![]()
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे काही खासदार आणि आमदार सत्तेत नसल्यामुळे मतदारसंघातील विकासकामांसाठी थेट ‘एनडीए’मध्ये जाण्यास उत्सुक असल्याच्या चर्चांनी सध्या राजकीय वर्तुळ ढवळून निघाले आहे. याच पार्श्वभूमीवर, मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील आणि भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच्यात बैठक पार पडल्याची माहिती समोर आली आहे. या नव्या घडामोडींमुळे महाराष्ट्राच्या राजकारणाला पुन्हा एकदा कलाटणी मिळण्याचे संकेत असून, ठाकरे गटाला एकाकी पाडण्याची ही शरद पवारांची नवी खेळी असल्याची चर्चा आता रंगू लागली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या बैठकीत ‘राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष’ जर महायुतीमध्ये अधिकृतपणे सहभागी झाला, तर त्यांच्या वाट्याला सत्तेत नेमके काय येऊ शकते? यावर दोन्ही नेत्यांमध्ये सविस्तर खल झाला. इतकेच नव्हे तर, महायुतीत थेट सामील न होता केवळ बाहेरून पाठिंबा देण्याच्या पर्यायावरही तावडे आणि पाटील यांच्यात चाचपणी झाल्याचे समजते. सत्तेसाठी सोयीचे राजकारण साधत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना गटाला महाविकास आघाडीत एकाकी पाडण्याचा हा शरद पवारांचा नवा डाव असल्याचे मत राजकीय जाणकारांनी व्यक्त केले आहे. तावडे यांच्याशी झालेल्या या दीर्घ चर्चेनंतर जयंत पाटील यांनी आपल्या पक्षाच्या इतर ज्येष्ठ नेत्यांशीही संपर्क साधून पुढील रणनीतीबाबत संवाद साधल्याची माहिती समोर आली आहे. काही दिवसांपूर्वी होती विलीनीकरणाची चर्चा अजित पवार हयात असताना दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. जर शरद पवार आणि अजित पवार यांचे पक्ष एकत्र आले असते, तर ते ‘एनडीए’सोबत राहणार की ‘इंडिया’ आघाडीसोबत? हा प्रश्न अजित दादांच्या अपघाती निधनामुळे कायमचा अनुत्तरित राहिला. मात्र, आता दादांच्या पश्चात जयंत पाटील आणि विनोद तावडे यांच्यात झालेल्या या ताज्या आणि महत्त्वाच्या बैठकीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणाला कोणती नवीन दिशा मिळते आणि शरद पवार गट काय अंतिम निर्णय घेतो, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
Source link
महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा भूकंपाचे संकेत!:जयंत पाटील अन् विनोद तावडे यांची मुंबईत भेट, शरद पवारांच्या राष्ट्रवादीची नवीन चाचपणी?