Headlines

आळंदीत इंद्रायणीचा रौद्रावतार!:नदीवरील चारही पूल पाण्याखाली; अडीचशे वारकऱ्यांची सुटका, पालखी सोहळ्यापूर्वी प्रशासन अलर्ट




राज्यभर सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा सर्वाधिक फटका पुणे जिल्ह्यालाही बसत असून आळंदीत इंद्रायणी नदीने रौद्ररूप धारण केले आहे. पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे तसेच धरणातून सुरू असलेल्या पाण्याच्या विसर्गामुळे इंद्रायणी नदीच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ झाली आहे. नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने आळंदी शहरात प्रवेश करणारे चारही पूल पाण्याखाली गेले असून प्रशासनाने ते वाहतुकीसाठी बंद केले आहेत. त्यामुळे शहरातील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली असून आषाढी वारीसाठी आलेल्या हजारो वारकऱ्यांनाही मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. अडीचशे वारकऱ्यांची सुरक्षित सुटका पूरस्थिती गंभीर होत असल्याने आळंदीतील विविध धर्मशाळा आणि दर्शन मंडपांमध्ये अडकलेल्या सुमारे 250 वारकऱ्यांना नगरपरिषदेच्या आपत्कालीन विभागाने सुरक्षित ठिकाणी हलवले आहे. बचाव पथकांकडून युद्धपातळीवर मदतकार्य राबविण्यात आले असून कोणतीही जीवितहानी होऊ नये यासाठी प्रशासन सतर्क झाले आहे. चारही पूल बंद; शहराचा संपर्क तुटला इंद्रायणी नदीच्या वाढत्या पाणीपातळीमुळे प्रशासनाने सुरक्षेचा उपाय म्हणून नदीवरील सर्व प्रमुख पूल बंद केले आहेत. बंद करण्यात आलेल्या पुलांमध्ये – यांचा समावेश आहे. दुपारपर्यंत तीन पुलांवरून पाणी वाहत होते, तर त्यानंतर चौथ्या पुलालाही पाण्याने वेढा दिल्याने तोही वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. त्यामुळे आळंदीकडे येणारी आणि शहराबाहेर जाणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. घाट, मंदिर परिसर आणि दुकाने पाण्याखाली इंद्रायणी नदीच्या महापुरामुळे नदीलगतचा संपूर्ण परिसर जलमय झाला आहे. भक्त पुंडलिक मंदिर, घाट परिसर, नदीकाठावरील दुकाने, हरी हरेंद्र मठ, देविदास धर्मशाळा, ज्ञानेश्वरी मंदिरालगतचा परिसर, शनी मंदिर परिसर, भराव रस्ता तसेच सिद्धबेट परिसरात पुराचे पाणी शिरले आहे. आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर घाटावर उभारण्यात आलेले चेंजिंग रूमचे मंडप पुराच्या पाण्यात वाहून गेले, तर तात्पुरती स्वच्छतागृहेही पाण्याखाली गेली आहेत. नदीकाठावरील दुकानदारांनी तातडीने आपले साहित्य सुरक्षित ठिकाणी हलवण्यास सुरुवात केली आहे. पालखी प्रस्थानापूर्वी प्रशासनाची मोठी कसोटी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याचे मंगळवारी पंढरपूरकडे प्रस्थान होणार असल्याने आळंदीत लाखो वारकरी दाखल झाले आहेत. मात्र मुसळधार पाऊस आणि पूरस्थितीमुळे पालखी सोहळ्याच्या व्यवस्थापनासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. पोलीस, नगरपरिषद आणि आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सतत परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. घाट परिसरात प्रवेशबंदी करण्यात आली असून ठिकठिकाणी बॅरिकेड्स उभारण्यात आले आहेत. नदीकाठावर कोणालाही जाण्याची परवानगी दिली जात नसून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. नदीकाठापासून दूर राहा; प्रशासनाचे आवाहन आळंदी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी माधव खांडेकर यांनी नागरिक, भाविक आणि वारकऱ्यांना इंद्रायणी नदीपात्र, घाट परिसर किंवा बंद करण्यात आलेल्या पुलांवर जाण्याचा कोणताही प्रयत्न करू नये, असे आवाहन केले आहे. अफवांवर विश्वास न ठेवता केवळ प्रशासनाच्या अधिकृत सूचनांवरच विश्वास ठेवावा, तसेच प्रशासनाला सहकार्य करून स्वतःची आणि इतरांची सुरक्षितता जपावी, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. धरणातून विसर्ग आणि पाणलोट क्षेत्रातील पावसामुळे परिस्थिती गंभीर गेल्या दोन दिवसांपासून मावळ तालुका, लोणावळा परिसर आणि धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे धरणांमधून पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आला असून त्याचा थेट परिणाम इंद्रायणी नदीच्या पाणीपातळीवर झाला आहे. नदीचा प्रवाह वेगाने वाढत असल्याने पूरस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केली आहे. सध्या संपूर्ण आळंदी शहरात सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून परिस्थितीवर प्रशासनाकडून सातत्याने लक्ष ठेवले जात आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *