Headlines

सवनात संतप्त गावकऱ्यांनी शाळेला कुलुप ठोकले:9 पदे असतांना तीनच शिक्षक कार्यरत, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचा आरोप




सेनगाव तालुक्यातील सवना येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षकांची ९ पदे मंजूर असतांना प्रत्यक्षात तीनच शिक्षक कार्यरत असून या ठिकाणी तातडीने शिक्षकांची नियु्क्ती करण्याच्या मागणीसाठी संतप्त गावकऱ्यांनी सोमवारी ता. ६ सकाळी शाळेला कुलुप ठोकले. तर दुपारपर्यंत शिक्षण विभागाचा एकही अधिकारी शाळेकडे आला नाही. या ्प्रकारामुळे गावकऱ्यांतून तिव्र संताप व्यक्त होत आहे. सेनगाव तालु्क्यातील सवना येथे जिल्हा परिषदेची इयत्ता पाचवी ते १० वीपर्यंत शाळा आहे. याठिकाणी अडीचशे विद्यार्थी शिक्षण घेतात. विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी शिक्षकांची ९ पदे मंजूर आहेत. मात्र मागील काही दिवसांपासून शिक्षकांची केवळ तीनच पदे भरलेली असून या शिक्षकांनाच वर्ग सांभाळावे लागत आहेत. त्यातही दोन शिक्षक मतदार विशेष पुनर्रिक्षण कार्यक्रमात असल्याने एकाच शिक्षकावर सध्या शाळा सुरु आहे. रिक्तपदांमुळे शाळेच्या गुणवत्तेवर परिणाम होऊ लागला आहे. या ठिकाणी शिक्षकांची रिक्तपदे तातडीने भरावीत अशी मागणी वेळोवेळी करण्यात आली होती. मात्र या मागणीकडे शिक्षण विभागाकडून सर्रासपणे दुर्लक्ष केले जात आहे. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या गावकऱ्यांनी सोमवारी ता. ६ सकाळी नऊ वाजता शाळेला कुलुप ठोकले. यावेळी वकील संघाचे माजी अध्यक्ष ॲड. प्रवीण नायक, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सुनिल नायक, राजेश नायक, बालासाहेब नायक, शिवाजी नायक, बबन नायक, किशोर भालेराव, धनंजय वानखेडे, दीपक नायक यांच्यासह पालकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. दरम्यान, शाळेला कुलुप असल्यामुळे विद्यार्थी देखील अर्धातास वाट पाहून घरी निघून गेले. शाळेला कुलुप लावल्याची माहिती मिळाल्यानंतरही शिक्षण विभागाचा एकही अधिकारी शाळेकडे फिरकला नाही. या प्रकारामुळे पालकांनी तिव्र नाराजी व्यक्त केली आहे. जोपर्यंत शाळेत शिक्षकांची नियुक्ती होत नाही तो पर्यंत शाळेचे कुलुप उघडले जाणार नाही अशी भुमीका गावकऱ्यांनी घेतली आहे. त्यामुळे दुपारपर्यंत शाळेचे कुलुप कायम होते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *