![]()
राज्यभर सुरू असलेल्या मुसळधार पावसाने जनजीवन अक्षरशः विस्कळीत झाले आहे. मुंबई, ठाणे, रायगड, पालघर, पुणे, सातारा, नाशिकसह कोकणातील अनेक जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीमुळे पूरस्थिती निर्माण झाली असून अनेक रस्ते, पूल आणि महामार्ग बंद झाले आहेत. या पार्श्वभूमीवर भारतीय हवामान विभागाने (IMD) मुंबई महानगर क्षेत्रासह काही जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन राज्य सरकारने खासगी कार्यालयांना ‘वर्क फ्रॉम होम’ करण्याचे निर्देश दिले असून अत्यावश्यक सेवा वगळता सरकारी व निमसरकारी कर्मचाऱ्यांना दुपारनंतर अर्धा दिवसाची सुटी जाहीर करण्यात आली आहे. यासंदर्भात शासनाने अधिकृत अधिसूचनाही जारी केली आहे. मुंबईसाठी विशेष सूचना; अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नका हवामान विभागाने मुंबई महानगर क्षेत्रात ताशी 80 ते 90 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याचा आणि अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. त्यानंतर बृहन्मुंबई महानगरपालिकेने नागरिकांना अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये, असे आवाहन केले आहे. महापालिकेने नागरिकांना झाडे, जीर्ण इमारती, होर्डिंग्ज, वीजखांब आणि धोकादायक ठिकाणांपासून दूर राहण्याचे, झाडाखाली वाहने उभी न करण्याचे तसेच समुद्रकिनारे आणि पाणथळ भागात जाणे टाळण्याचे आवाहन केले आहे. कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता केवळ अधिकृत सूचनांचे पालन करण्यास सांगण्यात आले आहे. आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी 1916 या हेल्पलाईनवर संपर्क साधण्याचे आवाहनही करण्यात आले आहे. महापालिकेसह विविध विभागांचे सुमारे १५ हजार अधिकारी आणि कर्मचारी शहरभर आपत्ती व्यवस्थापनासाठी तैनात असून वरिष्ठ अधिकारी परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवून आहेत. मुंबईतील शाळा, महाविद्यालयांना सुट्टी; विद्यापीठाच्या परीक्षाही पुढे मुसळधार पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्याच्या इशाऱ्यामुळे मुंबईतील सर्व शासकीय, खासगी, महापालिका शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने मुंबई विद्यापीठाने ६ जुलै रोजी होणाऱ्या सर्व परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. नव्या परीक्षा वेळापत्रकाची घोषणा लवकरच केली जाणार आहे. पुणे जिल्ह्यात रेड अलर्ट; सर्व शाळा बंद पुणे जिल्ह्यासाठीही हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केला आहे. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. नागरिकांनी नदी-नाल्यांपासून दूर राहावे आणि अत्यावश्यक कामाशिवाय बाहेर पडू नये, असे आवाहनही त्यांनी केले आहे. रायगड, पालघर, साताऱ्यातही शाळांना सुट्टी रायगड आणि पालघर जिल्ह्यांत अतिमुसळधार पावसाचा इशारा लक्षात घेऊन सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. मात्र, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना शाळेत उपस्थित राहून आपत्ती व्यवस्थापनासाठी प्रशासनाला सहकार्य करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. दरम्यान, सातारा जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी महाबळेश्वर, पाटण, जावळी, वाई आणि सातारा या पाच तालुक्यांतील सर्व प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. पुणे-मुंबई एसटी सेवा बंद; रेल्वे आणि रस्ते वाहतुकीवर परिणाम मुंबई-पुणे मार्गावरील दरड कोसळल्यामुळे पुढील आदेश येईपर्यंत पुणे-मुंबई एसटी बस सेवा पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. सकाळी मुंबईकडे निघालेल्या चार एसटी बसेस उर्से टोलनाक्याजवळ अडकल्यानंतर त्यांना सुरक्षितपणे पुन्हा पुण्याकडे परत पाठविण्यात आले. राज्यात अनेक महामार्गांवर दरडी कोसळल्या असून काही ठिकाणी पुलांवर पाणी आल्याने वाहतूक बंद करण्यात आली आहे. त्यामुळे हजारो प्रवासी अडकून पडले आहेत. रायगडमध्ये पुराचा कहर कायम रायगड जिल्ह्यात सावित्री, कुंडलिका, अंबा आणि पाताळगंगा या नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली असून महाड, रोहा, नागोठणे, पेण आणि खोपोली परिसरात पुराचे पाणी साचले आहे. काही ठिकाणी पाणी ओसरू लागले असले तरी जिल्ह्यातील अनेक भाग अजूनही जलमय आहेत. वारकऱ्यांना महत्त्वाचे आवाहन इंद्रायणी नदीच्या वाढत्या पाणीपातळीमुळे आळंदी आणि देहू परिसरातही गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाने वारकरी, दिंडी प्रमुख आणि भाविकांना सध्या ज्या ठिकाणी आहेत, तेथेच सुरक्षित थांबण्याचे आवाहन केले आहे. नदी, पूल किंवा पाण्याखाली गेलेल्या रस्त्यांवरून जाण्याचा प्रयत्न करू नये तसेच पोलीस आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. पुढील तीन तासांसाठीही रेड अलर्ट हवामान विभागाने मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यांसाठी पुढील तीन तास अतिवृष्टीचा इशारा कायम ठेवला आहे. या काळात ५० ते ६० किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये, नदी-नाले, समुद्रकिनारे आणि धोकादायक भागांपासून दूर राहावे तसेच प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन प्रशासनाने पुन्हा एकदा केले आहे. मुंबईत काल किती झाला पाऊस? 5 जुलै रोजी सकाळी 8 ते रात्री 11 या कालावधीत मुंबईत झालेल्या पावसाची नोंद पुढीलप्रमाणे झाली आहे. मुंबई शहर : 63 मिमी पूर्व उपनगरे : 87 मिमी पश्चिम उपनगरे : 88 मिमी हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील 24 ते 48 तास राज्यातील अनेक भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कायम राहण्याची शक्यता असून प्रशासनाने संपूर्ण यंत्रणा सतर्क ठेवली आहे.
Source link
मुंबईसह राज्यात अतिवृष्टीचा कहर:रेड अलर्टनंतर 'वर्क फ्रॉम होम', सरकारी कर्मचाऱ्यांना हाफ डे, 5 जिल्ह्यांत शाळा-बंद, एसटी सेवा स्थगित