![]()
मागील वर्षीची अतिवृष्टी आणि यावर्षी जूनमध्ये पावसाने दिलेली ओढ, हे सर्व हवामान बदलांचेच गंभीर परिणाम आहेत. पृथ्वी आयोगाच्या अहवालानुसार आपण निसर्गावर केलेल्या अत्याचारांमुळे पुढील पिढ्यांचे जीवन अत्यंत कठीण होणार आहे. हे लक्षात घेऊन तरुण पिढीने स्वतःपासूनच पर्यावरण जागृती सुरू करणे गरजेचे आहे. अशा काळात विद्यार्थ्यांनी अभ्यासपूर्ण लेखांनी सजवलेले ‘द क्राईंग अर्थ’ हे नियतकालिक पर्यावरणपूरक कामात निश्चितच महत्त्वाची भूमिका बजावेल,” असे गौरवोद्गार अगस्ति महाविद्यालयाचे प्रा. संदेश कासार यांनी काढले. अगस्ति विद्यालयातील उपक्रमशील शिक्षक घनःश्याम माने यांच्या मार्गदर्शनाखाली दहावीच्या विद्यार्थ्यांनी संपादित केलेल्या ‘द क्राईंग अर्थ’ या पर्यावरणपूरक शैक्षणिक नियतकालिकाचे प्रकाशन अकोले तालुका पत्रकार संघाचे संस्थापक विजय पोखरकर यांच्या हस्ते पार पडले. यावेळी प्रमुख व्याख्याते म्हणून प्रा. कासार बोलत होते. अध्यक्षीय भाषणात बोलताना विजय पोखरकर म्हणाले, पृथ्वीला वाचवण्यासाठी तिच्या डोळ्यांतील अश्रू आता आपल्यालाच पुसावे लागतील. विविध प्रकारच्या प्रदूषणामुळे होणारे दुष्परिणाम आता थेट आपल्या दारापर्यंत येऊन ठेपले आहेत. त्यामुळे शालेय स्तरावरूनच अशी जाणीव जागृती निर्माण करणे काळाची गरज आहे. नियतकालिकाचे संपादक घनःश्याम माने यांनी गेल्या चार वर्षांपासून विद्यार्थ्यांसोबत नियतकालिक काढण्यामागील प्रेरणा विषद केली. या नियतकालिकासाठी विद्यार्थ्यांनी घेतलेल्या परिश्रमांची स्तुती करतानाच, उपसंपादक प्रणिता गोपाल दराडे हिने निवडलेले विषय, आशय आणि लेखन प्रक्रियेचे विशेष कौतुक करण्यात आले. हवामानातील बदल, प्रदूषणमुक्त निसर्गसंपन्न वातावरण आणि पृथ्वी वाचवण्यासाठी करण्यात येणाऱ्या विविध उपाययोजनांवर विद्यार्थ्यांनी अतिशय दर्जेदार, अभ्यासपूर्ण व वैशिष्ट्यपूर्ण लेख लिहिले आहेत. हे लेख वाचकांमध्ये पर्यावरणपूरक जाणीव व जागृती निर्माण करण्यास मोठा हातभार लावतील, अशी अपेक्षा अगस्ति एज्युकेशन सोसायटीचे कार्यवाहक सतीश नाईकवाडी व पत्रकार शांताराम काळे यांनी व्यक्त केली. या प्रकाशन समारंभास अकोले तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष शांताराम काळे, सचिव हेमंत आवारी, अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे जिल्हाध्यक्ष अमोल वैद्य, अल्ताफ शेख, राजेंद्र जाधव, श्रीनिवास रेणुकादास, संजय पवार, मुख्याध्यापक संजय शिंदे, निवृत्त मुख्याध्यापक मंगेश खांबेकर, डॉ. सुशील बेनके, प्रा. राहुल देशमुख व विद्यार्थी उपस्थित होते. आभार संजय पवार यांनी मानले.
Source link
निसर्गावरील अत्याचार थांबवण्यासाठी तरुणांनी गतिमान व्हावे:प्रा. संदेश कासार यांचे आवाहन, अकोल्यात ‘द क्राईंग अर्थ’ नियतकालिकाचे प्रकाशन