![]()
पुण्यात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे कात्रजमधील जांभुळवाडी येथील एका सोसायटीची सीमाभिंत रविवारी पहाटे कोसळली. या घटनेत नऊ मोटारी आणि नऊ दुचाकींसह एकूण १८ वाहनांचे मोठे नुकसान झाले. सुदैवाने, या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. समृद्धी लेक सोसायटीची ही सीमाभिंत पार्किंग शेडवर कोसळली. घटनेची माहिती मिळताच कात्रज आणि सिंहगड रस्ता अग्निशमन केंद्रातील जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी पार्किंग शेडखाली अडकलेली वाहने बाहेर काढण्यासाठी मदतकार्य सुरू केले. अग्निशमन दलाच्या जवानांनी फॅब्रिकेशन कामगारांच्या मदतीने ग्राईंडर आणि कटरचा वापर करून पत्रे बाजूला केले. त्यानंतर सीमाभिंतीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेली १८ वाहने सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आली. उपअग्निशमन अधिकारी संतोष भिलारे यांच्यासह मयूर काटे, प्रशांत कुंभार, अक्षय देवकर, शेख, सुनील दिवाडकर, राकेश बरे, संभाजी आटोळे आणि आदिनाथ पवार यांनी या मदतकार्यात सहभाग घेतला. याशिवाय, शहरात पावसामुळे झाडे कोसळण्याच्या इतरही घटना घडल्या. कसबा पेठेतील गावकोस मारुती मंदिर रस्ता आणि जुन्या मुंबई-पुणे रस्त्यावरील वाकडेवाडी भागात अंडी उबवणी केंद्राजवळ झाडे कोसळली. गावकोस मारुती मंदिर रस्त्यावरील वाहतूक काही काळ थांबली होती, ती अग्निशमन दलाने फांद्या हटवून पूर्ववत केली. वाकडेवाडी येथे कोसळलेल्या झाडाची फांदी एका मोटारीवर आणि एका रिक्षावर पडल्याने दोन्ही वाहनांचे नुकसान झाले. गेल्या २४ तासांत शहर परिसरात एकूण ३० ठिकाणी झाडे कोसळल्याची माहिती अग्निशमन दलाच्या मुख्य नियंत्रण कक्षाकडून देण्यात आली आहे. या सर्व घटनांमध्ये कोणीही जखमी झाले नाही, ही दिलासादायक बाब आहे.
Source link
पुण्यात पावसाचा हाहाकार:एका सोसायटीची सीमाभिंत कोसळली; शहरात 30 ठिकाणी झाडे पडली, 18 वाहनांचे नुकसान