![]()
मंत्रीपदाची अपेक्षा ठेवून किंवा अट्टहास करून शिंदेसेनेत प्रवेश केलेला नाही. माझ्यासाठी मंत्रीपदापेक्षा धाराशिव लोकसभा मतदारसंघातील जनतेची कामे आणि विकास अधिक महत्त्वाचा आहे, अशा शब्दांत धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. धाराशिव जिल्ह्याचा मागासलेपणाचा डाग पुसून टाकण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारची मदत मिळवणे हेच मुख्य ध्येय असल्याचे त्यांनी सांगितले. खा. ओमराजे म्हणाले, धाराशिव जिल्हा मागासलेपणाच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. हा डाग पुसण्यासाठी कृष्णा मराठवाडा प्रकल्पाला राष्ट्रीय प्रकल्पाचा दर्जा मिळवून देणे, निम्न तेरणा व मांजरा प्रकल्पावर बॅरेज बांधणे आणि नवीन पॉवर सबस्टेशनला केंद्राची मंजुरी मिळवणे या कामांना आपली प्राथमिकता असेल. एमआयडीसीत नवे उद्योग आणून तरुणांना रोजगार देणे हे आमचे लक्ष्य आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्यादरम्यान झालेल्या आरोपांवर बोलताना पुरावे देऊन आरोप करावेत. मी लोकांसाठी २४ तास उपलब्ध असतो आणि माझ्या कामातूनच उत्तर देईन,असे ओमराजे निंबाळकर यांनी म्हंटले आहे. तसेचजिल्ह्यातील रखडलेले विकास प्रकल्प मार्गी लावण्यासाठी राज्य व केंद्र शासनाशी सातत्याने पाठपुरावा केला जाईल. राजकारणापेक्षा जनतेच्या प्रश्नांना न्याय देणे आणि मतदारसंघाचा सर्वांगीण विकास साधणे, हेच आपले प्रमुख ध्येय असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. Q : पक्ष प्रवेशासाठी १०० कोटी दिल्याचा जो आरोप होतोय, त्यात किती तथ्य आहे? A : जर मला पैसेच घ्यायचे असते, तर २०२२ मध्ये आलेली २०० कोटींची ऑफर मी का नाकारली असती? यावरूनच हे आरोप किती फोल आहेत हे सिद्ध होते. Q : तुम्हाला केंद्रात मंत्रीपदाची ऑफर आहे का? A: आम्ही मंत्रीपदाची अपेक्षा ठेवून किंवा तसा कोणताही अट्टहास करून पक्षात आलेलो नाही. मंत्रीपदापेक्षा आमच्या मतदारसंघातील लोकांची कामे अडकू नयेत, यालाच आमची सर्वोच्च प्राथमिकता आहे. Q : धाराशिव जिल्ह्याच्या विकासासाठी तुमचे नेमके प्राधान्यक्रम काय आहेत? A : धाराशिव जिल्हा मागासलेपणाच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे, हा डाग आपल्याला पुसून टाकायचा आहे. त्यासाठी कृष्णा मराठवाडा प्रकल्पाला राष्ट्रीय दर्जा मिळवणे, निम्न तेरणा व मांजरा प्रकल्पांवर बॅरेजेस बांधणे, नवीन पॉवर सबस्टेशनला केंद्राची मंजुरी मिळवणे आणि एमआयडीसीच्या माध्यमातून युवकांना रोजगार देणे या कामांना माझे प्राधान्य आहे. Q : ईडी, भ्रष्टाचार या कारणाने शिंदेसेनेत प्रवेश केल्याची टीका झाली, त्याला काय उत्तर द्याल? A : ईडीची एक तरी नोटीस दाखवावी. धाराशिवमध्ये सर्वांचे मिळून ५०० कोटींचे प्लॉट तरी आहेत का? तसे पुरावे देवून मगच आरोप करावेत. Q : या सततच्या आरोपांना तुम्ही कसं तोंड देणार? A: मी लोकांसाठी २४ तास वेळेत देतोय. त्यांच्या अडचणी सोडविण्याचा माझा प्रयत्न राहिला आहे. त्यामुळे या आरोपांना माझ्या कामातूनच चोख उत्तर देईन.
Source link
…तर 2022 मध्ये 200 कोटींची ऑफर मी नाकारली असती का:मी मंत्रिपदासाठी गेलो नाही, धाराशिवचा मागासलेपणाचा डाग पुसायचा आहे- ओमराजे