![]()
राज्यभर मुसळधार पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला असून कोकणातील परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. रायगड, रत्नागिरी आणि चिपळूणसह अनेक भागांत नद्या दुथडी भरून वाहत आहेत. याचदरम्यान मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर पुन्हा मोठी दुर्घटना घडली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील कशेडी बोगद्याजवळ खवटी परिसरात दगड-मातीचा प्रचंड ढिगारा महामार्गावर कोसळल्याने दोन्ही मार्गिका पूर्णपणे बंद करण्यात आल्या आहेत. परिणामी गेल्या तब्बल 24 तासांपासून महामार्गावरील वाहतूक ठप्प असून वाहनांच्या किलोमीटरपर्यंत लांबच लांब रांगा लागल्या आहेत. दरड हटविण्यासाठी प्रशासन युद्धपातळीवर प्रयत्न करत असले, तरी सतत सुरू असलेल्या पावसामुळे बचाव आणि साफसफाईच्या कामात मोठे अडथळे येत आहेत. त्यामुळे महामार्ग वाहतुकीसाठी नेमका कधी खुला होणार, याबाबत अद्याप कोणतीही निश्चित माहिती देण्यात आलेली नाही. रत्नागिरीत अतिमुसळधार पावसाचा इशारा, शाळांना सुटी जाहीर भारतीय हवामान विभागाने दिलेल्या पूर्वसूचनेनुसार रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस आणि काही ठिकाणी अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा दिलेला आहे. या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी, बालवाडी व शासकीय / निमशासकीय सर्व माध्यमाच्या प्राथमिक व माध्यमिक शाळांना दिनांक 06 जुलै रोजी सुटी जाहीर करण्यात आली आहे. रात्री अडीचच्या सुमारास मोठी दुर्घटना मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी पहाटे सुमारे अडीच वाजण्याच्या सुमारास खेड तालुक्यातील खवटी गावाजवळ, हॉटेल अनुसया परिसरात अचानक मोठी दरड महामार्गावर कोसळली. काही क्षणांतच दगड आणि मातीचा प्रचंड ढिगारा रस्त्यावर पसरल्याने मुंबईकडे जाणारी आणि कोकणाकडे येणारी दोन्ही बाजूंची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. सकाळ होताच शेकडो ट्रक, एसटी बस, खासगी वाहने आणि पर्यटकांच्या गाड्या महामार्गावर अडकून पडल्या. अनेक प्रवाशांना वाहनांतच तासन्तास थांबावे लागत असून अन्न-पाण्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे. दरड हटविण्याचे काम सुरू; यंत्रसामग्री अपुरी राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून घटनास्थळी दोन जेसीबी आणि दोन डंपरच्या मदतीने दरड हटविण्याचे काम सुरू आहे. मात्र, सततच्या मुसळधार पावसामुळे माती पुन्हा घसरत असल्याने कामाचा वेग मंदावला आहे. याशिवाय बोरज आणि वेरळ येथून अतिरिक्त जेसीबी मशीन मागविण्यात आल्या असून अधिक यंत्रसामग्रीच्या मदतीने युद्धपातळीवर काम सुरू करण्यात आले आहे. तरीही महामार्ग कधी सुरू होईल, याबाबत प्रशासनाने कोणताही कालावधी जाहीर केलेला नाही. ‘हा भाग दरडप्रवण नव्हता’; महामार्ग विभागाचे स्पष्टीकरण राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभागाचे अभियंता पंकज गोसावी यांनी सांगितले की, संबंधित ठिकाण हे पारंपरिक दरडप्रवण क्षेत्र नाही. डोंगरही महामार्गापासून काही अंतरावर आहे. त्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणात माती आणि दगड कोसळणे अनपेक्षित असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. वाहतूक शक्य तितक्या लवकर पूर्ववत करण्यासाठी सर्व यंत्रणा कार्यरत असल्याचेही त्यांनी सांगितले. पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे प्रशासनाचे आवाहन महामार्ग बंद असल्याने वाहनचालकांनी