Headlines

जनआरोग्य योजनेतील गैरप्रकार त्वरित थांबवा:भ्रष्टाचारविरोधी जनआंदोलन समितीची मागणी‎




महात्मा फुले जनआरोग्य योजनेत काही रुग्णालयांकडून नियमांचे उल्लंघन होत असल्याचा आरोप करत पात्र लाभार्थ्यांना शासन निर्णयानुसार पूर्णपणे मोफत उपचार मिळावेत, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा बागलाण तालुका महाराष्ट्र राज्य भ्रष्टाचारविरोधी जनआंदोलन व यशवंत मोफत रुग्णसेवा समितीने दिला आहे. सटाणा दौऱ्यावर आलेले जिल्हाधिकारी डॉ. आयुष प्रसाद यांना तालुका सचिव श्याम बागडणे यांनी निवेदन देऊन तक्रार केली. निवेदनात म्हटले आहे की, महात्मा फुले जनआरोग्य योजना ही आर्थिकदृष्ट्या दुर्बल व सर्वसामान्य नागरिकांसाठी महत्त्वाची असून कोणताही पात्र लाभार्थी या योजनेपासून वंचित राहता कामा नये. समितीच्या म्हणण्यानुसार, जिल्ह्यातील काही रुग्णालयांमध्ये “संबंधित आजार योजनेत समाविष्ट नाही” किंवा “ही शस्त्रक्रिया योजनेअंतर्गत होत नाही” अशी कारणे देत रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांची दिशाभूल केली जात आहे. शासनाच्या नियमानुसार योजनेअंतर्गत उपलब्ध आजार, शस्त्रक्रिया, उपचार, लाभार्थ्यांचे हक्क तसेच संपर्क अधिकाऱ्यांची माहिती असलेला डिजिटल माहिती फलक दर्शनी भागात लावणे बंधनकारक असतानाही अनेक रुग्णालयांत या नियमाचे पालन होत नसल्याचा आरोप करण्यात आला आहे.तसेच, शासनाकडून उपचारांचा खर्च मंजूर असतानाही काही रुग्णालयांकडून औषधे, वैद्यकीय साहित्य, तपासण्या व इतर सेवांच्या नावाखाली अतिरिक्त रक्कम आकारली जात असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या रुग्णालयांवर कारवाई करावी, अशी मागणी जिल्हाधिकारी डॉ. आयुष प्रसाद यांच्याकडे करण्यात आली.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *