Headlines

शेतकरी कर्जमाफीची डेडलाईन हुकली:जुलै उजाडला तरी प्रत्यक्ष लाभ का नाही? कृषीमंत्री दत्तात्रय भरणेंनी सांगितले कारण




राज्य सरकारने जाहीर केलेल्या बहुचर्चित शेतकरी कर्जमाफीच्या अंमलबजावणीला होत असलेला विलंब आणि त्यातील कथित जाचक अटींवरून सध्या विरोधकांनी सरकारला धारेवर धरले आहे. ३० जून आणि त्यानंतर दिलेली ५ जुलैची मुदत उलटूनही लाभ न मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये संभ्रम आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी इंदापूर येथे बोलताना सरकारची नेमकी अडचण आणि भूमिका स्पष्ट केली. “घाईगडबडीत कोणतीही चूक होऊ नये आणि पात्र शेतकऱ्यांनाच लाभ मिळावा, यासाठी प्रशासकीय पातळीवर काळजी घेतली जात असल्याने हा थोडा वेळ लागत आहे,” असा खुलासा त्यांनी केला आहे. ते पुणे जिल्ह्यातील इंदापूर येथे आयोजित एका कार्यक्रमात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. सरकारने सुरुवातीला ३० जूनपर्यंत आणि त्यानंतर ५ जुलै रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा केली जाईल, अशी घोषणा केली होती. मात्र, ही मुदत संपूनही अद्याप प्रत्यक्ष लाभ न मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये संभ्रम आणि विरोधकांकडून ‘फसवी कर्जमाफी’ असल्याचा आरोप होत आहे. या विलंबाचे कारण स्पष्ट करताना कृषीमंत्री भरणे म्हणाले, “सध्या विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनात कर्जमाफीसाठी आवश्यक असलेल्या पुरवणी मागण्या मंजूर केल्या जातील. त्यानंतर या प्रस्तावावर राज्यपाल महोदयांची लवकरात लवकर स्वाक्षरी होईल. ही प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण होताच अवघ्या काही दिवसांत कर्जमाफीची रक्कम थेट माझ्या बळीराजाच्या बँक खात्यात जमा केली जाईल.” निवडणूक नसतानाही मदत; शेतकऱ्यांनी आभार मानले पाहिजेत विरोधी पक्षांकडून कर्जमाफीच्या जाचक अटींवरून राज्यभरात आंदोलने केली जात आहेत. यावर बोलताना कृषीमंत्र्यांनी विरोधकांचे आरोप फेटाळून लावत सरकारच्या संवेदनशीलतेचे कौतुक केले. “सध्या राज्यात कोणतीही निवडणूक नाही. तरीही अडचणीच्या काळात बळीराजाच्या पाठीशी उभे राहण्याचा ऐतिहासिक निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि संपूर्ण मंत्रिमंडळाने घेतला आहे. यासाठी राज्यातील शेतकऱ्यांनी आणि मी स्वतः शेतकऱ्यांचा प्रतिनिधी म्हणून या नेतृत्वाचे आभार मानतो,” असे भरणे म्हणाले. तांत्रिक अडचणी लवकरच दूर होणार कर्जमाफीसाठी सुरुवातीला निश्चित केलेल्या तारखांमध्ये काही प्रशासकीय आणि तांत्रिक अडचणी आल्या होत्या. मात्र, या सर्व अडचणी आता अंतिम टप्प्यात असून येत्या काही दिवसांतच निधी वितरणाचा मार्ग मोकळा होईल, असे आश्वासन कृषीमंत्र्यांनी इंदापूरकरांना दिले. त्यामुळे आता चालू अधिवेशनानंतर शेतकऱ्यांच्या खात्यात प्रत्यक्ष रक्कम कधी पडते, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. ‘विलंब मान्य, पण कोणतीही चूक होऊ देणार नाही’ कर्जमाफी फसवी असल्याचा आणि जाचक अटींमुळे शेतकऱ्यांना फटका बसत असल्याचा आरोप करत विरोधकांनी अनेक ठिकाणी आंदोलने केली आहेत. यावर उत्तर देताना दत्तात्रय भरणे म्हणाले, “प्रक्रियेला चार-दोन दिवस उशीर झाला आहे, हे मी नक्कीच मान्य करतो. पण कोणतीही त्रुटी राहू नये म्हणूनच आम्ही जाणीवपूर्वक काळजी घेत आहोत. सर्व तांत्रिक अडचणी तातडीने दूर करून येत्या काही दिवसांतच माझ्या बळीराजाच्या बँक खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा केली जाईल.”



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *