![]()
राज्यभर सुरू असलेल्या मुसळधार पावसाने जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले असून कोकण, मुंबई, पुणे, ठाणे, रायगड आणि घाटमाथा भागात गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. आळंदीमध्ये इंद्रायणी नदीने धोक्याची पातळी ओलांडत महापुराचे रूप धारण केले आहे. नदीवरील चारही पूल पाण्याखाली गेल्यामुळे आळंदीचा संपर्क तुटला असून आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने वारकरी, भाविक आणि नागरिकांना आळंदीत न येण्याचे कडक आवाहन केले आहे. दुसरीकडे मुंबई-पुणे मार्गावरील दरड कोसळल्याने एसटी सेवा बंद करण्यात आली असून राज्यातील अनेक भागांत वाहतुकीवर परिणाम झाला आहे. आळंदीत महापूर; पालखी सोहळ्यापूर्वी प्रशासनाचा मोठा निर्णय इंद्रायणी नदीच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे नदीने रौद्ररूप धारण केले आहे. आळंदी शहरात प्रवेश करणारे चारही पूल पाण्याखाली गेल्याने शहरात ये-जा पूर्णपणे बंद झाली आहे. नदीकाठचे घाट, मंदिर परिसर, धर्मशाळा, दुकाने आणि अनेक भाग पुराच्या पाण्याखाली गेले आहेत. आषाढी वारीसाठी देशभरातून आलेल्या शेकडो वारकऱ्यांना याचा मोठा फटका बसला आहे. प्रशासनाने विविध धर्मशाळा आणि दर्शन मंडपांमध्ये अडकलेल्या सुमारे २५० वारकऱ्यांना सुरक्षितस्थळी हलवले आहे. नदीकाठी उभारण्यात आलेले चेंजिंग रूम आणि तात्पुरत्या सुविधा पुराच्या पाण्यात वाहून गेल्या आहेत. वारकरी आणि भाविकांना आळंदीत न येण्याचे आवाहन पूरस्थिती गंभीर होत असल्याने प्रशासनाने अत्यंत महत्त्वाचे सार्वजनिक आवाहन जारी केले आहे. आळंदीच्या दिशेने प्रवास करणाऱ्या सर्व वारकरी, भाविक आणि नागरिकांनी ज्या ठिकाणी आहेत तेथेच सुरक्षित थांबावे आणि परिस्थिती सुरळीत होईपर्यंत आळंदीत येण्याचा प्रयत्न करू नये, असे स्पष्ट सांगण्यात आले आहे. नदीपात्र, घाट, पूल किंवा पाण्याखाली गेलेल्या रस्त्यांवर जाणे टाळावे, अफवांवर विश्वास ठेवू नये आणि केवळ प्रशासनाच्या अधिकृत सूचनांचे पालन करावे, असे आवाहनही करण्यात आले आहे. पिंपरी-चिंचवड पोलिसांचेही कडक निर्देश पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयानेही वारकरी, दिंडी प्रमुख आणि भाविकांसाठी स्वतंत्र सूचना जारी केल्या आहेत. आळंदी आणि देहू येथील मंदिर परिसर तसेच धर्मशाळांमध्ये पुराचे पाणी शिरल्यामुळे पुढील प्रवास करू नये, सुरक्षित ठिकाणीच थांबावे आणि पोलीस व आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. पुणे-मुंबई एसटी सेवा अनिश्चित काळासाठी बंद मुंबई-पुणे मार्गावर दरड कोसळल्याने पुढील आदेश येईपर्यंत पुणे-मुंबई दरम्यानची सर्व एसटी बस सेवा बंद करण्यात आली आहे. सकाळी पुण्याहून मुंबईकडे निघालेल्या चार एसटी बस उर्से टोलनाका परिसरात अडकल्या होत्या. त्या सुरक्षितपणे पुन्हा पुण्याकडे परत पाठवण्यात आल्या. रस्ता खुला होईपर्यंत प्रवाशांनी प्रवासाचे नियोजन करू नये, असे एसटी प्रशासनाने स्पष्ट केले आहे. पुणे जिल्ह्यात पावसाची दमदार हजेरी; धरणांत वाढू लागला पाणीसाठा पुणे शहरासह जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून सातत्याने पाऊस सुरू आहे. खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर धरणांच्या पाणलोट क्षेत्रातही चांगला पाऊस होत असल्याने धरणांमधील पाणीसाठ्यात वाढ होऊ लागली आहे. सध्या प्रमुख धरणांमधील पाणीसाठा पुढीलप्रमाणे आहे – या चार धरणांमधील एकूण पाणीसाठा १७.