![]()
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील खासदारांच्या फुटीनंतर राज्यातील राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे. उद्धव ठाकरे यांनी फुटीर खासदारांच्या मतदारसंघाचा दौरा आटोपून तातडीने आमदारांची बैठक बोलावली असली, तरी या बैठकीवरून सत्ताधारी शिंदे गटाच्या मंत्र्यांनी त्यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. “यापूर्वी ९ खासदारांची बैठक घेऊनही ६ खासदार फुटलेच ना? त्यामुळे आता कितीही बैठका लावल्या तरी जाणारे थांबणार नाहीत,” असे सूचक आणि खोचक विधान उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केले आहे. माध्यमांशी बोलताना उदय सामंत यांनी ठाकरे गटाला आणखी आमदार फुटणार असल्याचे संकेत दिले. “ज्या पद्धतीने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेना पुढे जात आहे, ते पाहता मागील १५ दिवसांत अनेक मोठे नेते आमच्याकडे आले आहेत. यामध्ये सचिनभाऊ अहिर, गोकुळ गिते, किरण सरनाईक यांच्यासह विधानसभेचे तीन आमदार देखील शिवसेनेत दाखल झाले आहेत,” अशी माहिती सामंत यांनी दिली. या नव्या पक्षप्रवेशांमुळे विधान परिषदेतील शिवसेनेचा (शिंदे गट) आकडा आता १४ वर पोहोचला असून पक्षाची पकड मजबूत होत असल्याचा दावा त्यांनी केला. २० कोटींच्या ऑफरवर घेतली फिरकी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी “काँग्रेसचा आमदार फोडण्यासाठी एकनाथ शिंदेंनी २० कोटींची ऑफर दिली,” असा गंभीर आरोप केला होता. यावर हसत उत्तर देत उदय सामंत म्हणाले, “३० कोटी त्यांनी कमी सांगितले का? साडेचार वर्षांपूर्वी त्यांनी ‘५० खोके’ म्हणजेच ५० कोटींचा आकडा सांगितला होता, आता थेट २० कोटींवर आले. महाराष्ट्राची जनता अशा मनघडंत आरोपांवर अजिबात विश्वास ठेवत नाही.” हिंदुत्वाचा आव आणून आता डॅमेज कंट्रोल होणार नाही – शंभूराज देसाई दुसरीकडे, शंभूराज देसाई यांनी उद्धव ठाकरेंच्या ‘रामरक्षा आंदोलना’वर आणि बदललेल्या राजकीय भूमिकेवर कडक शब्दांत टीका केली. “उद्धव ठाकरे हिंदुत्वापासून दूर गेल्यामुळे त्यांचा हक्काचा मतदार त्यांच्यापासून दुरावत आहे, अशी भीती खुद्द त्यांच्याच उरलेल्या आमदारांनी त्यांच्याकडे व्यक्त केली आहे. म्हणूनच ठाकरेंनी आता पुन्हा एकदा हिंदुत्वाचा मुद्दा हाती घेतला आहे,” असे ते म्हणाले. राम मंदिरातील कथित चोरीच्या मुद्द्यावरून ठाकरे गटाने दादर येथे महाआरती करत ‘रामरक्षा आंदोलन’ सुरू केले आहे. यावर बोलताना देसाई म्हणाले, “पक्षाला लागलेली गळती रोखण्यासाठी आणि झालेले नुकसान भरून काढण्यासाठी ठाकरे आता हिंदुत्वाचा अजेंडा चालवत आहेत. पण आता खूप उशीर झाला असून, जनतेला त्यांची खरी भूमिका कळाली आहे. त्यामुळे आता या हिंदुत्वाच्या कार्डाचा त्यांना कोणताही फायदा होणार नाही.” हे ही वाचा… खड्डे सोडून द्या, तिथे अख्खा मिसिंग लिंकच कोसळला!:संजय राऊतांची मुख्यमंत्र्यांवर कडाडून टीका, शिंदेंवरही साधला निशाणा मुंबई-पुणे प्रवासातील महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पावर अतिवृष्टीमुळे दरड कोसळल्यानंतर आता या मुद्द्यावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर टीकास्त्र सोडण्यास सुरुवात केली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी या दुर्घटनेवरून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप करत सडकून टीका केली आहे. “मुख्यमंत्री म्हणतात मिसिंग लिंकवर दोन खड्डे पडलेत, पण आज त्यांनी स्वतः जाऊन पाहावे; खड्डे सोडून द्या, तिथे अख्खा मिसिंग लिंकच कोसळला आहे,” अशा शब्दांत राऊत यांनी मुख्यमंत्र्यांना लक्ष्य केले. सविस्तर वाचा…
Source link
बैठका लावल्या तरी जाणारे थांबणार नाहीत:खासदारांचीही बैठक बोलावली होती, काय झाले? ठाकरेंच्या डॅमेज कंट्रोलवर उदय सामंतांचा टोला