Headlines

तरुणाईमध्ये भारतीयत्व नाही; डॉ. पटवर्धन यांची खंत:गुरुकुल प्रतिष्ठान पुरस्कार सोहळ्यात शिक्षणतज्ज्ञांनी उपस्थित केला प्रश्न




ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ आणि डेक्कन कॉलेज अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. भूषण पटवर्धन यांनी आजच्या तरुणाईमध्ये भारतीयत्व कोठे आहे, असा प्रश्न उपस्थित केला. गुरुकुल प्रतिष्ठानतर्फे आयोजित आदर्श माता-पिता आणि आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते. डॉ. पटवर्धन यांनी युवा पिढीच्या विचार, आचार, विहार आणि आहारात भारतीयत्व आढळत नसल्याची खंत व्यक्त केली. या पिढीचा पाया नेमक्या कोणत्या मूल्य-निष्ठांवर आधारित आहे, हे समजत नसल्याचेही त्यांनी नमूद केले. या सोहळ्यात राजाराम रंगनाथ अष्टेकर आणि शकुंतलाबाई राजाराम अष्टेकर यांच्या स्मृत्यर्थ दिला जाणारा आदर्श माता-पिता पुरस्कार जालना जिल्ह्यातील परतूर तालुक्यातील पिंपरी येथील शिक्षण संस्था चालक विजया आणि रामकिसन सोळंके यांना प्रदान करण्यात आला. तसेच, कृष्ण मोडक स्मृती आदर्श शिक्षक पुरस्कार ज्ञानप्रबोधिनी निगडी येथील केंद्रप्रमुख डॉ. मनोज देवळेकर यांना डॉ. पटवर्धन यांच्या हस्ते देण्यात आला. यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष कृष्णा अष्टेकर, कार्याध्यक्ष डॉ. सागर देशपांडे, कार्यकारी संचालक सदानंद महाजन, विश्वस्त शिवप्रसाद कामत, मैथिली कामत आणि श्रीमती जाई कामत हे मान्यवर उपस्थित होते. हा कार्यक्रम कर्वे रस्त्यावरील अश्वमेध सभागृहात पार पडला. डॉ. पटवर्धन यांनी युवा पिढीच्या वर्तणुकीतील अभारतीयत्वाविषयी चिंता व्यक्त केली. तंत्र-यंत्र आणि आयटीवर धोरणे केंद्रित करणाऱ्या यंत्रणांचे मानव्यविद्याशाखांकडे दुर्लक्ष झाल्याने आपला समाज ज्वालामुखीवर बसून त्सुनामीची वाट पाहत असल्याची परिस्थिती दिसत असल्याचे ते म्हणाले. महाराष्ट्राला संतपरंपरेमुळे समानतेचे अधिष्ठान लाभले असून, मुख्यतः वारकरी संप्रदायाने आपली संस्कृती टिकविण्याचे कार्य केले आहे. आजही राज्याच्या ग्रामीण भागात संस्कृती टिकून राहिलेली दिसते, याचे श्रेय वारकरी संप्रदायाला दिले पाहिजे, असेही त्यांनी सांगितले. या पार्श्वभूमीवर मराठवाड्याच्या दुर्लक्षित खेड्यात शिक्षणाचे महत्त्वाचे कार्य करणाऱ्या सोळंके दांपत्याचा आणि क्रीडासंस्कृतीची जोपासना करणाऱ्या देवळेकर यांचा सन्मान दिलासा देणारा असल्याचे डॉ. पटवर्धन यांनी म्हटले. त्यांनी डॉ. अशोक कामत यांना विद्यापीठातील ज्येष्ठ स्नेही, मार्गदर्शक, विद्वान, अभ्यासू आणि विद्यार्थीकेंद्रित विचार करणारे प्राध्यापक म्हणूनही आदराने स्मरण केले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *