![]()
मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील बहुचर्चित ‘मिसिंग लिंक’ प्रकल्प पुन्हा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. काही दिवसांपूर्वी नव्या मार्गावर खड्डे पडल्याची चर्चा सुरू असतानाच, सोमवारी पहाटे मिसिंग लिंकच्या एन्ट्री पॉईंटजवळ स्लॅबचा काही भाग कोसळला. डोंगरावरील माती आणि पाण्याचा मोठा लोंढा रस्त्यावर आल्याने सुरक्षेच्या कारणास्तव या मार्गावरील वाहतूक तात्पुरती बंद करण्यात आली. या घटनेनंतर विरोधकांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. रोहित पवारांचा सरकारवर निशाणा या घटनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत, “खड्डे पडले तेव्हा ड्युरॅबिलिटी टेस्ट सांगितली, आता स्लॅब कोसळणंही त्याच टेस्टचा भाग आहे का? मिसिंग लिंकच्या कामात दलाली आणि भ्रष्टाचाराची लिंक झाली असून सुरक्षाच मिसिंग झाली आहे,” असा आरोप केला. गेल्या काही दिवसांच्या पावसाने सरकारच्या दाव्यांची पोलखोल झाल्याचाही दावा त्यांनी केला. खड्डे सोडून द्या, तिथे अख्खा मिसिंग लिंकच कोसळला- संजय राऊत मुंबई-पुणे प्रवासातील महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पावर अतिवृष्टीमुळे दरड कोसळल्यानंतर आता या मुद्द्यावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर टीकास्त्र सोडण्यास सुरुवात केली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी या दुर्घटनेवरून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप करत सडकून टीका केली आहे. “मुख्यमंत्री म्हणतात मिसिंग लिंकवर दोन खड्डे पडलेत, पण आज त्यांनी स्वतः जाऊन पाहावे; खड्डे सोडून द्या, तिथे अख्खा मिसिंग लिंकच कोसळला आहे,” अशा शब्दांत राऊत यांनी मुख्यमंत्र्यांना लक्ष्य केले. सविस्तर वाचा ‘मिसिंग लिंक’वरून काँग्रेसचा सरकारवर हल्लाबोल; ‘हा भ्रष्टाचाराचा उत्कृष्ट नमुना’ मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पातील स्लॅब कोसळल्याच्या घटनेनंतर काँग्रेसने महायुती सरकारवर जोरदार टीका केली आहे. अवघ्या दोन महिन्यांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गाजावाजा करत उद्घाटन केलेल्या प्रकल्पाची ही अवस्था असल्याचा आरोप काँग्रेसने केला. खड्ड्यांनंतर आता स्लॅब कोसळल्यावर सरकार कोणते नवे कारण देणार, असा सवाल करत हा निकृष्ट दर्जाच्या कामाचा आणि भ्रष्टाचाराचा उत्कृष्ट नमुना असल्याची टीका करण्यात आली. पावसाचे कारण पुढे करून नागरिकांची दिशाभूल करू नये, तर या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी काँग्रेसने केली. वर्षा गायकवाड यांचा सरकारला सवाल, ‘ही नेमकी कसली टेस्ट?’ मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील ‘मिसिंग लिंक’ परिसरात झालेल्या भूस्खलनाच्या घटनेनंतर काँग्रेस नेत्या वर्षा गायकवाड यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. या परिसराचा भौगोलिक स्वभाव लक्षात घेऊनही भूस्खलनासारख्या नैसर्गिक आपत्तींसाठी कोणतेही नियोजन करण्यात आले नसल्याचे त्यांनी म्हटले. या घटनेमुळे मुंबई-पुणे मार्गावरील रेल्वे आणि रस्ते वाहतुकीवर परिणाम झाल्याचे सांगत, खड्ड्यांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘टेस्टिंग’चे स्पष्टीकरण दिले होते, आता हा नेमका कसला टेस्ट आहे? हा महाराष्ट्रातील जनतेच्या संयमाचा कस पाहण्याचा प्रयत्न आहे का, असा सवाल त्यांनी सोशल मीडियावरील पोस्टद्वारे उपस्थित केला. मिसिंग लिंक दुर्घटनेवर विजय वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील मिसिंग लिंक प्रकल्पाच्या प्रवेशद्वाराजवळ दरड कोसळून वाहतूक विस्कळीत झाल्याच्या घटनेवर काँग्रेस विधानमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली. अवघ्या दोन महिन्यांपूर्वी उद्घाटन झालेल्या प्रकल्पावरच दरड कोसळत असल्याने कामाच्या दर्जा आणि नियोजनावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याचे त्यांनी म्हटले. “मिसिंग लिंकवर खड्डे पडल्यावर सरकारने ते टेस्टिंग असल्याचे सांगितले होते, आता दरड कोसळली तर कोणते टेस्टिंग सुरू आहे?” असा सवाल त्यांनी केला. प्रवाशांकडून नियमित टोल वसूल केला जातो, मात्र सुरक्षित प्रवासाची हमी देण्यात सरकार अपयशी ठरत असल्याची टीका करत, या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली. फडणवीसांनी काय दिले होते स्पष्टीकरण? यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नव्या रस्त्यांवर पहिल्या पावसानंतर काही तांत्रिक त्रुटी समोर येऊ शकतात, असे सांगत त्याची आवश्यक दुरुस्ती केली जाते, असे स्पष्टीकरण दिले होते. कनेक्टरजवळील काही खड्ड्यांचा उल्लेख करत त्यांनी हा अभियांत्रिकी प्रक्रियेचाच भाग असल्याचे म्हटले होते. मात्र, आता स्लॅब कोसळल्याच्या घटनेनंतर मिसिंग लिंक प्रकल्पाच्या दर्जा, सुरक्षितता आणि कामाच्या गुणवत्तेबाबत पुन्हा प्रश्न उपस्थित होत आहेत. प्रकल्पाची सुरक्षाच झाली ‘मिसिंग’ सोमवारी पहाटे कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे मिसिंग लिंकच्या एन्ट्री पॉईंटजवळून छताचा स्लॅब खचला. परिणामी, माती आणि पाण्याचा प्रचंड मोठा लोंढा थेट रस्त्यावर कोसळला. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नसली, तरी सुरक्षेच्या कारणास्तव या मार्गावरील वाहतूक तातडीने थांबवावी लागली. कोट्यवधी रुपये खर्च करून बांधलेल्या या प्रकल्पाचे काम अवघ्या दोन महिन्यांतच कसे काय खचले, असा संतप्त सवाल आता प्रवाशांमधून विचारला जात आहे. हेही वाचा.. मानखुर्दमध्ये तीन मजली चाळ पत्त्यासारखी कोसळली:5 चिमुकल्यांसह 6 जणांचा दुर्दैवी मृत्यू, मुख्यमंत्र्यांकडून 5 लाखांची मदत जाहीर
राज्यभर सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत आणखी एक भीषण दुर्घटना घडली आहे. मानखुर्दमधील जनता नगर परिसरात रविवारी रात्री तीन मजली कच्च्या चाळीचा भाग अचानक कोसळल्याने पाच निष्पाप लहान मुले आणि एका महिलेचा जागीच मृत्यू झाला, तर एक तरुण जखमी झाला आहे. ही चाळ धोकादायक असल्याने रहिवासी घरातील सामान बाहेर काढत असतानाच अचानक संपूर्ण बांधकाम कोसळल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. सविस्तर वाचा
Source link
पहिल्याच पावसात 'मिसिंग लिंक'ची पोलखोल?:स्लॅब कोसळताच रोहित पवारांसह विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल