Headlines

कल्याणमध्ये 5 मजली इमारत पत्त्यांसारखी कोसळली:मलब्याचा ढीग थेट रस्त्यावर, जीव मुठीत धरून नागरिक खिडकीतून पळाले




कल्याण पश्चिम परिसरातून एक अत्यंत थरकाप उडवणारी घटना समोर आली आहे. पुनर्विकासासाठी पाडकाम सुरू असलेली एक ४ ते ५ मजली भलीमोठी इमारत अचानक पत्त्यांच्या बंगल्यासारखी जागेवरच कोसळली. या दुर्घटनेचे दृश्य अत्यंत चित्तथरारक असून, इमारत कोसळतानाचा थेट व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. सुदैवाने, या भयानक दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. यासंबंधीच्या वृत्तानुसार, ही घटना कल्याण पश्चिमेकडील घोलप नगर परिसरात दुपारी २ वाजून ५ मिनिटांच्या सुमारास घडली. येथील ‘विनायक दर्शन’ नावाच्या इमारतीचे रि-डेव्हलपमेंटसाठी टप्प्याटप्प्याने पाडकाम सुरू होते. दुपारच्या वेळी काम सुरू असतानाच अचानक इमारतीचा एक मोठा भाग थेट भर रस्त्यावर कोसळला. जीव मुठीत धरून नागरिक खिडकीतून पळाले! या इमारतीमध्ये सध्या कोणीही वास्तव्यास नव्हते, त्यामुळे मोठा अनर्थ टळला. तसेच, इमारतीचा प्रचंड मलबा जेव्हा रस्त्यावर आला, तेव्हा सुदैवाने तिथून कोणतेही वाहन किंवा पादचारी जात नसल्याने मोठी दुर्घटना टळली. इमारत कोसळत असल्याचा भयानक आवाज होताच, बाजूच्या इमारतींमध्ये राहणाऱ्या नागरिकांचे धाबे दणाणले. परिसरात धुराचे साम्राज्य पसरले होते. शेजारी राहणाऱ्या काही नागरिकांनी प्रसंगावधान राखून जीव वाचवण्यासाठी थेट आपल्या घराच्या खिडकीतून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला आणि स्वतःचा बचाव केला. सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; विकासकावर कारवाई होणार का? इमारत कोसळल्यानंतर परिसरात भीतीचे वातावरण असून स्थानिक नागरिकांनी प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला आहे. पाडकामाच्या ठिकाणी विकासकाकडून पुरेशी सुरक्षा व्यवस्था आणि कोणतीही संरक्षणात्मक जाळी किंवा उपाययोजना करण्यात आल्या नव्हत्या, असा गंभीर आरोप रहिवाशांनी केला आहे. या घटनेनंतर आता कल्याण-डोंबिवली महानगरपालिका अधिकारी आणि विकासक यांच्यात पाडकामाच्या कारवाईबाबत योग्य समन्वय होता की नव्हता? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. या भयावह घटनेत जर कोणाचा जीव गेला असता, तर त्याला जबाबदार कोण राहिले असते? असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत. या प्रकरणी पोलीस आणि पालिका प्रशासन दोषींवर काय कायदेशीर कारवाई करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. हे ही वाचा… वारीमध्ये वारकऱ्यांसाठी गढूळ पाण्याचा पुरवठा:जाहिरातींवर कोट्यवधींची उधळपट्टी, पण वारकऱ्यांच्या जीवाशी खेळ; विरोधकांची सरकारवर टीका पंढरपूरच्या वारीत सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांच्या सुरक्षेचा आणि आरोग्याचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. वारकऱ्यांना पिण्यासाठी गढूळ पाणीपुरवठा केला जात असल्याचा गंभीर आरोप करत, विरोधकांनी महायुती सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. “जनतेच्या करातून जमा झालेला पैसा जाहिरातींवर उधळला जातोय, पण वारकऱ्यांच्या सुरक्षेच्या नावाने मृत्यूचा सापळा रचला जात आहे,” अशा शब्दांत काँग्रेसने सरकारवर ताशेरे ओढले आहेत. तर, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनीही या प्रकरणावरून सरकारला धारेवर धरले आहे. सविस्तर वाचा… वृक्षारोपणासाठी गेलेल्या विद्यार्थ्यांवर मधमाशांचा हल्ला:जीव वाचवण्यासाठी पळापळ, 40 मुले जखमी; आगाशिव डोंगरावरील घटना निसर्गाचे संवर्धन करण्याचा संदेश देण्यासाठी वृक्षारोपण आणि ‘सीडबॉल’ (बीज गोळे) प्रत्यारोपण मोहिमेत सहभागी झालेल्या शाळकरी विद्यार्थ्यांवर मधमाशांच्या एका मोठ्या थव्याने अचानक हल्ला चढवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. कराडजवळील आगाशिव डोंगरावर हा प्रकार घडला. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे उडालेल्या गोंधळात आणि मधमाशांच्या दंशामुळे सुमारे ४० विद्यार्थी किरकोळ जखमी झाले आहेत. सुदैवाने, शिक्षकांनी दाखवलेली तत्परता आणि वेळेवर मिळालेल्या वैद्यकीय उपचारांमुळे मोठा अनर्थ टळला असून सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे. सविस्तर वाचा…



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *