागृहात प्रवेश केल्याने तणाव निर्माण झाला. समितीचे सदस्य नसताना त्यांनी प्रवेश केल्याने सभापती विजय अग्रवाल यांनी त्यांना खडसावले. दोघांमध्ये शाब्दिक चकमक उडाली. गटार योजना निधीवरुन सभेत जोरदार गदारोळ भूमिगत गटार योजनेच्या निधीवरून गदारोळ झाला. सुमारे ४९ कोटी रुपयांचा निधी फिक्स डिपॉझिट ऐवजी बँकेच्या करंट अकाउंटमध्ये ठेवल्याने मनपाचे दीड कोटी रुपयांच्या व्याजाचे नुकसान झाले. या प्रकरणाची शासनाकडून विभागीय चौकशी सुरू असून, भविष्यात नियमांनुसारच निधी गुंतवण्याचे निर्देश देण्यात आले. शिवर तलाव पुनरुज्जीवन करण्याचा करार करणार “अमृत २.०’ अभियानांतर्गत शिवर तलावाच्या पुनर्जीवनासाठी कृषी विद्यापीठासोबत करार करण्यास मंजुरी दिली. पर्यटनाच्या दृष्टीने याचा विकास केला जाईल व भविष्यातील उत्पन्नात विद्यापीठाचा ५०% वाटा राहील. तलाव सुशोभीकरणासाठी ‘एरेशन फाउंटेन’, वॉकिंग ट्रॅक व पथदिवे लावण्यात येतील. थकबाकी असणाऱ्या दुकानांवर जप्ती आणणार १४ वर्षांनंतर मनपा लेखांचा बँक ताळमेळ करणाऱ्या ॲड. आशिष बाहेती यांना अडीच लाख रुपयांची फी देण्याचा ठराव मंजूर झाला. मनपाच्या गाळ्यांची थकबाकी असलेल्या दुकानदारांना नोटिसा बजावून जप्तीची कारवाई करण्याचा इशारा सभेत देण्यात आला. गणेश घाटावर राडारोडा टाकणाऱ्यांवर कारवाईचे निर्देश देण्यात आले. मोकाट कुत्र्यांच्या निर्बीजीकरणासाठी लवकरच निवारा केंद्र उभारण्याचेही आदेश देण्यात आले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *