Headlines

RTO विभागात मोठ्या रॅकेटचा आरोप:विजय वडेट्टीवारांच्या मागणीनंतर SIT चौकशीची मुख्यमंत्र्यांची घोषणा




राज्याच्या प्रादेशिक परिवहन विभागात (RTO) भ्रष्टाचाराचे आणि बेकायदेशीर वसुलीचे एक मोठे रॅकेट कार्यरत असून, जे इमानदार अधिकारी या वसुलीला साथ देत नाहीत, त्यांना जाणीवपूर्वक एसीबीच्या (ACB) जाळ्यात अडकवले जाते, असा अत्यंत खळबळजनक आरोप काँग्रेसचे विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी विधानसभेत केला. या आरोपांसोबतच त्यांनी काही अधिकाऱ्यांची नावे आणि ऑडिओ क्लिप्स सभागृहात सादर केल्याने एकच खळबळ उडाली. या गंभीर आरोपांची तत्काळ दखल घेत सरकारने या प्रकरणाची विशेष तपास पथकामार्फत (SIT) चौकशी करण्याची मोठी घोषणा केली आहे. वडेट्टीवारांचा विधानसभेत गौप्यस्फोट विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात बोलताना विजय वडेट्टीवार यांनी RTO विभागातील संघटित वसुली रॅकेटचा पर्दाफाश केला. नागपूर RTO मध्ये चोरीच्या वाहनांच्या नोंदणीसह मोठ्या गैरव्यवहारांचा आरोप त्यांनी केला. ते म्हणाले की, या रॅकेटमधील अधिकाऱ्यांना १५ वर्षांहून अधिक काळ केवळ विदर्भातच पोस्टिंग दिली जात आहे.यावेळी त्यांनी काही अधिकाऱ्यांची थेट नावे घेतली, ज्यामध्ये निवृत्त RTO अधिकारी बजरंग खरमाटे, अकोल्याचे प्रादेशिक परिवहन अधिकारी रविंद्र भुयार, अमरावतीचे निलंबित मोटार वाहन निरीक्षक राजू नागरे, गोंदियाचे आनंद मोहोड आणि खामगावचे निलंबित अधिकारी योगेश खेसनार यांचा समावेश आहे. हे सर्व अधिकारी मिळून बेकायदेशीर वसुली करतात, असा थेट आरोप त्यांनी केला. इमानदार अधिकाऱ्यांना ACB च्या जाळ्यात अडकवण्याचा कट या रॅकेटची भयानक कार्यपद्धती मांडताना वडेट्टीवार म्हणाले की, जे अधिकारी बेकायदेशीर वसुली करण्यास नकार देतात, त्यांना जाणीवपूर्वक टार्गेट केले जाते. ट्रान्सपोर्टरमार्फत खोटे तक्रारदार उभे केले जातात आणि नियोजनबद्ध पद्धतीने परिस्थिती निर्माण करून अशा अधिकाऱ्यांवर ACB चा ट्रॅप लावला जातो. अशा अधिकाऱ्यांना अडकवून मानसिक त्रास दिला जात असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. तसेच, महागड्या आयात केलेल्या वाहनांची नोंदणी महाराष्ट्राऐवजी इतर राज्यांत करून राज्याचा मोठा महसूल बुडवला जात असल्याचा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला. सरकारचा मोठा निर्णय: IPS प्रियांका ननावरे यांच्या नेतृत्वात SIT स्थापन या प्रकरणावर उत्तर देताना मुख्यमंत्री आणि परिवहन मंत्र्यांनी या आरोपांची अत्यंत गांभीर्याने दखल घेतली आहे. RTO मधील कथित भ्रष्टाचाराचे रॅकेट कायमचे उद्ध्वस्त करण्यासाठी सरकारने महत्त्वाचे निर्णय जाहीर केले आहेत: SIT ची स्थापना: IPS अधिकारी प्रियांका ननावरे यांच्या अध्यक्षतेखाली तीन सदस्यीय विशेष तपास पथक (SIT) स्थापन करण्यात आले आहे. एका महिन्यात अहवाल: ही तीन सदस्यीय समिती RTO घोटाळ्याचा तपास करून एका महिन्याच्या आत आपला अहवाल सरकारला सादर करेल. नावांची सखोल चौकशी: विजय वडेट्टीवार यांनी सभागृहात घेतलेल्या सर्व नावांची आणि त्यांनी केलेल्या आरोपांची सखोल तपासणी केली जाईल. कठोर कारवाई: चौकशी अहवालानुसार जे अधिकारी दोषी आढळतील, त्यांच्यावर कायद्यानुसार अत्यंत कठोर कारवाई केली जाईल. सरकार कोणालाही पाठीशी घालणार नाही, अशी ग्वाही देण्यात आली आहे. करचुकवेगिरीवरही सरकारचा डोळा महाराष्ट्रात वास्तव्यास असूनही इतर राज्यांत वाहन नोंदणी करून करचुकवेगिरी करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी नियम अधिक कडक करण्यात येणार असल्याचेही सरकारने स्पष्ट केले. वाहन नोंदणीवेळी कर्ज, रहिवासी पुरावा आणि GST पडताळणीसारख्या बाबींची आता काटेकोर तपासणी केली जाणार आहे. यामुळे राज्याचा बुडणारा महसूल वाचण्यास मोठी मदत होणार आहे. हेही वाचा.. पावसाळी अधिवेशन:परप्रांतीयांच्या बेकायदेशीर बाईक-टॅक्सींना ब्रेक; जळगाव प्रकरणावर रोहित पवार आक्रमक, मुख्यमंत्र्यांकडून कारवाईचे आश्वासन मुंबईसह संपूर्ण राज्याला झोडपणाऱ्या मुसळधार पावसामुळे काल अवघ्या तासाभरात स्थगित झालेल्या विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाच्या कामकाजाला आज पुन्हा सुरुवात झाली. आजच्या सत्राच्या सुरुवातीलाच राज्यातील अनधिकृत वाहतूक आणि महिला-विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा मुद्दा चांगलाच गाजला. यावर राज्य सरकारने एक अत्यंत कठोर आणि महत्त्वाचा निर्णय जाहीर केला आहे. राज्यात बेकायदेशीररित्या चालणाऱ्या बाईक-टॅक्सी आणि अनधिकृत वाहतुकीला लगाम घालण्यासाठी आता केवळ ‘डोमिसाईल सर्टिफिकेट’ असणाऱ्यांनाच परवाना दिला जाईल, अशी मोठी घोषणा विधानसभेत करण्यात आली आहे. येथे वाचा पावसाळी अधिवेशनाचे अपडेट्स



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *