Headlines

अविनाश धर्माधिकारी स्थापन करणार विद्यापीठ:भारतीय ज्ञान परंपरेला पुनर्वैभव प्राप्त करून देणार




चाणक्य मंडल परिवाराचे संस्थापक, माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी यांनी भारतीय ज्ञान परंपरेला पुनर्वैभव प्राप्त करून देण्यासाठी विद्यापीठ स्थापन करण्याची घोषणा केली आहे. पुणे येथे आयोजित एका नागरी सत्कार सोहळ्यात त्यांनी ही माहिती दिली. विदिशा विचार मंच आणि कोहिनूर कट्टा यांच्या संयुक्त विद्यमाने अविनाश धर्माधिकारी यांच्या नागरी सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. चाणक्य मंडल परिवाराच्या तीन दशकांच्या वाटचालीच्या आणि चाणक्य मंडल विश्वविद्यालयाच्या स्थापनेच्या पार्श्वभूमीवर हा सत्कार करण्यात आला. केसरी वाड्याच्या लोकमान्य सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाला महापौर मंजुषा नागपुरे, कोहिनूर ग्रुपचे चेअरमन कृष्णकुमार गोयल आणि विदिशा विचार मंचच्या संस्थापक-संचालक ममता क्षेमकल्याणी उपस्थित होत्या. सत्काराला उत्तर देताना धर्माधिकारी म्हणाले की, कृत्रिम बुद्धिमत्ता हे केवळ आव्हान नसून त्यात अनेक संधी दडल्या आहेत. संस्कृत भाषा कृत्रिम बुद्धिमत्तेच्या अल्गोरिदमसाठी अत्यंत उपयुक्त असून परदेशात त्यावर अभ्यास सुरू आहे, मात्र आपल्याला त्याची पुरेशी माहिती नाही. नालंदा आणि तक्षशीला विद्यापीठांचा वारसा लाभलेला असताना, पाश्चात्त्य शिक्षण प्रणालीचे अनुकरण न करता जागतिक पातळीवर सिद्ध होईल असे विद्यापीठ येत्या काळात आकार घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी डॉ. रघुनाथ माशेलकर म्हणाले की, ज्ञानाधिष्ठित समाज घडवणे ही काळाची गरज आहे. अविनाश धर्माधिकारी केवळ स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून अधिकारी घडवत नाहीत, तर राष्ट्राला समर्पित शिस्तबद्ध फळी निर्माण करत आहेत. ते या प्रशासकीय अधिकाऱ्यांचे शिल्पकार आहेत. महापौर मंजुषा नागपुरे यांनी सांगितले की, समाजाला ज्ञानाच्या कक्षा वृद्धिंगत करून देण्याचे धर्माधिकारींचे कार्य मोलाचे असून ते राष्ट्रनिर्मितीचे अखंड साधक आहेत. भारतीय ज्ञानाला जगभरात नेण्यासाठी त्यांच्या प्रयत्नांचे योगदान महत्त्वाचे आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *