![]()
राज्यात आणि देशात उघडकीस आलेल्या NEET पेपरफुटी प्रकरणांवरून विद्यार्थ्यांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. याच अन्यायाविरोधात आवाज उठवण्यासाठी ‘महाराष्ट्र राज्य विद्यार्थी कृती समिती’च्या वतीने आज छत्रपती संभाजीनगर येथील विभागीय आयुक्त कार्यालयासमोर भव्य आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) आमदार रोहित पवार आणि विद्यार्थी नेते अभिजित दिपके यांनी थेट मैदानात उतरत राज्य आणि केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. ‘सरकारने विद्यार्थ्यांचा धसका घेतलाय, जॅमर लावलेत’ आंदोलनस्थळी पोहोचण्यापूर्वीच रोहित पवार यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून सरकारवर तिखट शब्दांत टीका केली. “आपल्या न्याय्य हक्कांसाठी आवाज उठवणाऱ्यांचा सरकार नेहमीच धसका घेतंय. आजही विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची धास्ती घेऊन सरकारने संभाजीनगरमध्ये सकाळपासूनच शेकडो पोलिसांचा ताफा रस्त्यावर उतरवला आहे. शिवाय, हे आंदोलन लोकांपर्यंत पोहोचू नये म्हणून चक्क जॅमरही लावले आहेत. पण विद्यार्थ्यांचं हे आंदोलन जोरात होणार आणि आंदोलकांच्या घोषणांनी या सुस्तावलेल्या सरकारला कानठळ्याही बसणार,” असा इशारा रोहित पवार यांनी दिला. ‘झोपलेल्या सरकारला जागे करण्यासाठी आलोय’ मैदानात उतरल्यानंतर रोहित पवार यांनी थेट सरकारला आव्हान दिले. ते म्हणाले, “जे सरकारच्या विरोधात लढतात, त्यांच्यावर कारवाई केली जाते. आज महाराष्ट्रात टीईटी पेपर फुटला, नीट परीक्षेत भ्रष्टाचार झाला. अभिजित दिपके या विद्यार्थ्यांसाठी रस्त्यावर उतरून लढत आहेत. त्या हजारो विद्यार्थ्यांना पाठिंबा देण्यासाठी आणि या झोपलेल्या सरकारला जागे करण्यासाठीच मी आज येथे आलो आहे.” ‘१७ दिवस झाले विद्यार्थी रस्त्यावर, पण सरकार गप्प’ याच आंदोलनात सहभागी झालेले अभिजित दिपके यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारवर निशाणा साधला. “आज आंदोलनाचा सलग १७ वा दिवस आहे. दिल्लीत विद्यार्थी रस्त्यावर बसले आहेत. देशभरातील हजारो विद्यार्थी NEET पेपरफुटी प्रकरणी न्याय मागत आहेत, मात्र सरकारकडून त्यांना कोणताही दिलासा दिला जात नाहीये,” अशी प्रतिक्रिया दिपके यांनी व्यक्त केली. पेपरफुटी प्रकरणातील भ्रष्टाचाराविरोधात संभाजीनगरमध्ये पुकारण्यात आलेल्या या एल्गारामुळे राजकीय आणि शैक्षणिक वातावरण चांगलेच तापले असून, आता सरकार या विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर काय पावले उचलते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. हेही वाचा.. महाराष्ट्रात 3 दिवसांपासून पाऊस, घरात राहण्याचे आवाहन:रेल्वे ट्रॅक, एक्सप्रेस वे बंद; JK च्या किश्तवाडमध्ये भूस्खलन, गाड्या दबल्या देशातील अनेक राज्यांमध्ये मान्सूनने जोर धरला आहे. महाराष्ट्रात गेल्या तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. मुंबई-पुणे रेल्वे मार्गावरील भोर घाट भागात (कर्जत आणि लोणावळा दरम्यान) दोन ठिकाणी दरडी कोसळल्याच्या घटना घडल्या; याचा फटका तिन्ही रेल्वे मार्गांना बसला असून २० गाड्या रद्द कराव्या लागल्या आहेत. सविस्तर वाचा
Source link
'आवाज दाबण्यासाठी जॅमर लावले, पण सरकारला कानठळ्या बसणारच!':पेपरफुटीविरोधात रोहित पवार अन् अभिजित दिपकेंचा संभाजीनगरात एल्गार