तुळशी–विन्हेरे या पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे प्रशासनाने आवाहन केले आहे. अत्यावश्यक कारणाशिवाय मुंबई-गोवा महामार्गावरील प्रवास टाळण्याचा सल्लाही देण्यात आला आहे. महामार्गाच्या देखभालीवर प्रश्नचिन्ह या घटनेनंतर महामार्गाच्या सुरक्षिततेबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. भाजपचे कार्यकर्ते आणि खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी पावसाळ्यापूर्वी घाट परिसराची पाहणी झाली होती का, संरक्षण भिंती का उभारण्यात आल्या नाहीत आणि देखभाल करारानुसार संबंधित ठेकेदाराने नेमकी कोणती जबाबदारी पार पाडली, असा सवाल उपस्थित केला आहे. दरड कोसळण्यास जबाबदार असलेल्या संबंधित ठेकेदार आणि कामावर देखरेख करणाऱ्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणीही त्यांनी केली आहे. मुंबई-पुणे मार्गांवरही पावसाचा फटका दरम्यान, मुसळधार पावसामुळे केवळ मुंबई-गोवा महामार्गच नव्हे, तर मुंबई-पुणे मार्गांवरही गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. मुंबई-पुणे मिसिंग लिंक प्रकल्प परिसरात दरड कोसळल्याने वाहतुकीवर परिणाम झाला आहे. त्यामुळे पुणे-मुंबई द्रुतगती मार्ग आणि जुन्या राष्ट्रीय महामार्गावरील वाहतुकीवरही ताण निर्माण झाला आहे. अत्यावश्यक नसल्यास मुंबई-पुणे प्रवास टाळावा, असे प्रशासनाने आवाहन केले आहे. पाली शहरात पुराचे पाणी; बल्लाळेश्वर मंदिर परिसर जलमय रायगड जिल्ह्यातील पालीमध्ये अंबा नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने शहरात पुराचे पाणी शिरले आहे. श्री बल्लाळेश्वर मंदिर परिसर, एसटी स्थानक, भाजी मार्केट आणि अनेक सखल भाग जलमय झाले असून पाली-खोपोली मार्गावरील वाहतूकही बंद करण्यात आली आहे. खोपोली-पेण महामार्ग पाण्याखाली रायगडमध्ये सततच्या पावसामुळे सारसन ते इसांबा फाटा परिसरात मोठ्या प्रमाणावर पाणी साचले आहे. खोपोली-पेण महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली असून पाताळगंगा आणि भोगावती नद्या धोक्याच्या पातळीच्या वरून वाहत आहेत. कल्याण-डोंबिवलीतही जलमय परिस्थिती कल्याण-डोंबिवली परिसरात रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. कल्याण-शीळ मार्गावर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने वाहतूक अत्यंत संथ गतीने सुरू आहे. डोंबिवलीतील अनंतम रीजेन्सी चौकात रस्त्याला तळ्याचे स्वरूप आले असून दुचाकी आणि लहान चारचाकी वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. मुंबई-अहमदाबाद महामार्गावर उड्डाणपुलाला भगदाड दरम्यान, मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील चारोटीजवळ विवळवेढे उड्डाणपुलाला मोठे भगदाड पडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पुलावरील काँक्रीट तुटून लोखंडी सळ्या बाहेर आल्याने वाहनचालकांच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. काही दिवसांपूर्वी याच ठिकाणी 15 हून अधिक वाहनांचे टायर फुटल्याच्या घटनाही घडल्या होत्या. नागरिकांना प्रशासनाचे आवाहन राज्यात पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा इशारा कायम असल्याने नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय प्रवास टाळावा, नदी-नाले आणि पूरग्रस्त भागांपासून दूर राहावे तसेच प्रशासनाने वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
Source link
मुंबई-गोवा महामार्गावर संकट आणखी गडद:कशेडी बोगद्याजवळ पुन्हा दरड कोसळली; 24 तासांपासून वाहतूक ठप्प, हजारो प्रवासी अडकले