४६ टक्क्यांवर पोहोचला आहे. मात्र, गेल्या वर्षी याच दिवशी हा साठा ६०.६२ टक्के होता. उजनी धरणासाठी दिलासादायक बातमी पुणे जिल्ह्याच्या पश्चिम घाटात सुरू असलेल्या पावसामुळे दौंड बंधाऱ्यातून भीमा नदीमार्गे उजनी धरणात पाण्याची आवक सुरू झाली आहे. सध्या सुमारे ६,८८३ क्युसेक पाणी धरणाकडे येत आहे. सध्या उजनी धरणाची पातळी उणे २८ टक्क्यांच्या आसपास असली तरी आता सुरू झालेली आवक पुढील काही दिवसांत धरणासाठी मोठा दिलासा ठरणार असल्याचे मानले जात आहे. पवना धरणात २४ तासांत ५ टक्क्यांची वाढ पिंपरी-चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरण परिसरातही मुसळधार पाऊस सुरू आहे. गेल्या २४ तासांत धरणसाठ्यात तब्बल ५ टक्क्यांची वाढ झाली आहे. सध्या पवना धरणात २३.९० टक्के पाणीसाठा आहे. गेल्या वर्षी याच दिवशी हा साठा ७१.४८ टक्के होता. लोणावळ्यात मोसमातील विक्रमी पाऊस पर्यटननगरी लोणावळ्यात गेल्या २४ तासांत तब्बल २६७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून हा यंदाच्या हंगामातील सर्वाधिक पाऊस ठरला आहे. यंदाच्या मोसमात आतापर्यंत लोणावळा परिसरात १,०९० मिलिमीटर पाऊस झाला आहे. त्यामुळे धबधबे, पर्यटनस्थळे आणि घाट परिसर फुलून गेले असले तरी प्रशासनाने धोकादायक ठिकाणी जाणे टाळण्याचे आवाहन केले आहे. मुंबईतही मुसळधार पाऊस; विमान वाहतुकीवर परिणाम मुंबईतही पावसाचा जोर कायम असून अनेक भागांत पाणी साचले आहे. महापालिकेची यंत्रणा सतर्क असून हजारो अधिकारी आणि कर्मचारी मैदानात उतरले आहेत. मुसळधार पाऊस आणि कमी दृश्यमानतेमुळे मुंबई विमानतळावरील विमान वाहतुकीवर परिणाम झाला. सकाळच्या सत्रात काही विमाने अन्य विमानतळांकडे वळवावी लागली, तर अनेक विमानांना ‘गो-अराउंड’ करावे लागले. अनेक उड्डाणे उशिराने रवाना झाली. पुढील काही दिवस पावसाचा जोर कायम हवामान विभागाच्या अंदाजानुसार बंगालच्या उपसागरात सक्रिय झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे महाराष्ट्रात मान्सून आणखी सक्रिय राहणार आहे. ६ जुलैपर्यंत पालघर, रायगड आणि पुणे घाटमाथा परिसरासाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे, तर मुंबई, ठाणे आणि रत्नागिरी जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट लागू आहे. वादळी वाऱ्यासह अतिमुसळधार पावसाची शक्यता लक्षात घेऊन नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये, नदी-नाले, पूरग्रस्त भाग आणि धबधब्यांपासून दूर राहावे तसेच प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन प्रशासन आणि हवामान विभागाकडून करण्यात आले आहे.
Source link
आषाढी वारीवर पावसाचे संकट:आळंदीत येऊ नका, वारकऱ्यांना प्रशासनाचे तातडीचे आवाहन; पुणे-मुंबई एसटी सेवा बंद, धरणांत वाढू लागला पाणीसाठा