Headlines

मोशी कचरा डेपो दुर्घटना:मृतांच्या नातेवाईकांना 10 लाखांची मदत, आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांचे तातडीने कार्यवाहीचे निर्देश




पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी मोशी कचरा डेपो दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी १० लाख रुपये मदत निधी देण्याबाबत तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत. या दुर्घटनेत एकूण ९ जणांचा मृत्यू झाला होता. आयुक्त डॉ. सूर्यवंशी यांनी रविवारी मोशी कचरा डेपो दुर्घटनेसंदर्भात महापालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम, तृप्ती सांडभोर, विक्रांत बगाडे, सह आयुक्त मनोज लोणकर यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते. ८ जुलै रोजी दुपारी दीडच्या सुमारास मोशी कचरा डेपो येथे इमारतीवर कचऱ्याचा ढीग कोसळून ही दुर्घटना घडली होती. या घटनेमुळे इमारतीत आणि इमारतीबाहेरील कचऱ्याच्या ढिगाऱ्यात अनेक नागरिक अडकले होते. एनडीआरएफ, भारतीय सेना, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पीएमआरडीए अग्निशमन दल, पोलीस प्रशासन आणि इतर संबंधित यंत्रणांनी तातडीने बचावकार्य सुरू केले. घटनेनंतर पाच नागरिक स्वतः बाहेर आले, तर उर्वरित १८ पैकी ९ नागरिकांना बचाव पथकाने इमारतीतून बाहेर काढले. या दुर्घटनेत भावेश वाणी (वय ३३), अक्षय सावंत (वय ३५, मोशी), सुनील कोरके (वय ४०, आळंदी), सन्नी माने (वय ३९, गंधर्वनगरी, मोशी), महेश कुंभार (वय ३३, छत्रपती संभाजीनगर), नागेश गायकवाड (वय २६, संजय गांधी नगर, मोशी), रणजीत पाटील (वय २२, मोशी), राहुल गायकवाड (वय २३, मोशी) आणि वामन कसबे (वय ५०, मोशी) या ९ जणांचा मृत्यू झाला. मृत्यू झालेल्या नागरिकांच्या नातेवाईकांना पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडून प्रत्येकी १० लाख रुपयांची मदत दिली जाईल. ही मदत देण्यासाठी तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी पुन्हा एकदा संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *